‘चि. तेजस सागर कुंभार याचे आजोबा श्री. हनुमंत कुंभार (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के) आणि आजी सौ. सुलोचना कुंभार (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) हे दोघेही सनातन संस्थेचे साधक आहेत. चि. तेजस याचे काका श्री. किरण हनुमंत कुंभार हे देवद आश्रमात पूर्णवेळ साधना करत आहेत. तेजसची त्याच्या आई, आजी-आजोबा आणि काका यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
चि. तेजस सागर कुंभार यास सनातन परिवाराकडून तिसर्या वाढदिवसानिमित्त अनेक शुभाशीर्वाद !
१. जन्मापूर्वी
१ अ. गरोदरपणी केलेली साधना : ‘गर्भधारणा झाल्यानंतर मी नियमित देवपूजा करत होते. संपूर्ण ९ मास मी नियमितपणे रामरक्षा, गणपतिस्तोत्र आणि दुर्गाकवच म्हणत असे.’ – सौ. प्रांजल सागर कुंभार (तेजसची आई), सातारा रस्ता, पुणे.
१ आ. सून प्रांजल हिने गरोदरपणी गुरुपौर्णिमेच्या दिवशी ग्रहण असतांना सेवा करणे आणि ग्रहण सुटेपर्यंत नामजप करणे : ‘सून सौ. प्रांजल हिला चौथा मास असतांना गुरुपौर्णिमा (२७.७.२०१८) होती. त्या दिवशी तिने माझ्या समवेत सेवा केली. त्या दिवशी ग्रहण असल्यामुळे घरी आल्यावर सौ. प्रांजल हिने पहाटे ग्रहण सुटेपर्यंत (पहाटे ३ वाजून ४९ मि.) आमच्या (मी आणि माझे यजमान) समवेत बसून नामजप केला.
१ इ. सूनेने नामजप लिहिणे : सौ. प्रांजल हिला गर्भारपणात कुलदेवी आणि ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हे नामजप करण्यास सांगितले होते. ती ते नामजप लिहून काढत असे.
१ ई. आध्यात्मिक स्तरावरील उपायांमुळे सूनेची प्रसुती सुलभपणे होणे : तिच्या प्रसुतीच्या २ दिवस आधी ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ तिच्या जवळ ठेवला होता. नामजपादी उपायांमुळे प्रसुतीच्या वेळी तिला कुठलाही त्रास झाला नाही.’
– सौ. सुलोचना हनुमंत कुंभार (तेजसची आजी (वडिलांची आई))
२. वय जन्म ते १ वर्ष
‘सूनेला मुलगा झाला. बाळाचे नाव पत्रिकेत ‘त’ या आलेल्या अक्षरावरून ‘तेजस’ ठेवले.
२ अ. मुद्रा करणे : तेजस एक मासाचा असतांना झोपेत हातांच्या मुद्रा करत असे.
२ आ. हात उंचावून प्रतिसाद देणे : त्याला बोलता येत नव्हते, तेव्हाही तो ‘हर हर महादेव’ आणि ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।’ या घोषणा दिल्यावर हात वर करून प्रतिसाद देत असे.
३. वय १ वर्ष ते ३ वर्षे
३ अ. तेजसचा तोंडवळा प्रसन्न आणि तेजस्वी दिसणे : २८.३.२०२१ या दिवशी आम्ही दोघेही कुंभमेळ्याच्या सेवेला गेलो होतो. तेथून परत आल्यानंतर आम्हाला तेजसच्या तोंडवळ्यात पालट जाणवला. ‘पूर्वीपेक्षा त्याचा तोंडवळा प्रसन्न आणि तेजस्वी दिसत आहे’, असे आम्हाला जाणवले.
३ आ. सात्त्विकतेची ओढ
१. आम्ही दोघे नामजप करायला बसल्यानंतर तोही आमच्याजवळ येऊन नामजप करायला बसतो. कधी कधी तो स्वतःहून घरातील देवघरासमोर शांत बसतो.
२. तो ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ उघडून त्यातील सर्व संत आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांची छायाचित्रे पाहून त्यांना नमस्कार करतो. तो परात्पर गुरुदेवांच्या छायाचित्राकडे पाहून त्यांना प्रेमाने ‘आबा’ अशी साद घालतो.’
– सौ. सुलोचना हनुमंत कुंभार आणि श्री. हनुमंत कुंभार (आजोबा (वडिलांचे वडील), सातारा रस्ता, पुणे.
४. आध्यात्मिक स्तरावरील उपायांचे महत्त्व जाणणारा तेजस !
४ अ. आजीला आध्यात्मिक त्रास होत असतांना तेजसने ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ घेऊन जवळ येऊन त्या ग्रंथाची पाने नुसतीच उलटणे, त्यानंतर आजीला बरे वाटू लागणे : ‘१०.६.२०२१ या दिवशी अमावास्या होती. त्या दिवशी मला ‘काहीही न सुचणे, डोके दुखणे’, असे आध्यात्मिक त्रास होत होते. त्यामुळे माझा नामजपही होत नव्हता. तेव्हा चि. तेजस ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ घेऊन माझ्याजवळ आला. तो ग्रंथाची पाने नुसतीच उलटत होता, तरी त्यानंतर मला बरे वाटू लागले. त्याच्या या कृतीतून ‘मला चैतन्य मिळत आहे’, असे मला जाणवले.
४ आ. तेजसचे आजोबा कामावरून आल्यावर थकलेले दिसल्यास तेजस ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ घेऊन त्यांच्याजवळ जाऊन बसल्याने त्यांचा थकवा दूर होणे : तेजसचे आजोबा कामावरून घरी आल्यावर त्यांच्या तोंडवळ्यावर थकवा दिसत असेल, तर तेजस लगेच ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ घेऊन त्यांच्याजवळ बसतो. त्यामुळे ‘त्यांचा थकवा आणि कार्यालयीन विचार दूर होतात’, असे त्यांच्या लक्षात आले.
हे सर्व प.पू. गुरुदेवांनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) सुचवले आणि लिखाण करून घेतले, यासाठी त्यांच्या चरणी कृतज्ञता.’
– सौ. सुलोचना हनुमंत कुंभार
५. तेजस ‘झोपेत नामजप करत आहे’, असे वाटणे : ‘मी तेजसला प्रथम पाहिले, तेव्हा तो झोपला होता आणि त्याने हाताच्या बोटांची ध्यान मुद्रा केली होती. तेव्हा ‘तो झोपेतही नामजप करत आहे’, असे मला वाटले.
६. उत्तम स्मरणशक्ती : आमच्या घरात छत्रपती शिवाजी महाराज यांचे मोठे छायाचित्र आणि श्रीकृष्णाचे मोठे चित्र लावले आहे. त्यांपैकी कुणाचेही नाव घेऊन त्याला विचारल्यावर तो लगेच योग्य ते चित्र दाखवतो.’
७. तेजसचे स्वभावदोष : हट्ट करणे.’
– श्री. किरण कुंभार (तेजसचे काका), सनातन आश्रम, देवद, पनवेल.
(सर्व सूत्रांचा दिनांक १३.६.२०२१)