(म्हणे) ‘आम्हाला मत दिल्यास २०० रुपयांची दारू ५० रुपयांत देऊ !’

तेलंगाणाचे भाजप प्रदेशाध्यक्ष सोमू वीरराजू यांचे जनताद्रोही आवाहन !

  • काँग्रेस, तेलंगाणामधील सत्ताधारी तेलंगाणा राष्ट्र समिती आदी राजकीय पक्षांचे नाही, तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष असे आवाहन करतात, हे राष्ट्रप्रेमींना अपेक्षित नाही ! – संपादक
  • आज मद्य स्वस्तात देण्याची भाषा करणारे यापुढे जाऊन अनैतिक गोष्टी करण्यास मुभा देण्याचीही भाषा करतील ! – संपादक
  • जनतेला साधना, त्याग, निर्व्यसनी रहाण्यास न शिकवता व्यसनी होण्यास प्रोत्साहन देणारे असे राजकारणी जनहित काय साधणार ? – संपादक
भाजपचे तेलंगाणा प्रदेशाध्यक्ष सोमू वीरराजू

भाग्यनगर (तेलंगाणा) – भाजपला मत दिल्यास ५० रुपयांत चांगल्या दर्जाची दारू देऊ, असे आश्‍वासन भाजपचे तेलंगाणा प्रदेशाध्यक्ष सोमू वीरराजू यांनी दिले आहे. सध्या चांगल्या दर्जाची दारू २०० रुपयांमध्ये मिळते. पक्षाच्या जाहीर सभेत तेे बोलत होते. राज्यात निकृष्ट दर्जाची दारू चढ्या भावाने विकल्यामुळे त्यांनी राज्य सरकारवर टीका केली. (राज्यात दुधात आणि अन्य खाद्यपदार्थांमध्ये भेसळ केली जाते, त्याविषयी सोमराजू यांना बोलावेसे का वाटले नाही ? – संपादक) ‘राज्यात बर्‍याच आस्थापना अधिक किमतीत दारू विकतात, तर दारूची निर्मिती करणारी लोकप्रिय आस्थापने राज्यात उपलब्ध नाहीत’, असा आरोप त्यांनी केला.

वीरराजू पुढे म्हणाले की, राज्यातील प्रत्येक व्यक्ती दारूवर प्रत्येक मासाला १२ सहस्र रुपये खर्च करत होती. हे पैसे सरकारी तिजोरीत जमा होतात आणि याच पैशांचा वापर सरकारी योजना चालवण्यासाठी केला जातो. राज्यातील १ कोटी लोक दारूचे सेवन करत आहेत. त्यामुळे वर्ष २०२४ च्या निवडणुकीत या १ कोटी लोकांनी भाजपला मतदान करावे, अशी आमची इच्छा आहे. जर भाजपाला १ कोटी मते मिळाली, तर राज्यात ७५ रुपये प्रति बाटली या दराने चांगल्या दर्जाची दारू मिळेल. जर अधिक महसूल मिळाला, तर हीच दारू ७५ रुपयांऐवजी ५० रुपये प्रति बाटलीने विकली जाईल.