विजयदुर्ग किल्ल्याचे संवर्धन होण्यासाठी त्वरित आदेश देण्याची हिंदु जनजागृती समितीची महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि सांस्कृतिक मंत्री यांच्याकडे मागणी

सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रशासनाला दिले निवेदन

सिंधुदुर्ग – छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीमध्ये किल्ल्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. छत्रपती शिवरायांनी सागरी मार्गाने होणारे आक्रमण मोडून काढण्यासाठी स्वतःचे आरमार आणि जलदुर्गांचीही निर्मिती केली. या आरमाराच्या माध्यमातून इंग्रज, डच, फ्रेंच, पोर्तुगीज आदी परकीय आक्रमकांचा बीमोड करत स्वराज्याचे रक्षण केले. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना ‘फादर ऑफ इंडियन नेव्ही’ असे म्हटले जाते. जलदुर्ग हे शिवरायांच्या दुर्ग बांधणीच्या तंत्रज्ञानाचा अभूतपूर्व अविष्कारच आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळे यांच्या पराक्रमाची साक्ष देणार्‍या या जलदुर्गांपैकी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग हा एक किल्ला आहे. दुर्दैवाने आज या किल्ल्याची स्थिती अत्यंत दयनीय झाली असून या किल्ल्याचे संवर्धन होणे आवश्यक आहे. त्यासाठी संबंधित खात्यांना त्वरित आदेश देण्यात यावेत, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक श्री. संदेश गावडे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि सांस्कृतिक मंत्री यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. मुख्यमंत्री आणि सांस्कृतिक मंत्री यांना देण्याचे निवेदन सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण, देवगड, सावंतवाडी येथे तहसीलदार यांना, तर ओरोस येथे जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले.


 

 

 

 

 

 

(निवेदन वाचण्यासाठी चित्रावर क्लिक करा)

या निवेदनात म्हटले आहे की,

१. विजयदुर्ग किल्ल्याच्या तटबंदीवर गवत आणि झाडे वाढली आहेत. किल्ल्यावर ‘जिबीचा दरवाजा’, अशी पाटी आहे; मात्र तेथे दरवाजाच नाही, तसेच महाद्वारालाही दरवाजे नाहीत. अनेक ठिकाणी तटबंदी कोसळली आहे. देवडी आणि नगारखाना यांची दुरवस्था झाली आहे. किल्ल्यावर भगवा ध्वज लावलेला नाही. टेहळणी बुरुजामध्ये असलेल्या शिवमंदिराचीही स्थिती वाईट आहे. किल्ल्यावर श्री भवानीदेवी मंदिराविना आहे. तलावाची दुर्दशा झाली आहे. अशा अनेक प्रकारे किल्ल्याची दुरवस्था झाली आहे.

२. वरील सर्व गोष्टी सर्वसामान्य व्यक्तीला कळू शकतात, तर मग पुरातत्व विभागाला का लक्षात येत नाहीत ? याकडे वेळीच लक्ष न दिल्यास अमूल्य अशा ऐतिहासिक ठेव्याला आपण कायमचे मुकू शकतो.

३. भावी पिढीमध्ये राष्ट्राप्रती निष्ठा अन् जाज्वल्य अभिमान निर्माण करण्यासाठी अशा किल्ल्यांचे जतन आणि संवर्धन होणे आवश्यक आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे किल्ल्याच्या या दुरवस्थेला उत्तरदायी असलेल्या संबंधित सर्व प्रशासकीय अधिकार्‍यांची चौकशी करावी आणि दोषींवर कठोर कारवाईही करावी.

४. आमच्या मागण्यांची योग्य ती नोंद घेऊन तत्परतेने कार्यवाही कराल, अशी अपेक्षा आहे. विजयदुर्ग किल्ल्याचे त्वरित संवर्धन करण्याचा निर्णय न दिल्यास याविषयी वेळप्रसंगी आंदोलन करण्यात येईल.

५. कृपया याविषयी आपल्याकडून झालेल्या कार्यवाहीविषयी आम्हाला वेळोवळी अवगत करावे, ही विनंती !

तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन

१. मालवण – नायब तहसीलदार अनंत मालवणकर यांनी निवेदन स्वीकारले. या वेळी मधुसूदन सारंग, सुहास दुदवडकर, राजन संजय गोवेकर, शिवाजी देसाई, अशोक ओटवणेकर, युवा धर्मप्रेमी प्रणित मांजरेकर, मंदार तारी आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

देवगडचे तहसीलदार श्रीकृष्ण ठाकूर यांना निवेदन देतांना (डावीकडून दुसरे) श्री. राजेंद्र पाटील,श्री. आनंद मोंडकर, अनिरुद्ध दहिबांवकर, श्री. भास्कर खाडिलकर आणि श्री. दीपक कांबळी

२. देवगड – तहसीलदार श्रीकृष्ण शंकर ठाकूर यांना निवेदन देण्यात आले. या वेळी जामसंडे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्री. राजेंद्र पाटील, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री आनंद मोंडकर, भास्कर खाडिलकर, दीपक कांबळी आणि श्री. अनिरुद्ध दहिबांवकर उपस्थित होते.

३. सावंतवाडी – नायब तहसीलदार मनोज मुसळे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री प्रसाद काळे, चंद्रकांत बिले, उमाजी चव्हाण आदी उपस्थित होते.

निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड यांना निवेदन देतांना उजवीकडून सर्वश्री गजानन मुंज, रवींद्र परब आणि डॉ. अशोक महिंद्रे

४. जिल्हा मुख्यालय, ओरोस – निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड यांना निवेदन देण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री गजानन मुंज, रवींद्र परब आणि डॉ. अशोक महिंद्रे
उपस्थित होते.


हे पण वाचा :

छत्रपती शिवाजी महाराजांचा अमूल्य ठेवा आणि हिंदवी स्वराज्याचा प्रमुख जलदुर्ग असणार्‍या विजयदुर्ग किल्ल्याकडे होणारे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष ! 

‘विजयदुर्ग’ किल्ल्याच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी २९ डिसेंबरला ‘महाराष्ट्र राज्यव्यापी आंदोलन’ करणार ! – हिंदु जनजागृती समिती