मंत्री मायकल लोबो यांच्या हस्ते कळंगुट जंक्शनवर पोर्तुगालचे फुटबॉलपटू क्रिस्तियानो रोनाल्डो यांच्या पुतळ्याचे अनावरण

देशप्रेमी नागरिकांनी काळे झेंडे दाखवून केला निषेध

पोर्तुगालचा फुटबॉलपटू क्रिस्तियानो रोनाल्डो आणि त्याचा पुतळा

म्हापसा, २८ डिसेंबर (वार्ता.) – बंदर कप्तान मंत्री मायकल लोबो यांनी कळंगुट-हडफडे सीमेवर जिल्हा पंचायतीने बांधलेल्या उद्यानात उभारलेला पोर्तुगालचा फुटबॉलपटू क्रिस्तियानो रोनाल्डो याच्या पुतळ्याचे २८ डिसेंबर या दिवशी अनावरण केले. या अराष्ट्रीय कृतीचा देशप्रेमी नागरिकांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी काळे झेंडे दाखवून निषेध केला.

देशप्रेमी नागरिकांच्या मते, ज्या पोर्तुगिजांनी गोव्यात ४५० वर्षे अत्याचारी राजवट केली, त्या राष्ट्राचा प्रतिनिधी असलेल्या क्रिस्तियानो रोनाल्डो याचा पुतळा गोव्यात उभारणे, ही गोमंतकियांसाठी लज्जास्पद गोष्ट आहे. गोव्यात गोवा मुक्तीची ६० वर्षे आम्ही साजरी केली. गोवा मुक्तीलढ्यात असंख्य स्वातंत्र्यसैनिकांनी प्राणांची आहुती दिली आहे. त्यातील एखाद्या स्वातंत्र्यसैनिकाचा पुतळा किंवा कळंगुट गावचे भूमीपुत्र तथा अर्जुन पुरस्कार विजेते फूटबॉलपटू ब्रुनो कुतिन्हो यांचा पुतळा उभारल्यास चालला असता.