साधकांच्या मनावर स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाचे महत्त्व बिंबवून त्यांच्याकडून साधना करवून घेणारे श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज अन् परात्पर गुरु डॉ. आठवले !

२९ डिसेंबर २०२१ या दिवशी ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांची पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त..

‘ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांनी त्यांच्याकडे येणार्‍या भक्तांचे स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन कसे केले ?’, याविषयीची एक गोष्ट माझ्या ऐकण्यात आली. श्री महाराज (श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज) त्यांच्याकडे येणार्‍या लोकांशी अतिशय प्रेमाने वागायचे; मात्र जेव्हा मुख्यतः त्यांचे नामधारक भक्त, वयस्कर, निवृत्तीवेतनधारक, अधिकारी किंवा विद्वान लोक त्यांच्याकडे यायचे, तेव्हा ते अतिशय खुबीने त्यांचे अहंनिर्मूलन करायचे. त्यांच्याकडे प्रत्येकाला त्याची चूक दाखवून देण्याचे कौशल्य होते.

 श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज

१. श्री महाराजांनी त्यांच्या एका भक्ताला साधनेत क्रोधामुळे होणार्‍या हानीची जाणीव करून देणे

१ अ. भक्ताने त्याच्या पत्नीला ओरडल्यावर श्री महाराजांनी त्याच्याकडे अर्थपूर्ण आणि सहेतूक पाहून भक्ताला त्याची चूक लक्षात आणून देणे : श्री महाराजांचे भक्त इन्स्पेक्टर  (पोलीस निरीक्षक) काळेसाहेब हे अतिशय कडक आणि प्रामाणिक अधिकारी होते. त्यांनी श्री महाराज आणि ४ अधिकारी यांना महाप्रसादासाठी घरी बोलावले होते. सर्व मंडळी जेवणाच्या पानावर बसली होती. सर्व जेवण वाढून झाले होते; पण तूप वाढायला थोडा उशीर झाल्याने यजमान काळेसाहेब त्यांच्या पत्नीवर ओरडले. त्यामुळे पानावर बसलेल्या सगळ्यांचा विरस झाला. त्या वेळी त्यांच्या पत्नीच्या डोळ्यांत पाणी आले. त्या क्षणी श्री महाराज यांनी काळेसाहेबांकडे एवढे अर्थपूर्ण आणि सहेतूक बघितले की, साहेबांना स्वतःची चूक लक्षात आली आणि त्यांच्याही डोळ्यांत पाणी आले. तेव्हा श्री महाराज काही बोलले नाहीत; मात्र त्यांनी केवळ एक सहेतूक कटाक्ष टाकला.

१ आ. श्री महाराजांनी भक्ताला ‘परमार्थ साधण्यासाठी विकार कह्यात ठेवावे लागतात’, असे सांगणे : त्या दिवशी संध्याकाळी काळेसाहेब श्री महाराजांच्या दर्शनाला गेले. तेव्हा श्री महाराज त्यांना म्हणाले, ‘‘परमार्थ साधण्यासाठी विकार नाहीसे करायला जमले नाही, तरी ते पूर्णपणे कह्यात ठेवावे लागतात. त्यातल्या त्यात क्रोधाने साधकाची फार मोठी हानी होते.’’

१ इ. श्री महाराजांच्या एका दृष्टीमध्ये शांतीच्या उपदेशाची गीता भरलेली असल्याने क्रोधाचे प्रसंग आल्यावर ती दृष्टी आठवून शांत होता येत असल्याचे भक्ताने सांगणे : पुढे काळेसाहेब स्वतःहून ही गोष्ट सांगतांना म्हणायचे, ‘‘श्री महाराजांच्या एका दृष्टीने मला माझ्या क्रोधाची जाणीव झाली. त्यांच्या दृष्टीत शांतीच्या उपदेशाची गीता भरली होती. त्यामुळे पुढे कधी असे क्रोधाचे प्रसंग यायचे, तेव्हा मला त्यांचा अर्थपूर्ण कटाक्ष आठवायचा आणि मी आपोआप शांत व्हायचो.’’

पू. शिवाजी वटकर

२. श्री महाराजांचे शिष्य पू. के.वि. बेलसरे यांनी क्रोधावर नियंत्रण ठेवण्यासाठी ‘श्री महाराज सतत आपल्या समवेत आहेत’, याची जाणीव ठेवण्यास सांगणे

श्री महाराजांचे शिष्य पू. के.वि. बेलसरे त्यांच्या प्रवचनात सांगायचे, ‘‘पाण्याची टाकी भरण्यासाठी एक तोटी चालू केली आणि त्याच वेळी टाकीतून पाणी काढून घेण्यासाठी ४ तोट्या चालू केल्या, तर टाकीत पाणी भरणार नाही. त्याप्रमाणे जो साधक क्रोधावर नियंत्रण ठेवू शकत नाही, त्याची साधना वाया जाते. साधक साधना करून ४ पावले पुढे जातो; पण क्रोधामुळे १० पावले मागे येतो. त्यासाठी साधकांनी अतिशय सावधानता बाळगण्याची आवश्यकता आहे. यासाठी श्री महाराज सतत आपल्या समवेत असल्याची भावना आपण २४ घंटे जोपासली, तर आपण क्रोधाला बळी पडणार नाही आणि त्यांच्या कृपेला पात्र होऊ.’’

३. परात्पर गुरु डॉ. आठवले साधकांकडून स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाचे प्रयत्न करवून घेत असल्याने साधकांच्या जीवनाचे सार्थक होत असणे

मागील अनेक वर्षांपासून परात्पर गुरु डॉ. आठवले साधकांकडून ‘गुरुकृपायोगा’नुसार स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाचे प्रयत्न करवून घेत आहेत. त्यामुळे सहस्रो साधकांची आध्यात्मिक प्रगती होऊन ते मोक्षाकडे वाटचाल करत आहेत. साधकांना जीवनात आनंद मिळत असून त्यांच्या जीवनाचे सार्थक होत आहे.

४. कृतज्ञता

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आणि ‘गुरुकृपायोगा’चे जनक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या शिकवणीतून मला म्हणावेसे वाटते,

संत दिसती वेगळाले, परि ते अंतरी मिळाले ।
साधकांचे स्वभावदोष घालवूनी मोक्षाकडे घेऊनी चालले ।।

यासाठी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’

– (पू.) शिवाजी वटकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१७.१२.२०२१)