सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेल्या नामजपातील चैतन्याचे साधिकेने अनुभवलेले सामर्थ्य !

‘नामजपादी उपाय केल्याने आध्यात्मिक त्रास कसे दूर होतात ?’, याविषयीची लेखमाला !

सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ

१. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्यावर त्रास न्यून होणे

‘मला सर्दी आणि ताप यांचा त्रास होत होता. त्या वेळी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ मला होत असलेल्या त्रासाप्रमाणे नामजप शोधून देऊन ‘तो किती घंटे करायचा ?’, ते मला सांगत होते. त्यांनी दिलेला नामजप भावपूर्ण केल्यावर माझा त्रास लगेच न्यून होत होता.

२. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेल्या नामजपातील चैतन्याची आलेली प्रचीती

सौ. मनीषा गायकवाड

मी स्वतःवरील त्रासदायक आवरण काढत असतांना माझ्या विशुद्धचक्रावर पुष्कळ जडपणा जाणवायचा आणि मला उलटी आल्यासारखे जाणवायचे. त्या वेळी मला जेवण जायचे नाही. त्यामुळे मी जेवू शकत नव्हते, तरी सद्गुरु गाडगीळकाकांनी सांगितलेल्या नामजपातील चैतन्यामुळे मी स्वतःचे स्वतः सर्व करू शकत होते. माझ्यावरील त्रासदायक आवरण काढल्यावर मला उलटी झाली आणि मला हलकेपणा जाणवू लागला, तसेच मी त्रासदायक आवरण काढतांना मला होत असलेला उलटीचा त्रास न्यून झाला अन् मला जेवण जायला लागले. ‘आपण आपत्काळात साधनेविना जगू शकत नाही’, याची मला प्रचीती आली. ‘हे गुरुमाऊली, मला सतत तुझ्या अनुसंधानात रहाता येऊ दे’, अशी तुझ्या चरणी प्रार्थना आहे.

३. कमरेपासून तळपायांपर्यंत वेदना होत असतांना देवाने रात्री ‘महाशून्य’ नामजप करायला सुचवणे, सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सकाळी तोच नामजप करायला सांगणे अन् नामजपाने शांत झोप लागणे

त्यानंतर ४ दिवसांनी मला कमरेपासून तळपायांपर्यंत वेगळ्याच प्रकारच्या वेदना चालू झाल्या होत्या. मी दिवसभर जेवढ्या वेळा आवरण काढायचे, तेवढा वेळ माझ्या वेदना न्यून होत होत्या. एकदा रात्री ३ वाजता मला अकस्मात् पुष्कळ वेदना  होऊ लागल्या. तेव्हा ‘विभूती फुंकरून षट्चक्रांवर लावूया’, असा माझ्या मनात विचार आला आणि मी त्याप्रमाणे केले. मी तळहाताची मुद्रा करून ‘महाशून्य’ नामजप केला. नंतर ‘मला कधी झोप लागली ?’, हे कळले नाही.

मी सकाळी उठल्यावर सद्गुरु गाडगीळकाकांना त्रासाविषयी सांगितल्यावर त्यांनी मला सांगितले, ‘‘तुमच्या अनाहतचक्राच्या खाली पुष्कळ आवरण आले आहे.’’ त्यांनी मला ‘महाशून्य’ नामजप करायला सांगितला. तेव्हा ‘देवानेच मला रात्री ‘महाशून्य’ नामजप करण्याचा विचार दिला’, असे माझ्या लक्षात आले. तो नामजप केल्यावर माझा त्रास न्यून होऊन मला शांत झोप लागली.

हे भगवंता, या घनघोर आपत्काळात तुझी मोठी कृपा अनुभवता येत आहे. त्याबद्दल तुझ्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे. ‘हे भगवंता, माझी तुझ्या चरणांशी येण्याची ओढ जागृत राहू दे’, अशी तुझ्या चरणी प्रार्थना आहे.’

– सौ. मनीषा गायकवाड, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.२.२०२१)

सनातनच्या सात्त्विक उत्पादनांच्या माध्यमातून केलेल्या आध्यात्मिक स्तरावरील उपायांमुळे मासिक पाळीचा त्रास क्षणार्धात न्यून होणे

‘माझी मासिक पाळी चालू असतांना माझ्या ओटीपोटात असह्य वेदना होत होत्या. त्या वेळी सौ. अर्चना घनवट या साधिकेने मला अत्तर, कापूर आणि विभूती लावल्यावर माझा त्रास न्यून होत होता. ताईने माझ्या अनाहतचक्रावर गोअर्क लावले. तेव्हा माझ्या ‘षट्चक्रांत थंड लहरी पसरल्या आहेत’, असे मला जाणवले आणि क्षणार्धात माझा त्रास न्यून झाला. त्या वेळी अर्चनाताई ‘परात्पर गुरु डॉ. आठवले सूक्ष्मातून आले आहेत. ते तुला चैतन्य देत आहेत. तुझ्याकडे पहात आहेत’, असे मला सांगत होत्या. त्या वेळी मला परात्पर गुरु डॉक्टरांचे अस्तित्व जाणवत होते आणि ‘शांत, स्थिर राहून ते अनुभवत रहावे’, असे मला वाटत होते.’

– सौ. मनीषा गायकवाड, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.२.२०२१)

  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक