वढू बुद्रुक येथे छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक बांधण्यास उपमुख्यमंत्र्यांची संमती !

मुंबई – हवेली येथील वढू बुद्रुक गावामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक बांधण्याच्या कामाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संमती दिली आहे. स्मारक उभारण्याच्या दृष्टीने अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी आमदार अशोक पवार, वढूचे माजी सरपंच अनिल शिवले उपस्थित होते.

छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्यकर्तृत्वाला साजेसे स्मारक वढू बुद्रुक येथे उभारण्यात यावे. हे स्मारक उभारतांना ते ‘हेरिटेज’ (ऐतिहासिक) असावे. स्मारकाचे काम करतांना छत्रपती संभाजी महाराजांच्या समकालीन वास्तूरचनांचा आधार घ्यावा. येथे दर्शनासाठी येणार्‍यांची योग्य सोय व्हावी. छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे पावित्र्य जपून परिसराच्या विकासाचे काम सर्वांच्या संमतीने करण्यात यावे, असे आवाहन अजित पवार यांनी या वेळी केले.