वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांकडून गोपीचंद पडळकर यांच्या हत्येचे कारस्थान ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

  • आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावरील आक्रमणाचे विधानसभेत पडसाद !
  • पोलीस अधिकार्‍यांचे स्थानांतर करण्याची मागणी

श्री. सतीश सोनार, मुंबई

(डावीकडून) देवेंद्र फडणवीस, गोपीचंद पडळकर, अजित पवार

मुंबई, २७ डिसेंबर (वार्ता.) – भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर ७ नोव्हेंबर या दिवशी आक्रमण करण्यात आले होते. यानंतर पडळकर यांनी ‘या आक्रमणामागे सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील आणि पोलीस अधिकारी आहेत’, असा आरोप केला होता. या आक्रमणाचे पडसाद २७ डिसेंबर या दिवशी विधानसभेत उमटले. या वेळी देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमकपणे मागणी केली की, वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांकडून गोपीचंद पडळकर यांच्या हत्येचे कारस्थान रचले जात असल्याने या प्रकरणातील संबंधित पोलीस अधिकार्‍यांचे तात्काळ स्थानांतर करण्यात यावे .

पोलीस हे आक्रमणकर्त्यांना अडवण्याऐवजी ध्वनीचित्रीकरण करत होते !

देवेंद्र फडणवीस या वेळी म्हणाले की, गोपीचंद पडळकर यांच्यावर आक्रमण केले जात असतांना पोलीस हे आक्रमणकर्त्यांना अडवण्याऐवजी त्याचे ध्वनीचित्रीकरण करत होते. पोलीसच असे वागत असतील, तर त्यांच्यावर विश्वास कोण ठेवणार ? तसेच पडळकर यांच्यावर भारतीय दंड विधान संहिता कलम ३०७ लावणार्‍यांवर कारवाई करण्यात यावी. पडळकर यांच्या अंगावर घालण्यासाठी १ डंपर आणण्यात आला होता. त्यात दगड, काठ्या आणि ‘सोडा वॉटर’च्या बाटल्या होत्या. ही सर्व माहिती पोलीस ठाण्यातील नोंदवहीत आहे. ही सर्व घटना आटपाडी येथील पोलीस ठाण्यासमोर घडली. त्या ठिकाणी २०० ते ३०० लोक होते. पडळकर यांच्यावर आक्रमण करणार्‍याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील एका बड्या नेत्यांसमवेत छायाचित्र आहे.

शहानिशा करून दोषींवर कारवाई करू ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ‘‘अजित पवार यांच्यावर राज्याचे दायित्व दिले, तर ४ दिवसांत राज्य विकून खाईल’, असे काही जण म्हणतात. ही काय बोलण्याची पद्धत झाली का ? मी कुणाच्यामध्ये नसतो. केवळ विकासकामांविषयी मी बोलतो. कुठल्याही राजकीय पक्षाची व्यक्ती कामासाठी माझ्याकडे आली, तर त्यामध्ये मी मनापासून लक्ष घालतो. आमदारांना विधान परिषद आणि विधानसभा येथे लोकांचे प्रतिनिधी म्हणून पाठवले जाते. त्या वेळी थोडे तारतम्य ठेवून वागले पाहिजे. काही सदस्य संरक्षण दिल्यानंतर ‘नको’ म्हणतात; पण सरकार म्हणून आम्ही त्यामध्ये लक्ष घालू. या प्रकरणात जे कुणी दोषी असतील त्याची शहानिशा करून योग्य ती कारवाई केली जाईल.’’