पणजी, २७ डिसेंबर (वार्ता.) कोरोनाचा नवीन प्रकार ‘ओमिक्रॉन’चा पहिला रुग्ण गोव्यात २७ डिसेंबर या दिवशी आढळला आहे. इंग्लंड येथून आलेल्या ८ वर्षीय मुलाला ‘ओमिक्रॉन’चा संसर्ग झाल्याची माहिती आरोग्य खात्याने दिली आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य खात्याने सतर्कतेचे आदेश दिले आहेत.
आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार इंग्लंड येथून ८ वर्षीय मुलगा १७ डिसेंबर या दिवशी गोव्यात आला होता. त्याचे आणि अन्य कोरोनाबाधित रुग्णांचे कोरोनाविषयक नमुने चाचणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. चाचणी अहवाल आल्यावर ८ वर्षीय मुलाला ‘ओमिक्रॉन’चा संसर्ग झाल्याची निश्चिती झाली.
नियमांचे कडक पालन करणार ! विश्वजीत राणे, आरोग्यमंत्री
राज्यात ‘ओमिक्रॉन’चा पहिला रुग्ण आढळल्यानंतर आरोग्यमंत्री विश्वजीत राणे म्हणाले, ‘‘लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आरोग्य खात्याकडून योग्य ती काळजी घेतली जाणार आहे. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांचे कठोरतेने पालन केले जाणार आहे.’’ दाबोळी विमानतळाचे संचालक गगन मलिक म्हणाले, ‘‘दाबोळी विमानतळावर विदेशातून येणार्या सर्व प्रवाशांची ‘रॅपिड पी.सी.आर्.’ चाचणी केली जात आहे.’’
राज्यातील समुद्रकिनारे पर्यटकांनी गजबजलेले आहेत; मात्र सर्वत्र कोरोना प्रतिबंधक नियमांचे कुठेही पालन होतांना दिसत नाही. मास्क घातले जात नाहीत किंवा सामाजिक अंतर पाळले जात नाही. ही स्थिती सर्वत्र आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने देशात ‘ओमिक्रॉन’चा संसर्ग वाढत चालल्याने कोरोना व्यवस्थापनासंबंधी सद्यःस्थितीत लागू असलेली नियमावलीची समयमर्यादा ३१ जानेवारीपर्यंत वाढवून त्याचे कठोरतेने पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.
गोव्यात चाचणीच्या तुलनेत कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याच्या टक्केवारीत वाढ
गोव्यात कोरोनाविषंयक चाचणीच्या तुलनेत कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याच्या टक्केवारीत वाढ होऊन ती ३.९९ टक्के झाली आहे. गोव्यात २७ डिसेंबर या दिवशी १ सहस्र ६७८ चाचण्या करण्यात आल्या, तर यातील ६७ जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळले. राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ४६५ झालेली आहे.
गोव्यात रात्रीची संचारबंदी लागू करा ! वैद्यकीय तज्ञ समितीची शासनाला शिफारसपणजी गोव्यात रात्रीची संचारबंदी लागू करण्याच्या शिफारसीवर गंभीरतेने विचार करावा, अशी मागणी राज्यातील वैद्यकीय तज्ञ समितीने गोवा शासनाकडे केली आहे. कोरोनाचा नवीन प्रकार ‘ओमिक्रॉन’च्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वैद्यकीय तज्ञ समितीच्या २७ डिसेंबरला झालेल्या बैठकीत ही मागणी करण्यात आली. तज्ञ समितीने शासनाकडे पुढील अन्य शिफारसी केल्या आहेत. १. हॉटेलमध्ये निवासासाठी असलेल्या सर्वांची ‘आर्.टी.पी.सी.आर्.’चाचणी करावी. २. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १ सहस्रहून अधिक झाल्यास आणि कोरोनासंबंधी चाचणीच्या तुलनेत रुग्ण आढळण्याची आठवड्याची सरासरी टक्केवारी ३.५ टक्क्यांहून अधिक झाल्यास राज्यात चालू केलेल्या शाळा बंद कराव्या. ३. कोरोनासंबंधी आठवड्याची सरासरी टक्केवारी ३.५ टक्क्यांहून अधिक झाल्यास हॉटेल आणि उपाहारगृह (रेस्टॉरंट) व्यवसाय, तसेच बंद सभागृह आणि अन्य उघड्यावरील कार्यक्रम निम्म्या क्षमतेने घेण्याचे निर्बंध लागू करावेत. ४. कोरोनासंबंधी सरासरी टक्केवारी ७.५ टक्क्यांहून अधिक झाल्यास आणि कोरोनाबाधित एकूण रुग्णसंख्या ३ सहस्रांहून अधिक झाल्यास राज्यातील पर्यटन व्यवसाय बंद करावा. ५. कोरोनासंबंधी सरासरी टक्केवारी १५ टक्क्यांहून अधिक झाल्यास सर्व व्यवसाय बंद करावे. |