पू. रुक्मिणीआई संत असल्याची त्यांच्या आई-वडिलांना झालेली जाणीव, पू. रुक्मिणीआईंचा देहत्याग आणि प.पू. भगवानदास महाराज अन् पू. रुक्मिणीआई यांनी हिंदु धर्माच्या संस्थापनेसाठी केलेली प्रार्थना !

२७.१२.२०२१ या दिवशीच्या दैनिक ‘सनातन प्रभात’च्या अंकात आपण ‘प.पू. दास महाराज यांनी रामनामाचा विशिष्ट संख्येने जप केल्यानंतर त्यांना मारुतीचे दर्शन होणे, प.पू. भगवानदास महाराज आणि पू. रुक्मिणीआई यांनी १३ कोटी रामनामाचा जप पूर्ण केल्यानंतर भगवान श्रीधरस्वामींच्या कृपेने झालेले उद्यापन अन् पू. रुक्मिणीआईंच्या प्रार्थनेचे सामर्थ्य’, हा भाग पाहिला. आज या लेखमालेचा उर्वरित भाग पाहूया.

(भाग ७)

मागील भाग पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/538593.html


प.पू. दास महाराज आणि पू. (सौ.) लक्ष्मी नाईक

११. पू. रुक्मिणीआईंचे रहाणीमान पाहून त्यांच्या आईला काळजी वाटणे आणि तिच्या वडिलांनी ‘ती संत झाली आहे’, असे आईला सांगणे

११ अ. प.पू. भगवानदास महाराज आणि पू. रुक्मिणीआई यांचे रहाणीमान अगदी साधे असणे : ‘आमचे घर म्हणजे वेळू (बांबू) आणि झावळ्या यांची १५ हात लांबीची अन् ९ हात रुंदीची एक लहानशी खोप होती. तिच्यातच देवघर आणि तिथेच चूल होती अन् आम्ही तिथेच बाजूला झोपायचो. तेथे विंचू इत्यादी विषारी प्राणी यायचे. माझे वडील गेल्यावर काही वर्षांनी आमच्याकडे येणार्‍या पेळपकर भटजींनी मातीची अर्धी भिंत बांधून तिच्यावर दगड आणि झाप (झावळी) ठेवून खोप बांधून दिली होती.

११ आ. प.पू. भगवानदास महाराज आणि पू. रुक्मिणीआई यांचे पुष्कळ उपवास असणे अन् रघुवीर आल्यावर त्यांनी भात खाण्याची सवय लावून घेणे : प.पू. भगवानदास महाराज आणि पू. रुक्मिणीआई यांचे उपवासच पुष्कळ असायचे. त्यामुळे ते शेंगदाणे, खजूर आणि मूग भिजत घालायचे अन् खायचे. मी आल्यावर माझ्यासाठी मात्र त्यांनी भात खाण्याची सवय केली. आम्ही कधी मुगाची, तर कधी चण्याची उसळ खायचो. आईला गायीचे दूध लागायचे. मी आमच्याकडील म्हशीचे दूध दुसर्‍याला देत असे आणि त्याच्याकडील गायीचे दूध आणत असे.

११ इ. पू. रुक्मिणीआई यांच्या आईला ‘आपली मुलगी त्रासात रहाते’, असे वाटणे आणि पू. रुक्मिणीआईंनी तिला ‘तू काळजी करू नकोस’, असे सांगणे : एकदा पू. रुक्मिणीआई यांची आई पू. रुक्मिणीआईंच्या घरी आली होती. त्या वेळी ती म्हणायची, ‘‘अगं येशू (आईच्या माहेरचे नाव ‘येशू’ होते.), कुठल्या जंगलात येऊन राहिली आहेस ? किती त्रासात रहातेस ?’’ पू. रुक्मिणीआईच्या आईला पुष्कळ भीती वाटायची. पू. रुक्मिणीआईची आई मुलीला म्हणायची, ‘‘येशू, माझ्याजवळच बस. कुठून तरी वाघ इत्यादी येईल. तुझे किती हाल होत आहेत !’’ पू. रुक्मिणीआई म्हणायच्या, ‘‘माझे हाल होत नाहीत. आई, तू काळजी करू नकोस.’’

११ ई. पू. रुक्मिणीआईंच्या आईने स्वतःच्या पतीला याविषयी सांगणे आणि त्यांनी ‘येशू संत झालेली आहे’, असे पत्नीला सांगणे : मग पू. रुक्मिणीआईची आई घरी जाऊन स्वतःच्या पतीला सांगायची, ‘‘आपली येशू किती त्रासात रहाते !’’ त्यावर ते म्हणायचे, ‘‘अगं, ती संत झालेली असून आपल्यापेक्षा पुष्कळ पुढे गेलेली आहे. ‘ती आपल्या पोटी जन्माला आली’, हेच आपले भाग्य आहे.’’

११ उ. पू. रुक्मिणीआईंच्या वडिलांनी ‘तू संतपदाला पोचली आहेस’, असे म्हणून त्यांना नमस्कार करणे : त्या वेळी पू. रुक्मिणीआईचे वडील तिला नमस्कार करायचे. अंबूराव महाराज, बॅरिस्टर रानडेगुरुजी हे तिच्या वडिलांचे गुरु होते. वडील पू. रुक्मिणीआईला म्हणायचे, ‘‘येशू, तू फार पुढे गेली आहेस. तू संतपदाला पोचली आहेस. तू मुलगी आहेस; पण अध्यात्मात ‘वडील आणि मुलगी’ हे नाते नाही.’’

१२. प.पू. भगवानदास महाराज यांना मलमपट्टी करतांना त्यांच्या जखमेत भरलेला कापूस रात्रीच्या वेळी उंदराने घेऊन जाणे आणि त्या वेळी ते रामनामातच मग्न असणे

मी प.पू. भगवानदास महाराज आजारी असतांना त्यांना मलमपट्टी करायचो. त्यासाठी कापसाला हळद लावून तो जखमेत घालून ठेवायचो. रात्री उंदीर येऊन तो कापूस ओढून घेऊन जायचा. असे बर्‍याचदा झाले; परंतु प.पू. भगवानदास महाराज रामनामातच मग्न असायचे. त्यांचे देहाकडे लक्षच नसायचे. त्यांना अखंड रामनामाचाच ध्यास लागला होता.

१३. पती गेल्यावर पू. रुक्मिणीआईंनी डोक्यावरील केस काढणे आणि त्यानंतर त्यांच्या तपःसामर्थ्यामुळे देहत्यागापर्यंत त्यांच्या डोक्यावर एकही केस न येणे

आमच्यात एक पद्धत आहे. पती गेल्यावर स्त्रीचे दागिने इत्यादी देऊन टाकावे लागतात आणि तिच्या डोक्यावरील सर्व केस काढून टाकावे लागतात. न्हावी येऊन तिच्या डोक्यावरील केस काढून सगळे डोके गुळगुळीत करून टाकतो. त्यानंतर त्या स्त्रीला ‘सोवळी’ म्हणतात. वर्ष १९६५ मध्ये प.पू. भगवानदास महाराज यांनी देहत्याग केला. आम्ही दाढी केली आणि केस कापले, तर ४ दिवसांत केस परत येतात; पण आईचे तसे झाले नाही. वर्ष १९६५ पासून वर्ष १९८६ मध्ये देहत्याग करीपर्यंत तिच्या डोक्यावर परत कधीच एकही केस आला नाही. इतर विधवा स्त्रिया प्रत्येक मासाला न्हाव्याला बोलावून त्यांच्या डोक्यावरील केस काढून घ्यायच्या; पण आईने परत कधीच न्हाव्याला डोक्याला स्पर्श करू दिला नाही; कारण तिचे तपःसामर्थ्यच तेवढे होते. तिने श्रीरामालाच मागणे केले होते, ‘‘मला परत न्हाव्याच्या हातात डोके द्यायचे नाही. माझ्या डोक्यावर परत केस येता कामा नयेत. माझ्या डोक्याला न्हाव्याने परत शस्त्र लावता कामा नये. श्रीरामा, माझ्यावर कृपा कर.’’ त्यानंतर तिच्या डोक्यावर एकही केस आला नाही. तिचे पावित्र्य, सात्त्विकता आणि श्रद्धा यांमुळे हे झाले होते.

१४. पू. रुक्मिणीआईंचे सोवळे पुष्कळ कडक असणे

१४ अ. प.पू. दास महाराज यांनाही स्पर्श करू न देणे : पू. रुक्मिणीआईचे सोवळे पुष्कळ कडक होते. त्यामुळे ८ – १० वर्षांचा झाल्यापासून आई मला स्पर्श करू देत नसे. मी बाजारातून काही वस्तू आणल्या, तर आई माईंना (माझ्या पत्नी पू. (सौ.) लक्ष्मी यांना) म्हणायच्या, ‘‘अहो माई, तो (प.पू. दास महाराज) आला आहे. त्याने काही बाजार आणला आहे. त्यावर पाणी शिंपडून त्याला आत घ्या.’’

१५. पू. रुक्मिणीआईंच्या आईचे देहावसान

१५ अ. आईची प्रकृती अत्यवस्थ असल्याने पू. रुक्मिणीआई अमावास्या असूनही अन्न-पाणी ग्रहण न करता तिकडे जायला निघणे : एकदा पू. रुक्मिणीआईच्या आईची प्रकृती अत्यवस्थ होती. तिला भेटण्यासाठी पू. रुक्मिणीआई बांदा (जिल्हा सिंधुदुर्ग) येथून जाणार होती. त्या दिवशी अमावास्या होती. लोक म्हणाले, ‘‘अहो, आज अमावास्या आहे. तिकडे कशाला जाता ?’’ त्यावर पू. रुक्मिणीआई म्हणाली, ‘‘अहो, मला आईला भेटायला जायचे आहे. त्यात अमावास्येचा काय संबंध ? मी गेले नाही, तर मला तिचे पार्थिव बघायला मिळणार नाही.’’ मग ती अंघोळ न करता सकाळी ६ वाजता निघाली आणि दुपारी ३ – ४ वाजता आईच्या घरी पोचली. तोवर तिने अन्न-पाणी ग्रहण केले नव्हते. आईकडे इचलकरंजीला पोचल्यावर तिने अंघोळ केली.

१५ आ. पू. रुक्मिणीआईंच्या आईने पू. रुक्मिणीआईंना ‘तू संतपदाला पोचली असल्याने तुझ्या चरणी माझा नमस्कार !’, असे म्हणून प्राण सोडणे : त्या वेळी आईची प्राणज्योत मालवण्याच्या स्थितीत होती. तिला शेवटची घरघर लागली होती. पू. रुक्मिणीआईला तिची आई म्हणाली, ‘‘येशू आलीस !’’ त्या वेळी आईने पू. रुक्मिणीआईचा हात हातात घेतला आणि ती म्हणाली, ‘‘आता मी मोकळी झाले. मला तुझे दर्शन झाले. मी आता जाते गं ! मी तुला नमस्कार करते; कारण तू साधनेत पुढे गेली आहेस. तू संतपदाला पोचली आहेस. तुझ्या चरणी माझा नमस्कार आहे’’, असे म्हणून आईने देह ठेवला.

प.पू. भगवानदास महाराज आणि प.पू. रुक्मिणीबाई

१६. पू. रुक्मिणीआईंचा देहत्याग आणि अग्नीसंस्कार

वर्ष १९८६ मध्ये पू. रुक्मिणीआईने देहत्याग केला. आई देह ठेवण्यापूर्वी दोनच दिवस अंथरुणात झोपून होती. त्या वेळी तिला थोडे अस्वस्थ वाटत होते. त्यामुळे ती पाटावर झोपली होती. त्या दिवशी संकष्ट चतुर्थी होती. ती माईंना म्हणाली, ‘‘तुमचा उपवास आहे, तर माझ्यासाठीही खिचडीच कर. जेवण बनवू नको.’’ तिने दुपारी खिचडी खाल्ली आणि अस्वस्थ होत होते; म्हणून माईंच्या मांडीवर डोके ठेवून झोपली. तिने माईंना ‘पाठीवरून हात फिरवा’, असे सांगितले. ‘तुमचे सर्व बरे होईल. काळजी करू नका’, असे म्हणत तिने प्राण सोडला. नंतर सगळी सिद्धता करून मंदिराच्या वरच्या बाजूला पू. रुक्मिणीआईवर अग्नीसंस्कार केला.

१६ अ. तिसर्‍या दिवशी अस्थी घ्यायला गेल्यावर त्या जागी आपट्याचे रोपटे आपोआप आल्याचे दिसणे आणि आजही तो वृक्ष तिथे असून त्याच्या मूळ फांद्या त्रिशुळाप्रमाणे असणे : त्यानंतर ३ दिवसांनी आईच्या अस्थी घ्यायला गेलो असतांना त्या जागेत आपट्याचे एक रसरशीत रोपटे आपोआप आले होते. जणूकाही ते कुणीतरी आणून लावले होते. प्रत्यक्षात अशा जागी कोणतेही वृक्ष येत नाही; कारण आईच्या अस्थीमधून अजून धूर येत होता. मग जमलेल्या लोकांनी सांगितले, ‘‘हे रोपटे म्हणजे आईचे प्रतीक आहे. ते काढू नका.’’ आजही तो वृक्ष तिथे आहे आणि त्याच्या मूळ फांद्यांचा आकार त्रिशुळाप्रमाणे आहे. आम्ही त्या फांद्या कधीही कापल्या, तरी त्या परत येतांना त्या आकारातच येतात. त्याच आपट्याच्या झाडाची पाने आम्ही दसर्‍याला एकमेकांना देण्यासाठी वापरतो.

१६ आ. पू. रुक्मिणीआई सतत नामजप करत असल्याने त्यांच्या प्राणोत्क्रमणाच्या (देहातून प्राण बाहेर पडण्याच्या) वेळीही जपमाळ ओढतांना जशी बोटे असतात, तशी त्यांच्या हाताची बोटे चिकटून असणे : पू. रुक्मिणीआई कशालाही भीत नव्हती; कारण ती स्वतः तपस्वी होती. तिची साधना पुष्कळ होती. तिच्याकडे नामस्मरणाची शक्ती होती. ती अखंड नामजपातच असायची. ती सतत नामजपाची माळ ओढत असे. जेव्हा तिचे प्राणोत्क्रमण (देहातून प्राण बाहेर पडणे) झाले, तेव्हाही जपमाळ ओढतांना जशी बोटे असतात, तशी त्यांच्या हाताची बोटे चिकटून होती. बोटे सोडवण्याचा प्रयत्न केला; पण ती चिकटल्याप्रमाणे शेवटपर्यंत तशीच राहिली होती. ती वेगळी झाली नाहीत.

१७. प.पू. भगवानदास महाराज आणि पू. रुक्मिणीआई यांनी केवळ निष्काम भक्ती करणे, ‘रामरायाचे दर्शन व्हावे’, असा त्यांचा संकल्प असणे आणि ‘मुलानेही तोच वारसा पुढे चालवावा’, असे त्यांना वाटणे

प.पू. भगवानदास महाराज आणि पू. रुक्मिणीआई यांनी कधीही सकाम भक्ती केली नाही. दोघांनी केवळ निष्काम भक्तीच केली. केवळ ‘आम्हाला रामरायांचे दर्शन व्हावे आणि आम्हा दोघांचा उद्धार व्हावा’, हाच त्यांचा संकल्प होता अन् ‘मुलानेही तोच वारसा चालवावा’, ही त्यांची इच्छा होती. ‘निष्काम भक्ती करावी. परमेश्वर सकामापेक्षा निष्काम भक्तीलाच वश होतो’, असे त्यांचे विचार होते. ‘या शरिराकडून सेवा करवून घे. सेवा करून आम्ही हे शरीर तुझ्या चरणी अर्पण करतो. ते तू स्वीकार’, अशी ते श्रीरामाला प्रार्थना करत असत.

१८. प.पू. भगवानदास महाराज आणि पू. रुक्मिणीआई यांनी प.पू. दास महाराज यांनाही निष्काम साधनाच शिकवणे अन् धर्मस्थापना होण्यासाठी त्यांनी देवाला प्रार्थना करणे

प.पू. भगवानदास महाराज आणि पू. रुक्मिणीआई यांनी मलाही निष्काम साधनाच शिकवली आणि त्यांची एकच इच्छा होती, ‘हिंदु धर्म कायम टिकावा’; कारण हिंदु धर्म भरकटत चालला आहे. सगळीकडे धर्माचरणाचा अभाव दिसून आहे. त्यांचे देवाकडे अखंड मागणे असे, ‘या भारतभूमीवर समर्थांच्या मार्गदर्शनानुसार छत्रपती शिवाजी महाराजांनी जशी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, तशी धर्मसंस्थापना व्हावी. ही भारतभूमी गोब्राह्मणप्रतिपालक आहे. त्यामुळे ब्राह्मण आणि गोमाता यांचे रक्षण व्हावे.’

(समाप्त)

– प.पू. दास महाराज, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२.११.२०२०)