खंडणीची मागणी करणार्‍या बनावट एन्.सी.बी.च्या अधिकार्‍यांच्या त्रासाला कंटाळून अभिनेत्रीची आत्महत्या !

(प्रतिकात्मक चित्र)

मुंबई – एका भोजपुरी अभिनेत्रीला दोन बनावट केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाच्या (एन्.सी.बी.) अधिकार्‍यांनी अमली पदार्थ घेतल्याच्या प्रकरणी अटक करण्याची धमकी देऊन तिच्याकडे २० लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. कारवाईच्या भीतीने आणि बनावट अधिकार्‍यांच्या त्रासाला कंटाळून अभिनेत्रीने आत्महत्या केली. या प्रकरणी अंबोली पोलिसांनी सूरज परदेशी आणि प्रवीण वळिंबे या बनावट अधिकार्‍यांना अटक केली आहे. या प्रकरणातील असीर काझी नावाचा फरार आरोपी अभिनेत्रीचा मित्र असून त्याचा शोध चालू आहे. ही अभिनेत्री जोगेश्वरी (पश्चिम) येथे रहात होती.

आरोपींनी स्वतः केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाचे अधिकारी असल्याचे सांगून सांताक्रूझ (पश्चिम) येथील उपाहारगृहामध्ये एका रेव्ह पार्टीत ही अभिनेत्री आणि तिच्या मित्रांना कह्यात घेतले होते. तसेच अमली पदार्थ घेतल्याच्या प्रकरणी अटक करण्याची धमकी देऊन आरोपींनी तिच्याकडे खंडणी मागितली होती. ही रक्कम जमा न झाल्याने आणि बनावट अधिकार्‍यांनी वारंवार खंडणीची मागणी करून मानसिक त्रास दिल्याने अभिनेत्रीने २३ डिसेंबर या दिवशी रहात्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.