संप म्हणजे राष्ट्राची हानी, हे लक्षात घेऊन सामोपचाराने समस्या सोडवण्याकडे लक्ष देणे अपेक्षित आहे. – संपादक
सातारा, २५ डिसेंबर (वार्ता.) – ग्रामपंचायत कर्मचार्यांनी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी २२ डिसेंबर या दिवशी एक दिवसाचा लाक्षणिक संप करत काम बंद आंदोलन केले.
अनेक मासांपासून ग्रामपंचायत कर्मचार्यांच्या मागण्या प्रलंबित आहेत. यामध्ये १५ व्या वित्त आयोगातून कोणतीही कपात न करता ग्रामपंचायतींना थेट स्थानिक विकासात्मक कामे करण्यासाठी वित्त आयोगाची रक्कम व्यय करण्यात यावी, कोरोना काळात काम करत असतांना ३० हून अधिक सरपंचांचे निधन झाले आहे. त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक साहाय्य करण्यात यावे, सरपंच आणि उपसरपंच यांच्या मानधनामध्ये वाढ करण्यात यावी, पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुलांचे सर्वेक्षण करतांना अनेक चुका झाल्या आहेत, त्या चुका दुरुस्त करण्याविषयी निर्णय घ्यावा, याविषयी राज्य आणि केंद्र सरकारने पाठपुरावा करावा, संगणक चालकाला ग्रामपंचायत कर्मचारी समजण्यात यावे, त्यांना नियुक्ती देण्याचा अधिकार ग्रामपंचायतींना देण्यात यावा, गावातील पाणीपुरवठा देयकांची दुरुस्ती होणे आवश्यक आहे, ती करण्यात यावी, ग्रामपंचायत निवडणूक ही पक्षीय चिन्हावर लढवली जात नसल्यामुळे ‘पॅनल बंदी’ कायदा करण्यात यावा, यांसह अनेक मागण्यांचा समावेश आहे.