लुटीचा ‘साम्यवादी’ मार्ग !

केरळचे मत्स्योत्पादनमंत्री साजी चेरियन यांच्या कार्यालयातील प्रसाधनगृहाच्या नूतनीकरणासाठी पिनराई विजयन् सरकारने ४ लाख १० सहस्र रुपयांचा निधी खर्च करण्यास मान्यता दिली आहे. ‘चेरियन यांनी मंत्रीपद स्वीकारल्यानंतर ७ मासांच्या कार्यकाळात काय जनताभिमुख कारभार केला ?’, हा संशोधनाचा विषय आहे. ते कामासाठी अल्प आणि वादग्रस्त वक्तव्ये केल्यामुळे अधिक (कु)प्रसिद्ध झाले. केरळमध्ये सध्या आर्थिक मंदी भेडसावत आहे. सरकारी तिजोरीवर ताण आहे. असे असतांना एका मंत्र्याच्या प्रसाधनगृहाच्या नूतनीकरणासाठी ४ लाख १० सहस्र रुपये उधळणे, हे गंभीर आहे. विशेष म्हणजे केरळ सरकारकडून ‘लाईफ मिशन प्रोजेक्ट’ ही योजना राबवली जाते. या योजनेच्या अंतर्गत गरिबांना घर बांधण्यासाठी ४ लाख रुपये दिले जातात. म्हणजे गरिबांनी ४ लाखात घर बांधायचे, तर मंत्र्यांनी तितक्यात किमतीत प्रसाधनगृह बांधायचे, हाच विजयन् सरकारचा साम्यवाद का ? केवळ भारतातीलच नव्हे, तर जगभरातील साम्यवादी हे कार्ल मार्क्स आणि लेनिन यांच्या तत्त्वज्ञानानुसार चालतात. हे तत्त्वज्ञान भांडवलशाही आणि जागतिकीकरण यांना विरोध करते. श्रीमंतीचा कोणताही बडेजाव न करता साधे जीवन व्यतीत करण्यास साम्यवाद शिकवतो. हे केवळ पुस्तकी तत्त्वज्ञान झाले, जे मिरवण्यात जगभरासह भारतातील साम्यवादी धन्यता मानतात. नाही म्हणायला भारतातील हाताच्या बोटावर मोजणार्‍या साम्यवाद्यांनी हे तत्त्व पाळले. त्यात बुद्धदेव भट्टाचार्य, ज्योति बसू यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल; मात्र मुख्यमंत्री म्हणून या दोघांची कारकीर्द वादग्रस्तच. असो. माणिक सरकार, व्ही.एस्. अच्युतनंदन्, प्रकाश करात, सीताराम येच्युरी ही साम्यवादी नेत्यांची काही अग्रगण्य नावे; मात्र ती कधीच मागे पडली आहेत. सध्या पिनराई विजयन् हे भारतातील साम्यवाद्यांचे आशास्थान मानले जातात. त्यांच्या मंत्रीमंडळातील हजमंत्री व्ही. अब्दुरहिमन हे वैद्यकीय कारणांसाठी २० दिवसांसाठी अमेरिकेला जाणार आहेत. त्यांच्या प्रवासाचा सर्व खर्च केरळ सरकार उचलणार आहे. हा जनतेच्या तिजोरीवर मारलेला डल्ला आहे. सामान्य माणूस अनाठायी खर्च करायला लागल्यावर ‘पैसे झाडाला लागले आहेत का ?’, असा प्रश्न विचारून त्याला परिस्थितीचे भान करून दिले जाते. विजयन् भानावर येण्यासाठी त्यांना हा प्रश्न कोण विचारणार ? विजयन् केरळमध्ये मुख्यमंत्रीपदावर आरूढ झाल्यानंतर त्यांच्या मंत्र्यांनी जनतेला लुटण्याचेच काम केले आहे. केरळ असो, बंगाल किंवा त्रिपुरा, साम्यवाद्यांनी जेथे राज्य केले, तेथे जनतेला लुटण्याचा गुण सर्व साम्यवाद्यांमध्ये ‘समान’ आढळला.

भ्रष्टाचार हाच साम्यवाद्यांचा शिष्टाचार !

‘गरीब आणि श्रीमंत यांच्यातील दरी मिटवण्यासाठी साम्यवाद अस्तित्वात आला’, असे सांगण्यात येते. ‘श्रीमंत भांडवलदार आणि जमीनदार जनतेला लुटून स्वतःची तुंबडी भरतात. त्यामुळे गरिबी वाढते’, हे त्यांचे तत्त्वज्ञान; मात्र हे तत्त्वज्ञान झाडणार्‍यांकडे जेव्हा सत्ता येते, तेव्हा हेच साम्यवादी भांडवलदारांचा कित्ता गिरवतात. बंगाल, त्रिपुरा आणि केरळ या साम्यवाद्यांच्या गडात हेच दिसून आले. त्रिपुरामध्ये माणिक सरकार यांचे राज्य असतांना वर्ष २०१३ ते २०१६ या कालावधीत प्रतिवर्षी मनरेगा योजनेसाठी अनुमाने ४५ कोटी रुपये सरकारकडून घोषित करण्यात आले; मात्र हे पैसे जनतेपर्यंत पोचलेच नाहीत. साम्यवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ते मध्येच गडप केल्याचा आरोप त्यांच्यावर झाला. बंगालमध्येही साम्यवाद्यांची कारकीर्द ही भ्रष्टाचाराने बरबटलेली होती. केरळमध्येही तीच स्थिती आहे. सोन्याच्या तस्करीच्या प्रकरणात विजयन् यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. ‘साम्यवाद्यांची सत्ता असणार्‍या राज्यांमध्ये भ्रष्टाचार अल्प होतो’, अशी टिमकी साम्यवादीप्रेमी वृत्तवाहिन्यांकडून वाजवली जाते; मात्र ती किती फोल आहे, हे वरील उदाहरणांवरून लक्षात येते. कोरोना महामारीचा सर्वाधिक फटका केरळला बसला. त्यातून राज्यातील परिस्थिती आता कुठेतरी पूर्वपदावर येत असतांना तेथील सरकारने प्रत्येक पैसा हा सावधपणे खर्च करणे अपेक्षित होते; मात्र ‘सरकारी तिजोरी ही स्वतःचीच मालमत्ता आहे’, या आविर्भावात तेथील मंत्री वागत आहेत. केरळ मंत्रीमंडळातील १३ मंत्री हे कोट्यधीश आहेत. त्यात हजमंत्री व्ही. अब्दुरहिमन यांचाही समावेश आहे. याचा अर्थ त्यांना अमेरिकेला जाण्यासाठी स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करणे सहज शक्य आहे. तरीही ‘सरकारी तिजोरीतून माझा प्रवास व्हावा’, असे त्यांना वाटते आणि सरकारही ते मान्य करते, हे संतापजनक !

राजा होण्यासाठी स्पर्धा !

बुद्धदेव भट्टाचार्य यांनी वर्ष २०११ मध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात पदे मिळण्यासाठी भ्रष्टाचार होत असल्याचे मान्य केले होते. ‘पक्षातील काही नेते आणि कार्यकर्ते हे स्थानिक राजांप्रमाणे वागत असून ते लोकांपर्यंत पोचत नाहीत. उलट ते लोकांवर हुकूमत गाजवतात’, हेही त्यांनी स्पष्ट केले होते. हे सांगतांना भट्टाचार्य यांनी ही समस्या निपटली जाईल, असे आश्वासन दिले होते. त्यांच्या या वक्तव्याला १० वर्षे होऊन गेली; मात्र साम्यवादी पक्षांमधील परिस्थिती काही पालटलेली नाही. पक्षातील नेते आणि कार्यकर्ते हे अधिक भ्रष्ट झाले आहेत, हीच आजही वस्तूस्थिती आहे. भ्रष्टाचाराने पक्ष पोखरल्याची जाण या पक्षातील वरिष्ठांना नव्हती, असे नव्हे; मात्र ही समस्या साम्यवाद्यांनी निपटली नाही. महत्त्वाचे म्हणजे भारतातील अन्य सर्व गोष्टींवर हिरहिरीने (अनावश्यक) मत मांडणारे साम्यवादी विचारसरणीचे बुद्धीजीवी, विचारवंत हे साम्यवादी सत्तेत असलेल्या राज्यात फोफावणारा भ्रष्टाचार किंवा तेथील सत्ताधिशांचे भ्रष्ट वर्तन यांविषयी मात्र भाष्य करतांना दिसत नाहीत. यावरून साम्यवाद्यांचा भंपकपणा दिसून येतो. साम्यवादी मंडळी ‘साधी रहाणी उच्च विचारसरणी’चे आचरण करतात, असे सांगतात; मात्र प्रत्यक्षात उच्च रहाणीमानासाठी जनतेला लुटायचे, हीच साम्यवाद्यांची नीती आहे. ही विचारसरणी देशाला घातक असल्यामुळे ती हद्दपार होणे आवश्यक !