प.पू. दास महाराज यांचे बालपणीचे सात्त्विक खेळ, शाळा सोडून दिल्यावर त्यांनी आध्यात्मिक बळावर दासबोधाचे वाचन करणे आणि त्यांचे आध्यात्मिक वैशिष्ट्य !

२४.१२.२०२१ या दिवशीच्या दैनिक ‘सनातन प्रभात’च्या अंकात आपण ‘प.पू. दास महाराज यांनी बालपणी केलेल्या खोड्या, त्यामुळे त्यांना भोगावे लागलेले शारीरिक त्रास आणि खोड्या केल्यावरही त्याच्या संदर्भात आलेल्या अनुभूती’ यांविषयी पाहिले. आजच्या अंकात ‘प.पू. दास महाराज यांचे बालपणीचे सात्त्विक खेळ, त्यांचे आध्यात्मिक वैशिष्ट्य’ यांविषयी पाहूया.

(भाग ५ )

मागील भाग पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/537754.html

प.पू. दास महाराज आणि पू. (सौ.) लक्ष्मी नाईक

५. रघुवीरचे (प.पू. दास महाराज यांचे) बालपण

५ ए. रघुवीरचा (प.पू. दास महाराज यांचा) सात्त्विक खेळ !

५ ए १. शाळा सुटल्यानंतर मित्रांसह ओढ्यावर जाऊन पाण्यामध्ये मारुतीच्या आकाराचे दगड शोधणे आणि त्या दगडांची ‘मारुति’ म्हणून पूजा करणे : ‘आम्ही सर्व मुले शाळा सुटल्यानंतर सकाळी १०.३० वाजता ओढ्यावर अंघोळीला जायचो. (आमची शाळा सकाळी ७ ते १०.३० आणि दुपारी दुपारी ३ ते सायंकाळी ५.३० या वेळात असायची.) तेथे आम्ही पाण्यातील दगड गोळा करायचो. त्यानंतर त्या दगडांमधील मारुतीच्या आकाराचे दगड शोधून ते गोळा करायचो. माझे मित्र मारुतीच्या आकाराचे दगड मला द्यायचे. मी दुपारी १ – १.३० च्या सुमारास बागेत बसून त्या दगडांची ‘मारुति’ म्हणून पूजा करत बसायचो. मी मारुतीच्या खाली एक रुपया ठेवायचो आणि म्हणायचो, ‘हा मारुति माझ्या रुपयाचे रक्षण करील.’ नंतर मी मारुतीसमोर बसून रामनामाचा जप करायचो.

५ ए २. बागेतील फळे आणून मारुतीला नैवेद्य दाखवणे, पूजा करत बागेतच बसणे अन् बराच वेळ घरी न गेल्याने आईने बागेत येऊन जेवण देणे : मी बागेतील कच्ची केळी आणि पेरू आणून त्यांचा मारुतीला नैवेद्य दाखवायचो; कारण मारुतीला कच्ची फळे आवडतात. पूजा करत मी बागेतच बसायचो. त्यानंतर दुपारी १ – १.३० वाजला, तरी मी घरी गेलो नाही, तर आई मला शोधत बागेत यायची. त्या वेळी मी बागेत पूजा करत असायचो. मग आई मला जेवायला द्यायची. त्यानंतर मी पुन्हा शाळेत जायचो. त्यानंतर मी दुपारी ४ वाजता परत मारुतीची पूजा करायचो. एकदा प.पू. भगवानदास महाराज मला म्हणाले, ‘‘देवळातील मारुतीच्या मूर्तीची पूजा कर. असे दगड आणून त्यांची पूजा करू नकोस. देवळात मारुतीची स्थापना झाली आहे. तेथे पूजा कर.’’

५ ऐ. रघुवीरने चौथीनंतर शाळा सोडून दिलेली असूनही त्याने भगवान श्रीधरस्वामींसमोर दासबोध आणि मनाचे श्लोक वाचून दाखवणे अन् ‘तो मारुतीचा अंशावतार असल्याने आध्यात्मिक बळावर वाचू शकत आहे’, असे भगवान श्रीधरस्वामींनी सांगणे : मी त्या वेळची चौथी शिकलो आहे. त्यानंतर मी शाळा सोडून दिली. मारुतिरायांच्या कृपेने आणि भगवान श्रीधरस्वामींच्या आशीर्वादाने आध्यात्मिक बळावर मला आपोआप लिहायला-वाचायला येऊ लागले. मी संस्कृतही वाचू लागलो. एकदा मी वडिलांच्या समवेत सज्जनगडावर गेलो होतो. तेव्हा प्रथम भगवान श्रीधरस्वामींनी माझ्यासमोर दासबोध ठेवला आणि मला तो वाचायला सांगितला. त्यानंतर मला मनाचे श्लोक वाचायला सांगितले. त्या वेळी मी सहस्रो लोकांसमोर ते वाचून दाखवले. त्या वेळी भगवान श्रीधरस्वामी माझ्यासमोर बसले होते. तेव्हा त्यांनी मला मारुतीचे चित्र काढायला सांगितले. त्याप्रमाणे मी एकदा दासमारुतीचे चित्र काढले. त्या वेळी मी ११ वर्षांचा होतो. भगवान श्रीधरस्वामींनी सर्वांना सांगितले, ‘‘पहा, हा शिकला नाही; पण याने पूर्ण दासबोध वाचून दाखवला. याचे कारण म्हणजे हा मारुतीचा अंशावतार आहे. याच्यावर मारुतीची कृपा आहे. त्यामुळे आध्यात्मिक बळावर तो वाचू शकत आहे.’’

प.पू. भगवानदास महाराज आणि प.पू. रुक्मिणीबाई

५ ओ. रघुवीरचे आध्यात्मिक वैशिष्ट्य

रघुवीरच्या मूलाधारचक्राच्या ठिकाणी शेपटीसारखे वाळ असणे आणि ‘ती मारुतीची शेपूट असून रघुवीर १५ वर्षांचा झाल्यावर ती आपोआप निघून जाईल’, असे भगवान श्रीधरस्वामींनी सांगणे : मी १२ वर्षांचा असतांना भगवान श्रीधरस्वामींनी प.पू. भगवानदास महाराज यांना सांगितले, ‘‘रघुवीरच्या मूलाधारचक्राच्या जागी, गुदद्वाराच्या वरच्या बाजूला पहा.’’ त्याप्रमाणे महाराजांनी पाहिल्यावर त्यांना दिसले की, मला शेपटीसारखे वाळ (पुच्छ) होते आणि त्यावर सोनेरी केस होते. स्वामी म्हणाले, ‘‘हा जेव्हा १५ वर्षांचा होईल, तेव्हा ही वाळ हळूहळू आपोआप निघून जाईल. याचे शस्त्रकर्म इत्यादी काही करू नका; कारण ती आध्यात्मिक आहे. ती मारुतीची शेपूट आहे.’’ ती वाळ गेल्यावर माझ्या खोड्या करणे बंद झाले.

५ औ. महाराजांनी विरोध करूनही त्यांना न सांगता गावच्या जत्रेतील कुस्तीच्या स्पर्धेत भाग घेणे आणि स्पर्धा जिंकून पारितोषिक म्हणून पितळ्याची गदा मिळवणे : आमच्या गावात विरोबाची जत्रा झाल्यावर गावागावातील कुस्ती खेळणार्‍या मोठमोठ्या पहिलवानांना बोलावून कुस्ती खेळण्याची स्पर्धा घेतली जायची. सर्वांत लहान वयोगटातील म्हणजे १३ वर्षांच्या मुलांची कुस्तीची स्पर्धा होती. त्या वेळी मी १३ वर्षांचा असल्याने स्पर्धेत भाग घ्यायचे ठरवले. त्यावर प.पू. भगवानदास महाराज मला म्हणाले, ‘‘तुझी शक्ती किती आणि इतर मुलांची शक्ती किती ? तू काजू, बदाम आणि खारीक यांचा चुरा खाणार. त्यातून शक्ती कशी येणार ? तू जाऊ नकोस’’, तरी मी महाराजांना न सांगता स्पर्धेत भाग घेतला. मी कुस्ती खेळून पारितोषिक मिळवले आणि उड्या मारत महाराजांसमोर आलो. त्या वेळी मला पारितोषिक म्हणून पितळ्याची गदा मिळाली होती. माझ्या वर्गमित्राचे आजोबा आम्हाला कुस्ती शिकवणारे वस्ताद होते. मला पारितोषिक मिळाल्यावर मी त्यांना आणि महाराजांनाही नमस्कार केला.

५ अं. ‘श्रीरामाची मूर्ती उभी असल्याने बसलेल्या श्रीरामाची मूर्ती बनवून आणा’, असे रघुवीरने महाराजांना सतत सांगणे आणि भगवान श्रीधरस्वामींच्या सांगण्याप्रमाणे महाराजांनी बसलेल्या श्रीरामाची मूर्ती बनवून आणणे : मी महाराजांना सारखे म्हणायचो, ‘‘श्रीरामाच्या मूर्तीत तो उभा आहे. तो बसत नाही. तो १४ वर्षे वनवासात फिरला आहे. तो राज्याभिषेकाच्या वेळी एकदाच बसला आहे. बसलेल्या श्रीरामाची मूर्ती बनवून आणा. श्रीरामाला बसवा. मगच मी जेवतो; नाहीतर अन्नच सोडतो.’’ रामाला खाली बसवा; म्हणून मी सारखे रडत होतो. मी राममंदिरातील उभ्या श्रीरामाच्या मूर्तीचे पाय चेपायचो. मी त्याच्या पायांची काळजी घ्यायचो.

महाराज सज्जनगडावर श्रीधरस्वामींकडे गेले. महाराजांनी वरील गोष्ट स्वामींना सांगितली. तेव्हा स्वामी म्हणाले, ‘‘रघुवीर म्हणतो, त्याप्रमाणे करा. तो मारुतीचा अंशावतार आहे ना ! मग मारुति काय म्हणणार ? ‘रामाला बसवा’, असेच तो म्हणणार ना ?’’ त्याप्रमाणे वडिलांनी जयपूरहून श्रीरामाची मूर्ती बनवून आणली.

६. बांदा (जिल्हा सिंधुदुर्ग) येथे रहायला गेल्यावर तेथे वाघ येणे आणि पू. रुक्मिणीआईने ‘तुझे उग्र रूप सौम्य कर’, अशी वाघाला प्रार्थना केल्यावर तो निघून जाणे

त्या वेळी आम्ही गळदग्याची वाडी (तालुका चिक्कोडी, जिल्हा बेळगाव, कर्नाटक) येथे रहायचो. तिकडे इतर जनावरे यायची; पण वाघ येत नव्हते. त्यानंतर आम्ही काही दिवसांनी बांदा (जिल्हा सिंधुदुर्ग) येथे रहायला गेलो. बांद्यात असतांना आमची पर्णकुटी होती. तेव्हा तिकडे वाघ यायचे. त्या वेळी माझे वय १८ – १९ वर्षे होते. वाघ आल्यावर पू. रुक्मिणीआई सांगायची, ‘‘वाघ आला बघ.’’ मग मी पू. रुक्मिणीआईच्या पाठीमागे लपून रहायचो. तो वाघ आम्हाला काही करत नसे. तो आमच्या कुटीसमोर येऊन बसायचा. मग पू. रुक्मिणीआई त्या वाघाला प्रार्थना करायची, ‘तुझे हे उग्र रूप सौम्य कर. तुला बघण्याची आमची शक्ती नाही.’ ही प्रार्थना केल्यावर आम्हाला भीती वाटत नसे. त्यानंतर वाघ निघून जात असे.’

(क्रमशः)

– प.पू. दास महाराज, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२.११.२०२०)