भारतीय आस्थापनांच्या विमानांमध्ये भारतीय संगीत वाजवा !

संगीत क्षेत्रातील मान्यवरांची केंद्रीय नागरी विमान वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना विनंती

मुळात अशी विनंती का करावी लागते ? केंद्र सरकारने स्वतःहून यासाठी नियम करणे आवश्यक आहे. आतापर्यंच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी असे न करणे, हे  लज्जास्पद होय ! – संपादक

डावीकडून तिसऱ्यास्थानी केंद्रीय नागरी विमान वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे

नवी देहली – भारतीय विमान आस्थापनांच्या विमानांमध्ये पाश्‍चात्य संगीताऐवजी भारतीय संगीताला प्राधान्य द्यावे, अशी विनंती देशातील प्रसिद्ध गायक आणि संगीतकार यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट घेऊन केली. या वेळी या मागणीवर शिंदे यांनी तातडीने कोणतेही आश्‍वासन दिले नाही; मात्र, ‘जयपूरमध्ये प्रतिवर्षी साहित्यप्रेमींसाठी ‘लिट फेस्ट’ भरवला जातो, त्याप्रमाणे संगीतक्षेत्रातील मान्यवरांनी एकत्र येऊन देशभर संगीत महोत्सव भरवला पाहिजे’, अशी सूचना त्यांनी केली. या भेटीमध्ये पं. संजीव अभ्यंकर, पं. शौनक अभिषेकी, उस्ताद वसीफुद्दीन डागर, पद्मश्री रिटा गांगुली, गायिका मंजुषा कुलकर्णी-पाटील, संगीतकार अन्नू मलिक, संगीतकार-गायक कौशल इनामदार आदी संगीत क्षेत्रातील मान्यवर सहभागी होते.

राज्यसभेतील खासदार आणि भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे (आय.सी.सी.आर्.चे) अध्यक्ष विनय सहस्रबुद्धे यांनी, ‘अमेरिकी विमान आस्थापने त्यांच्या  विमानांमध्ये प्रामुख्याने ‘जॅझ’ (१९ व्या शतकात अमेरिकेत विकसित झालेली संगीत शैली) संगीत वाजवतात. ऑस्ट्रियातील विमान आस्थापने ‘मोझार्ट’चे (मोझार्ट हा १८ व्या शतकात ऑस्ट्रियात जन्मलेला सुप्रसिद्ध संगीतकार) सूर अधिक पसंत करतात. ही आस्थापने त्यांच्या देशाच्या संगीत आणि सांस्कृतिक परंपरा जपण्याचा प्रयत्न करतात. त्याचप्रमाणे भारतीय आस्थापनांनीही भारतीय मातीत जन्माला आलेल्या आणि सहस्रो वर्षांचा वारसा असलेल्या संगीताला प्राधान्य दिले पाहिजे’, असे मत व्यक्त केले.