अष्टविनायक देवस्थानमधील काही देवस्थानांच्या सर्वंकष विकासाच्या अनुषंगाने कार्यवाही करावी ! – डॉ. नीलम गोर्‍हे, उपसभापती, विधान परिषद

डॉ. नीलम गोर्‍हे यांनी अष्टविनायक देवस्थान आराखड्याच्या कार्यवाहीच्या अनुषंगाने दौरा केला

मुंबई, २३ डिसेंबर (वार्ता.) – ११ ते १३ डिसेंबर या कालावधीत महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी अष्टविनायक देवस्थान आराखड्याच्या कार्यवाहीच्या अनुषंगाने दौरा केला आणि सर्व ठिकाणांमधील सुविधा यांच्या संदर्भात बैठक घेतली. त्या वेळी संबंधित देवस्थान आणि गाव येथील पदाधिकारी, शासकीय अधिकारी उपस्थित होते. या वेळी या देवस्थानांच्या परिसरात उपलब्ध असणार्‍या सुविधांची पहाणी करून बैठक घेण्यात आली. या वेळी अष्टविनायक देवस्थानमधील मोरगाव, थेऊर, सिद्धटेक, महड, पाली येथील देवस्थानांच्या सर्वंकष विकासाच्या अनुषंगाने कार्यवाही करावी, असे लेखी आदेश नीलम गोर्‍हे यांनी दिले आहेत, अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

१. पुणे जिल्ह्यातील मोरगाव देवस्थान येथील बैठकीत ‘भक्तनिवासाची व्यवस्था करावी. अन्नछत्र चालू करावे’, असे निर्देश देण्यात आले. थेऊर देवस्थान मंदिर परिसराविषयी थेऊर फाटा ते थेऊर या रस्त्याची दुरुस्ती आणि मंदिराजवळील रस्ते दुरुस्त करावेत, असे लेखी निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे यांना देण्यात आले.

२. नगर जिल्ह्यातील सिद्धटेक येथील दौंड ते सिद्धटेक मंदिरापर्यंत रस्तादुरुस्ती, भीमा नदीच्या घाटाचे सुशोभिकरण, मंदिर परिसरात ‘हायमास’चे दिवे लावणे,तसेच उपलब्ध ४० कोटी रुपयांच्या निधीतून येणार्‍या आराखड्याचे प्रारूप सादर करावे, असे लेखी आदेश नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले आहेत.