विशेष अन्वेषण पथक स्थापून मंत्री आणि नेते यांना आलेल्या धमक्यांचे अन्वेषण करू ! – गृहमंत्री

राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना ‘व्हॉट्सअ‍ॅप’वर धमकी दिल्याचे प्रकरण

  • मंत्र्यांना मिळालेल्या धमकीच्या सूत्रावरून मंत्री नवाब मलिक आणि छगन भुजबळ यांनी विनाकारण सनातन संस्थेला केले लक्ष्य !
  • राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना धमकी देणार्‍याला अटक करण्यात आली होती. असे असतांना कोणतेही कारण नसतांना आणि सनातन संस्थेचा त्यात काहीही संबंध नसतांनाही विधानसभेत सनातन संस्थेवर बंदी आणण्याचा विषय येतो, हे जाणीवपूर्वक केलेले कृत्य नव्हे का ?
गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

मुंबई, २३ डिसेंबर (वार्ता.) – राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना ‘व्हॉट्सअ‍ॅप’वर जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी कर्नाटकातून जयसिंग बजरंगसिंग रजपूत याला अटक केली आहे. या विषयाच्या अनुषंगाने विधानसभेत शिवसेनेचे आमदार सुनील प्रभु हरकतीच्या सूत्रावर म्हणाले, ‘‘आदित्य ठाकरे यांना ‘व्हॉटस्अ‍ॅप’वर धमकी देणारा आरोपी कर्नाटक राज्यात सापडला आहे. यापूर्वी डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, गौरी लंकेश, डॉ. कलबुर्गी यांच्या हत्या झाल्या, त्यांचे संदर्भही कर्नाटक येथे मिळाले आहेत. तिथे भाजपचेच सरकार असून यामागे कुणाचे ‘कनेक्शन’ आहे का ? वरील मान्यवरांच्या झालेल्या हत्येचा संबंध आणि आदित्य ठाकरे यांना धमकी देणारा आरोपी कर्नाटकातील असणे, हे जाणीवपूर्वक केलेले षड्यंत्र आहे का ? असे असेल, तर याचा निषेध केला पाहिजे.’’ यावर उत्तर देतांना गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले की, विविध मंत्री अन् नेते यांना आलेल्या धमक्यांच्या प्रकरणांचे अन्वेषण करण्यासाठी विशेष अन्वेषण पथक नियुक्त करण्यात येईल. या वेळी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ अन् अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांनी कोणतेही कारण नसतांना विनाकारण सनातन संस्थेचा विषय काढून तिला लक्ष्य करत तिच्यावर बंदीची मागणी केली.

(म्हणे) ‘सनातन संस्थेवर देशव्यापी बंदी घालावी !’ – छगन भुजबळ, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री

सनातन संस्था ही जीवघेणी समस्या आहे. यातील अनेकांनी बाँबस्फोट आणि खून केले आहेत. या संस्थेचे सदस्य विविध गुन्ह्यांत सापडले आहेत. ही संस्था महाराष्ट्र, कर्नाटक, मध्यप्रदेश आणि गोवा, तसेच देशभर कार्यरत आहे. अशी संस्था अनेक राज्यांत असेल, तर भारत सरकारने यामध्ये हस्तक्षेप करून सनातन संस्थेवर बंदी घातली पाहिजे. संस्थेचे कार्यक्षेत्र देशात सर्वत्र असल्याने या संस्थेवर कारवाई झाल्यास अनेकांचे जीव वाचतील.’’

(म्हणे) ‘डॉ. कलबुर्गी आणि डॉ. दाभोलकर यांची हत्या करण्यामागे सनातनसारख्या संघटनांचा हात आहे !’ – नवाब मलिक, अल्पसंख्यांकमंत्री

आदित्य ठाकरे यांना ज्याप्रकारे धमकीचे पत्र आले, त्याचप्रकारे मलाही ‘ट्विटर’वर धमक्या येत आहेत. डॉ. कलबुर्गी आणि डॉ. दाभोलकर यांची हत्या करणार्‍यांच्या मागे सनातनसारख्या संघटनांचा हात आहे. गोवा आणि कर्नाटक येथे भाजपचे सरकार असल्यामुळे सनातन संस्थेची पाठराखण केली जाते. ट्विटरवरील धमक्या, तसेच कलबुर्गी आणि दाभोलकर हत्या प्रकरण हे सर्व एकमेकांशी जोडलेले आहेत. या सर्व प्रकरणांची चौकशी करण्यासाठी आय.पी.एस्. दर्जाच्या अधिकार्‍यांची नियुक्ती करून, तसेच विशेष अन्वेषण पथक (एस्.आय.टी.) स्थापन करून चौकशी व्हावी.’’


हे वाचा : सनातन संस्थेवरील आरोप खोटे आणि राजकीय हेतूने प्रेरित ! – श्री. चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था


महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने २ वर्षांत सनातन संस्थेवर कारवाई का केली नाही ? – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

आदित्य ठाकरे यांना धमकी दिल्याच्या गंभीर प्रकरणाला आमदार सुनील प्रभु यांनी राजकीय रूप देण्याचा प्रयत्न केला. डॉ. कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्या कर्नाटकात, तर डॉ. नरेंद्र दाभोलकर अन् कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्या महाराष्ट्रात झाल्या. या २ प्रकरणांतील आरोपी महाराष्ट्रातील होते. कर्नाटक असो वा महाराष्ट्र अथवा अन्य कुठलेही असो. गुन्हेगार हे गुन्हेगारच असतात. प्रत्येक प्रकरणाला राजकीय रंग देणे, हे लाभाचे नसते. रझा अकादमीचीही चौकशी करावी. सनातनचा विषय असेल, तर गेल्या २ वर्षांपासून महाराष्ट्रात तुमचे सरकार आहे. सनातनच्या संदर्भात तुमच्याकडे जर पुरावे आहेत, तर तुम्ही २ वर्षांपासून या संस्थेवर कारवाई का केली नाही ? असे फाटे फोडून प्रत्येक जण स्वतःचा स्वार्थ साधून घेत आहे.

फडणवीस पुढे म्हणाले, ‘‘यापूर्वीही काँग्रेसचे सरकार असतांना वर्ष २०१२ मध्ये सनातनवर बंदी घालण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता; मात्र त्या संदर्भात कोणतेही ठोस पुरावे न दिल्याने त्याचे पुढे काही झाले नाही. वर्ष २०१३ मध्ये हत्या झाल्यानंतर पुन्हा हा प्रश्‍न निर्माण झाला होता. त्या वेळी सनातन संस्थेवर बंदी घालण्याची घोेषणा झाली होती; मात्र प्रत्यक्षात पुरावे मिळाले नाहीत. आम्ही सत्तेत ५ वर्षे होतो, आता २ वर्षे तुम्ही आहात. कोणतीही संघटना आतंकवादी कारवायांमध्ये (‘टेरेर अ‍ॅक्टिव्हिटीज्’मध्ये) असेल, मग ती संघटना रझा अकादमी असो अथवा सनातन संस्था असो, तिचे आम्ही कुणीच समर्थन करणार नाही. हे एक अत्यंत मर्यादित आणि महत्त्वाचे सूत्र आहे.’’