देवतांविषयी भाव असलेला चि. अधोक्षज अमित सेलूकर !

देवतांविषयी भाव असलेला ५३ टक्के आध्यात्मिक पातळीचा अंबाजोगाई (बीड) येथील चि. अधोक्षज सेलूकर (वय ५ वर्षे) !

मार्गशीर्ष शुक्ल पक्ष चतुर्दशी (१७.१२.२०२१) या दिवशी अंबाजोगाई (बीड) येथील चि. अधोक्षज अमित सेलूकर याचा पाचवा वाढदिवस झाला. त्या निमित्त त्याच्या आईला त्याच्या जन्मापूर्वी जाणवलेली सूत्रे आणि त्याच्या जन्मानंतर जाणवलेली त्याची गुणवशिष्ट्ये पुढे दिली आहेत. (‘अधोक्षज’ हे श्रीविष्णूचे एक नाव आहे.’ – संकलक)

‘सनातन मध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे’ मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – परात्पर गुरु डॉ. आठवले

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

चि. अधोक्षज सेलूकर

चि. अधोक्षज याला ५ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

१. गर्भारपण

सौ. धनश्री सेलूकर

१ अ. १ ते ३ मास

शाळेतील विद्यार्थ्यांकडून प्रार्थना, श्लोक, स्तोत्रे इत्यादी म्हणवून घेण्याची सेवा मिळणे आणि त्यातून आनंद मिळू लागणे : ‘गर्भधारणा झाल्यावर मला पुष्कळ सकारात्मक वाटत होते. या कालावधीत माझ्याकडे शाळेत परिपाठ घेण्याची सेवा होती. या वेळी मी विद्यार्थ्यांकडून प्रार्थना, श्लोक, गणपतिस्तोत्र, रामरक्षा, भगवद्गीतेतील १२ वा आणि १५ वा अध्याय म्हणवून घ्यायचे. तेव्हा ‘या माध्यमातून देवच बाळावर उपाय करवून घेत आहे’, असे वाटून माझ्याकडून देवाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली. ‘परिपाठाचा वर्ग हा जणूकाही गर्भसंस्काराचा वर्ग आहे’, असे वाटून मला पुष्कळ आनंद मिळू लागला.

१ आ. ४ ते ९ मास

१ आ १. पोटावर हात ठेवून ‘चंडीकवच’ म्हणत असतांना पोटातील बाळाच्या शरिराभोवती सूक्ष्मातून गोल वर्तुळ निर्माण झालेले दिसणे : गर्भधारणा झाल्यापासून सतत नामजप होण्यासाठी मी भ्रमणभाषवर नामजप लावून ठेवत असे. ४ थ्या मासात एकदा मी पोटावर हात ठेवून ‘चंडीकवच’ म्हणत होते. तेव्हा मला पोटातील बाळाच्या शरिराभोवती सूक्ष्मातून गोल वर्तुळ निर्माण झालेले दिसले. तेव्हा ‘बाळाभोवती चैतन्याचे कवच निर्माण झाले आहे’, असे मला वाटले.

१ आ २. त्या कालावधीत मला सतत परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा हसरा तोंडवळा दिसत होता.

१ आ ३. मी प्रतिदिन भ्रमणभाषवर हरिपाठ ऐकत होते.

१ आ ४. पितृपक्षात दत्ताचा नामजप करतांना ‘बाळाची वाढ चांगली होत आहे’, असे मला जाणवले.

१ आ ५. सेवा केल्यावर हलकेपणा जाणवणे आणि ‘आणखी सेवा करावी’, असे वाटणे : भाद्रपद मासात श्री गणेशचतुर्थीच्या काळात मी गणपति मंदिरात सनातनच्या सात्त्विक उत्पादनांच्या प्रदर्शनकक्षावर सेवा केली. सेवेत असतांना मला माझे शरीर पुष्कळ हलके जाणवत होते आणि ‘आणखी सेवा करावी’, असे वाटत होते.

१ आ ६. स्वप्नात ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे दर्शन होणे अन् सकाळी जाग येण्यापूर्वी ‘डोक्याच्या मागून सूर्यप्रकाश येत आहे’, असे जाणवणे : एकदा रात्री मला स्वप्नात दिसले, ‘ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज ध्यानस्थ बसले आहेत. मी त्यांना नमस्कार केला. त्यांच्या पाठीमागे मला प.पू. गुरुमाऊलींचा (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा) हसरा तोंडवळा दिसला.’ सकाळी जाग येण्यापूर्वी ‘माझ्या डोक्याच्या मागून सूर्य उगवल्याप्रमाणे पुष्कळ प्रकाश येत आहे’, असे मला जाणवले. त्या वेळी मला आनंद वाटत होता.

२. जन्म ते ४ मास

२ अ. संतांचे आशीर्वाद मिळणे

२ अ १. उमरखेड (जिल्हा यवतमाळ) येथील माधवानंद महाराज : अधोक्षज १ मासाचा असतांना आमच्याशेजारी रहाणार्‍या काकूंकडे (सौ. उषा अशोक कुलकर्णी (कुंडीकर) यांच्याकडे) माझ्या आईचे गुरु उमरखेड (जिल्हा यवतमाळ) येथील माधवानंद महाराज आले होते. आम्ही त्यांच्या दर्शनासाठी गेलो होतो. तेथे दर्शनासाठी पुष्कळ मोठी रांग होती; परंतु अधोक्षजला पाहून महाराजांनी आम्हाला पुढे बोलावून घेतले आणि त्याला मांडीवर बसवून आशीर्वाद दिला.

२ अ २. पाथर्डी (जिल्हा नगर) येथील ह.भ.प. मुकुंदकाका जाडदेवळेकर : अधोक्षज ४ मासांचा असतांना आम्ही पाथर्डी (जिल्हा नगर) येथील माझ्या मावस बहिणीकडे (सौ. मंजिरी जाडदेवळेकर यांच्याकडे) गेलो होतो. तिचे सासरे संत ह.भ.प. मुकुंदकाका जाडदेवळेकर भागवत सांगतात. ते अखंड श्रीकृष्णाचा नामजप करतात. त्यांना भेटल्यावर त्यांनी लगेच बाळाला मांडीवर घेतले. त्यांनी त्याच्या तोंडवळ्यावरून प्रेमाने हात फिरवून त्याचे नाव विचारले. बाळाचे ‘अधोक्षज’ हे नाव सांगितल्यावर ते म्हणाले, ‘‘वा ! छान नाव आहे. तुझा मुलगा छान आहे.’’ त्यांनी अधोक्षजला आशीर्वाद दिला. तेव्हा ‘इतक्या लहान वयात त्याला संतांचे आशीर्वाद मिळाले’, ही गुरुकृपाच आहे’, असे मला जाणवले.

३. वय १ ते २ वर्षे : त्याची आजी (सौ. अश्विनी सेलूकर (वडिलांची आई)) अधोक्षजला झोपवतांना, औषध देतांना आणि जेवण भरवतांना देवतांची आरती, रामरक्षा किंवा विष्णुसहस्रनाम म्हणत असे. त्या वेळी तो ते शांतपणे ऐकत असे.

४. वय ३ ते ४ वर्षे 

अ. तो प्रतिदिन जेवतांना आणि अंघोळ करतांना श्रीकृष्णाला प्रार्थना करतो. रात्री झोपतांना तो त्याच्या बाबांच्या समवेत (श्री. अमित सेलूकर यांच्या समवेत) निद्रादेवीला प्रार्थना करतो. त्याचे बाबा विसरले, तर तो त्यांना प्रार्थना करण्याचे स्मरण करून देतो.

आ. अधोक्षज त्याच्यासाठी आणलेली कोणतीही वस्तू किंवा पदार्थ त्याच्या भावंडांनाही देतो. त्यांची एखादी वस्तू हवी असल्यास अधोक्षज त्यांना ‘घेऊ का ?’, असे प्रेमाने विचारतो.

इ. तो अत्तर आणि कापूर यांचे उपाय करतो.

५. रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेल्यावर चि. अधोक्षज याच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे

अ. वर्ष २०१९ मध्ये आम्ही गोव्याला रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेलो होतो. तेथे अधोक्षज सर्व गोष्टींचे निरीक्षण करत होता.

आ. ध्यानमंदिरात गेल्यावर त्याने सर्व देवतांना हात जोडून नमस्कार केला.

इ. त्याने परात्पर गुरुदेवांनी पूर्वी अध्यात्मप्रसारासाठी वापरलेल्या चारचाकी गाडीला डोके टेकवून नमस्कार केला आणि तिला प्रदक्षिणा घातली.

६. चि. अधोक्षजमधील स्वभावदोष : हट्टीपणा आणि राग येणे’

– सौ. धनश्री अमित सेलूकर (चि. अधोक्षजची आई), अंबाजोगाई, बीड. (७.१२.२०२१)


यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.


• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक