फलटण, २२ डिसेंबर (वार्ता.) – तालुक्यातील शेतकर्यांची शेती पंपाची वीजदेयके त्यांची पूर्वसंमती घेऊन संबंधित साखर कारखान्याच्या माध्यमातून ऊस देयकातून वसूल करावीत; मात्र कोणत्याही परिस्थितीत शेती पंपाचा वीजपुरवठा खंडित करू नये, असे निर्देश विधानपरिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर यांनी दिले. येथील पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते. या वेळी लोकप्रतिनिधी, महावितरणचे अधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते.
रामराजे नाईक-निंबाळकर म्हणाले, ‘‘तालुक्यातील वीजपंपाची जोडणी तोडण्याचे काम मोठ्या प्रमाणात चालू आहे. विद्युत् जनित्राचाच वीजपुरवठा खंडित केल्यामुळे नियमित वीजदेयके भरणार्यांवर अन्याय होत आहे. त्यांच्या पिकांची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे. शेतकर्यांनी वीजदेयकांविषयी संबंधित साखर कारखान्यांना संमतीपत्र भरून देणे आवश्यक आहे.
महावितरणच्या विरोधात ‘बळीराजा शेतकरी संघटना’ आक्रमकउच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शेती पंपाचा वीजपुरवठा खंडित करण्यापूर्वी शेतकर्यांना १५ दिवस अगोदर लेखी सूचना देण्यात यावी, असे नमूद केले आहे; मात्र महावितरणने या आदेशाची पायमल्ली केली आहे. राज्य सरकारकडून अनुदान घेत असल्यामुळे महावितरणला थकीत वीजदेयकांचे कारण सांगून शेती पंपाचा वीजपुरवठा खंडित करता येणार नाही. या विरोधात ‘बळीराजा शेतकरी संघटने’च्या वतीने महावितरणच्या अधिकार्यांवर गुन्हे नोंदवण्यात येणार आहेत. तसेच संबंधित शेतकर्यांची वीजजोडणी तात्काळ जोडली नाही, तर शेतकरी बांधवांना संघटित करून ‘आक्रोश मोर्चा’ काढण्यात येईल, अशी चेतावणी बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे. |