स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या अध्यक्षपदाची निवडणूक !
मुंबई – काँग्रेसची नेतेमंडळी सतत स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अपमानित करण्याचे निमित्त शोधत असतात. ‘शिदोरी’ या काँग्रेसच्या मुखपत्रामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अत्यंत अर्वाच्च भाषेत अपमान करण्यात आला. अशा काँग्रेसी विचारसरणीचे पाईक असलेले दीपक टिळक हे स्वातंत्र्यवीर सावरकरप्रेमी असल्याचे ढोंग करत आहेत. या अध्यक्षपदासाठी नैतिकदृष्ट्या ते पात्र नाहीत, अशी टीका स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्यवाह श्री. राजेंद्र वराडकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
प्रसिद्धीपत्रकामध्ये श्री. राजेंद्र वराडकर यांनी म्हटले की,
१. स्वातंत्र्यवीर सावरकर यांची अपकीर्ती करणार्या ‘एबीपी माझा’ आणि ‘द विक’ या माध्यमांच्या विरोधात स्मारकाने लढा दिला. अशा अनेक प्रकरणांत दीपक टिळक यांनी ठोस भूमिका घेतली नाही. स्वतः संपादक असलेल्या दैनिक ‘केसरी’मध्येही त्यांनी याविषयी निषेधाची एक ओळही लिहिली नाही.
२. त्यांच्या अध्यक्षपदाखाली चाललेल्या लोकमान्य टिळक स्मारकाच्या वतीने दिला जाणारा ‘टिळक पुरस्कार’ अनेक काँग्रेसी नेत्यांना मिळाला; मात्र अद्याप एकाही सावरकरनिष्ठ व्यक्तीला हा पुरस्कार दिला गेला नाही. अशा व्यक्तीने स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या अध्यक्षपदाची इच्छा धरावी, हे कुठल्याही सावरकरप्रेमी व्यक्तीला पटणारे नाही.
३. दीपक टिळक यांना स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक पूर्णपणे कह्यात घेऊन तेथे टिळक महाराष्ट्र विद्यापीठ स्थापन करायचे होते. स्मारकाची जागा अत्यंत नाममात्र भाड्यात टिळक विद्यापिठाला द्यावी, असा ठराव त्यांनी १९ फेब्रुवारी २००६ या दिवशीच्या कार्यकारीच्या बैठकीत त्यांनी ठराव मांडला होता; पण विश्वस्त मंडळाने ‘जागा भाड्याने द्यायची नाही’, असा प्रस्ताव पारित केल्याने हा ठराव रहित झाला.
४. नोव्हेंबर २००६ मध्ये दीपक टिळक यांनी स्मारकाच्या अध्यक्षपदासाठी उमेदवारी घोषित केली होती; मात्र सर्वसाधारण सभेची प्रतिकूलता बघून अंतिम क्षणी त्यांनी माघार घेतली. त्या दिवसापासून आजतागायत दीपक टिळक यांनी स्मारकाच्या कार्याकडे पूर्णत: दुर्लक्ष केले आहे.
५. आता मात्र प्रसिद्धीपत्रकात ‘सावरकर स्मारक अत्यंत डबघाईला आले असून आपल्या व्यवस्थापन कौशल्याने स्मारक वैभवशाली करू’, असा दावा टिळक करत आहेत. असंख्य सावरकरप्रेमी स्मारकापासून दुरावले असल्याचा कपोलकल्पित दावाही त्यांनी केला आहे. प्रत्यक्षात मागील १५ वर्षे सावरकर स्मारकाचे कार्य यशस्वी रितीने चालू आहे.
६. स्मारकाच्या कार्याविषयी ज्यांना आस्था आणि प्रेम आहे, ते स्मारकात सदोदित येतात. टिळक यांच्याप्रमाणे ज्यांना स्मारकातून आर्थिक लाभ उकळता आला नाही, तेच स्मारकापासून दूर गेले असून स्मारकाची खोटी अपकीर्ती करत आहेत.
७. दीपक टिळक स्वतः संपादक असलेल्या लोकमान्य टिळक यांच्या ‘केसरी’ या वृत्तपत्राचे स्वरूप आज अत्यंत दयनीय स्थितीत आहे. पैशांसाठी केसरीवाड्यात लग्नाचे सभागृह चालवणार्या दीपक टिळक यांनी स्वत:चे व्यवस्थापन दाखवून दिले आहे.