कराची (पाकिस्तान) येथे धर्मांधांकडून हिंदूंच्या मंदिराची आणि मूर्तींची तोडफोड

  • गेल्या २२ मासांमध्ये ९ मंदिरांवर आक्रमणे

  • परराष्ट्र मंत्री एस्. जयशंकर यांनी हा विषय जागतिक स्तरावर न्यावा, अशी भाजपचे नेते मनजिंदर सिंह सिरसा यांची मागणी

  • पाकमध्ये कुराण आणि महंमद पैगंबर यांचा अवमान झाल्यावर ईशनिंदेवरून फाशीची शिक्षा केली जाते; मात्र हिंदूंच्या संदर्भात अशा घटना घडल्यास काहीच होत नाही, हे लक्षात घ्या ! – संपादक
  • पाकमध्ये हिंदूंचा वंशसंहार होत असतांना मानवाधिकार संघटना, निधर्मी आणि पुरो(अधो)गामी काहीच करत नाहीत, यातून त्या किती ढोंगी आहेत, हे स्पष्ट होते ! – संपादक
  • गेल्या अनेक वर्षांपासून पाकमध्ये हिंदू आणि त्यांच्या धार्मिक स्थळांवर आक्रमणे केली जात आहेत. त्यामुळे हे सूत्र भारत सरकारने यापूर्वीच जागतिक स्तरावर नेणे आवश्यक होते. यासाठी आताही अशी मागणी करावी लागते, हे हिंदूंना अपेक्षित नाही ! – संपादक
श्री दुर्गादेवीच्या मूर्तीची तोडफोड

कराची (पाकिस्तान) – येथील नारायण पुरामधील रणछोड लाइन विभागात एका हिंदु मंदिरात दोघा धर्मांधांनी प्रवेश करून हातोड्याने श्री दुर्गादेवीच्या दोन मूर्तींची तोडफोड केली, तसेच मंदिराचीही हानी केली. हिंदूंनी घटनास्थळीच दोघा धर्मांधांपैकी महंमद वलिद याला पकडून पोलिसांच्या कह्यात दिले. त्यांच्याविरोधात ईशनिंदेचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तोडफोडीची माहिती मिळताच येथे तणावाची स्थिती निर्माण झाली. तोडफोडीनंतर आंदोलन करण्यात आले. हिंदूंनी दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. या वेळी येथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या घटनेच्या काही आठवड्यांपूर्वी सिंधमध्ये एका मंदिराची तोडफोड करून तेथील संपत्ती चोरून नेण्यात आली होती. पाकमध्ये गेल्या २२ मासांमध्ये मंदिरांवर आक्रमण होणारी ही ९ वी घटना आहे.

भाजपचे नेते मनजिंदर सिंह सिरसा यांनी मंदिराच्या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित करत म्हटले आहे, ‘कराचीमध्ये मंदिराची तोडफोड करण्यात आली आहे. ‘मंदिर प्रार्थनास्थळ होण्यास पात्र नाही’, असे सांगून आक्रमणकर्त्यांनी तोडफोडीचे समर्थन केले. हे पाकिस्तानातील अल्पसंख्यांक हिंदूंविरुद्ध राज्य-समर्थित आतंकवादी कृत्य आहे.’ तसेच सिरसा यांनी परराष्ट्र मंत्री एस्. जयशंकर यांना सीमेपलीकडील हिंदू आणि शिख यांच्या धर्मस्वातंत्र्याला पाठिंबा देण्यासाठी जागतिक स्तरावर हे सूत्र उपस्थित करण्याची मागणी केली आहे.

वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक