पानवळ, बांदा (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील प.पू. दास महाराज यांचे खडतर बालपण आणि प.पू. भगवानदास महाराज अन् पू. रुक्मिणीमाता या विरागी दांपत्याने त्यांचा केलेला सांभाळ !

२०.१२.२०२१ या दिवशी प.पू. दास महाराज यांचा सहस्रचंद्रदर्शन विधी आहे. त्यानिमित्ताने…

२०.१२.२०२१ या दिवशी प.पू. दास महाराज यांचा सहस्रचंद्रदर्शन विधी आहे. त्यानिमित्ताने प.पू. दास महाराज यांच्या खडतर बालपणातील काही अनुभवांविषयी आपण आज जाणून घेणार आहोत.

प.पू. दास महाराज आणि त्यांची पत्नी सनातनच्या संत पू. (सौ.) लक्ष्मी (माई) नाईक यांची प्रीती साधक भरभरून अनुभवत असतात. ‘जया अंगी मोठेपण । तया यातना कठीण ।।’, या संत तुकाराम महाराज यांच्या अभंगातील ओळी हे लिखाण वाचतांना अनुभवास येतात.

(भाग १)

प.पू. दास महाराज आणि पू. (सौ.) लक्ष्मी नाईक

१. जन्म आणि बालपण

१ अ. गिरगाव येथील सरकारी रुग्णालयात जन्म : ‘८.२.१९४२ या दिवशी सकाळी ६ वाजता गिरगाव (मुंबई) येथील सरकारी रुग्णालयात माझा जन्म झाला. माझ्या वडिलांचे नाव श्री. भास्करराव कर्‍हाडकर आणि आईचे नाव सौ. कमलाबाई भास्करराव कर्‍हाडकर होते. ते मूळचे कराडचे होते. ते व्यवसायासाठी कुटुंबासह मुंबईला येऊन राहिले होते. ते पुष्कळ श्रीमंत होते. त्यांना दोन मुली होत्या. त्या मुलींच्या जन्मानंतर १० – १५ वर्षांनी माझा जन्म झाला. त्या वेळी माझ्या बहिणींची लग्ने झाली होती. माझा आणि बहिणींचा कधीच संपर्क झाला नाही.

१ आ. जन्माच्या आधी वडिलांचा आणि जन्मानंतर लगेचच आईचा मृत्यू होणे : माझ्या जन्माच्या वेळी वडिलांनी आईला रुग्णालयात भरती केले होते. त्या वेळी हिंदू-मुसलमान दंगल चालू होती. धर्मांध सगळीकडे गोळीबार करत होते. त्यांचा प्रतिकार करण्यासाठी आणि त्यांच्या गोळ्या परतवण्यासाठी हिंदूंना एकत्र करून त्यांचे गट सिद्ध केले होते. त्यांनी पत्र्यांच्या ढाली सिद्ध केल्या होत्या. बंदुकीच्या गोळ्या आल्या की, त्या ढालीने ती गोळी अडवायची, असे चालू होते. माझे वडील अशा एका गटाचे प्रमुख होते. त्यामुळे धर्मांधांनी त्यांनाच ठार करायचे ठरवले. माझे वडील कामावरून घरी येत असतांना धर्मांधांनी त्यांच्यावर गोळीबार करून त्यांना ठार मारले. त्या वेळी आई रुग्णालयात होती. वडील मारले गेल्याचे आईला कळले. त्या वेळी त्याच दुःखात तिची प्रसुती होऊन माझा जन्म झाला अन् तिचा मृत्यू झाला. आई-वडील दोघेही गेल्यामुळे मी अनाथ झालो.

१ इ. परिचारिकेने वर्तमानपत्रात ‘एक मूल रुग्णालयात आहे, कुणाला हवे असल्यास घेऊन जावे’, असे वृत्त देणे : परिचारिकेने माझ्या गळ्यात ‘आडनाव, जन्मदिनांक आणि जन्मवेळ’ लिहिलेला कागद एका ताईतात बांधून अडकवला. त्यानंतर तिने वर्तमानपत्रात वृत्त दिले, ‘ब्राह्मणाचे एक मूल रुग्णालयात आहे. कुणाला हवे असल्यास घेऊन जावे.’

१ ई. विज्ञापनाविषयी समजल्यावर वत्सलाताईंच्या भाडेकरू बाईंनी त्या बाळाला घरी आणणे आणि त्यानंतर त्यांच्या यजमानांचे निधन झाल्यावर त्यांनी बाळाला घराबाहेर रस्त्यात ठेवून देणे : रत्नागिरीचे भांभूकाका जोशी यांची बहीण वत्सला मुंबई येथे रहात होती. त्यांच्याशेजारी रहाणार्‍या भाडेकरू बाईंनी वर्तमानपत्रातील ते वृत्त वाचले. त्यांनी वत्सलाताईंना सांगितले, ‘‘गिरगाव येथील रुग्णालयात एक अनाथ बालक आहे. ‘ते बालक ज्यांना हवे आहे, त्यांनी ते घेऊन जावे’, असे वर्तमानपत्रात विज्ञापन आले आहे.’’ त्या वेळी वत्सलाताईंनी भाडेकरू बाईंना सांगितले, ‘‘तूच आण. तुला मूल नाही ना !’’ त्यानुसार भाडेकरू बाईंनी रुग्णालयात जाऊन मुलाची चौकशी केली. परिचारिकेने त्यांना सर्व माहिती दिली.

त्या बाईंनी मला तिच्या घरी नेले. त्यानंतर १५ दिवसांतच त्या बाईंच्या यजमानांचे निधन झाले. ‘माझ्यामुळे यजमान गेले’, असे वाटून त्या बाईंनी मला घराबाहेर रस्त्यात ठेवून दिले.

१ उ. वत्सलाताईंनी बाळाचा सांभाळ करणे आणि त्या वेळी बाळाला कडेवर घेऊन जात असतांना दगडाला पाय लागून त्यांचे जागीच निधन होणे : मला रडतांना पाहून वत्सलाताईंनी मला उचलून घेतले आणि त्या माझा सांभाळ करू लागल्या. वत्सलाताई काही दिवसांनी मला घेऊन रत्नागिरी येथे त्यांच्या भावाकडे आल्या. त्यांचे भाऊ भांभूकाका जोशी मोठे ज्योतिषी होते. वत्सलाताईंनी त्यांना माझी कुंडली पहायला सांगितले.

त्या वेळी मी एक वर्षाचा होतो. एकदा वत्सलाताई मला कडेवर घेऊन काही कामानिमित्त बाहेर जात असतांना दगडाला पाय लागून खाली पडल्या आणि त्यांचे जागीच निधन झाले. हे गावातील लोकांनी त्यांच्या भावाला सांगितले. अशा प्रकारे मला सांभाळणारी २ माणसे दगावली होती.

१ ऊ. ज्योतिषी भांभूकाका जोशी यांनी बाळाची कुंडली पाहून सांगितलेले भविष्य : जोशीकाकांनी माझी कुंडली बारकाव्यांनिशी मांडली. त्यांनी माझी कुंडली पाहून सांगितले, ‘‘हा मुलगा संसारी व्यक्तीजवळ राहिला, तर तिला सुख देणार नाही. हा मुलगा वैरागी साधूजवळच चांगला राहू शकेल आणि त्यांना सुख देईल; पण जे साधू याला स्वीकारतील, त्यांना तीव्र विषमज्वर होईल. त्यांना ४० दिवस विषमज्वराचा त्रास होईल. त्यामुळे या बाळाला सांभाळणारा तेवढ्या योग्यतेचा पाहिजे.’’ जोशीकाकांनीच तशी व्यक्ती मिळेपर्यंत माझा सांभाळ केला.

१ ए. बहिणींशी कधीच संपर्क न होणे : माझा माझ्या बहिणींशी कधीच संपर्क झाला नाही. मी १ – २ वेळा बहिणींना संपर्क करण्याचा प्रयत्न केला; पण त्यांच्या यजमानांनी मला संपर्क करू दिला नाही. ‘मी संपत्तीचा वाटा मागीन कि काय ?’, या भीतीने त्यांनी मला संपर्क करू दिला नाही. नंतर मीही संपर्क करणे सोडून दिले.’

(क्रमशः)

– प.पू. दास महाराज, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (७.२.२०२१)

पुढील भाग वाचण्यासाठी https://sanatanprabhat.org/marathi/536908.html या लिंकवर क्लिक करा.