गांधी जयंतीच्या दिवशी ‘गोडसे झिंदाबाद’ बोलणार्‍याला फाशी दिली पाहिजे ! – भाजपचे खासदार वरुण गांधी

  • भारताच्या फाळणीला, तसेच राष्ट्राविषयीच्या आणि हिंदूंविषयीच्या अन्य अनेक घोडचुकांना उत्तरदायी असणार्‍या म. गांधी यांच्याविषयी लोकांना त्यांचे मत मांडण्याचा अधिकार राज्यघटनेने दिला आहे ! – संपादक
  • भारताच्या फाळणीला आणि त्यानंतर झालेल्या १० लाख हिंदूंच्या हत्यांना उत्तरदायी असणार्‍यांना कोणतीही शिक्षा झाली नाही, याविषयी वरुण गांधी यांनी बोलले पाहिजे !
  • गांधी आणि नेहरू कुटुंबियांनी देशाची जी काही अधोगती केली आहे, त्याविषयी वरुण गांधी यांनी बोलले पाहिजे !
  • देशासाठी सर्वस्व अर्पण करणारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ‘माफीवीर’ यांसारख्या अश्‍लाघ्य शब्दांत हिणवले जाते. क्रांतीकारकांना ‘आतंकवादी’ ठरवून स्वातंत्र्यलढ्यातील त्यांच्या योगदानाला मातीमोल केले जाते. अशी टीका करणार्‍यांना फाशी द्यावी की नाही, यावर वरुण गांधी का बोलत नाहीत ?

पिलिभीत (उत्तरप्रदेश) – म. गांधी यांच्या जयंतीच्या दिवशी ‘गोडसे जिंझाबाद’ बोलणार्‍या लोकांना फाशी दिली पाहिजे. भगवान श्रीराम मर्यादापुरुषोत्तम होते. ज्यांनी लोकांना जोडण्याचे काम केले, त्या गांधीजींच्या जयंतीच्या दिवशी ‘गोडसे झिंदाबाद’ हा ट्रेंड केला जातो (ट्विटरवर चर्चा घडवून आणली जाते), अशी टीका भाजपचे खासदार वरुण गांधी यांनी येथे केली. ते त्यांच्या पिलिभीत मतदारसंघात अंगणवाडी सेविका आणि अन्य महिला कर्मचारी यांच्याशी संवाद साधत होते.

वरुण गांधी पुढे म्हणाले की, मी येथे काही मुख्यमंत्र्यांना किंवा पंतप्रधानांना निवेदन देण्यासाठी आलेलो नाही. मी देशाचे राजकारण करायला आलो आहे. आज माझ्यासमोर पूर्ण देश बसला आहे. माझ्यासमोर ना कुणी हिंदू आहे ना कुणी मुसलमान, ना कुणी पुढारलेला आहे, ना कुणी मागास. असा भेद करून आपण भारताला दुर्बल करत आहोत. आता ‘जय श्रीराम’ नाही, तर ‘जय हिंद’ म्हणायची वेळी आली आहे.