सहस्रचंद्रदर्शन शांती विधीनिमित्त प.पू. दास महाराज आणि पू. (सौ.) लक्ष्मी (माई) नाईक यांचे हृद्य मनोगत अन् साधकांनी उभयतांची उलगडलेली गुणवैशिष्ट्ये !

२०.१२.२०२१ या दिवशी प.पू. दास महाराज यांचा सहस्रचंद्रदर्शन विधी आहे. त्यानिमित्ताने…

प.पू. दास महाराज यांच्या सहस्रचंद्रदर्शन शांती विधी सोहळ्यानिमित्त त्यांच्या चरणी सनातन परिवाराच्या वतीने कृतज्ञतापूर्वक नमस्कार !

प.पू. दास महाराज

प.पू. दास महाराज यांनी सहस्रचंद्रदर्शन शांती विधीनिमित्त व्यक्त केलेली कृतज्ञता !

‘माझे नातेवाईक, भक्तगण आणि साधक मला अनेक दिवसांपासून आग्रह करायचे, ‘‘तुमचा ‘सहस्रचंद्रदर्शन शांती विधी सोहळा’ साजरा करूया.’’ त्या वेळी मी त्यांना सांगायचो, ‘‘परात्पर गुरु डॉक्टरांचा सोहळा तोच माझा सोहळा आहे. अन्य सोहळा करायला नको.’’

१६.१२.२०२१ या दिवशी परात्पर गुरु डॉक्टरांनी मला निरोप पाठवला, ‘‘तुम्ही ८० व्या वर्षात पदार्पण करणार आहात. तुमचा ‘सहस्रचंद्रदर्शन शांती विधी सोहळा’ पानवळ-बांदा (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील राममंदिरात साजरा करायचा आहे.’’ मला त्यांचे बोलणे नाकारता आले नाही.

परब्रह्म, विष्णुस्वरूप आणि सच्चिदानंदरूपी अशा या परमात्म्याच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपेने माझा ‘सहस्रचंद्रदर्शन शांती विधी सोहळा’ होत आहे. त्यांच्या रूपात भगवान श्रीधरस्वामी माझा हा सोहळा साजरा करत आहेत. ‘माझे गुरु माझा सहस्रचंद्रदर्शन सोहळा करत आहेत’, हे माझे परम भाग्य आहे. माझ्या जन्माचे सार्थक झाले. आम्ही उभयतां (प.पू. दास महाराज आणि त्यांच्या पत्नी पू. (सौ.) लक्ष्मी नाईक) तर उद्धरूनच गेलो.

‘पुनरपि जननं पुनरपि मरणम् ।’ म्हणजे ‘पुनःपुन्हा जन्म होणे आणि मृत्यू होणे’, यातून सद्गुरु परम पूज्यांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपेने आमची मुक्तता झाली आणि आज त्यांच्या कृपेने माझा सहस्रचंद्रदर्शन शांती विधी सोहळा होत आहे. याहून दुसरा कपिलाषष्ठी योग (अत्यंत दुर्मिळ योग) कुठला ? आम्ही उभयतां श्रीधरस्वामी आणि सद्गुरु परम पूज्य यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.

।। जय जय रघुवीर समर्थ ।।’

– प.पू. दास महाराज, पानवळ-बांदा, जिल्हा सिंधुदुर्ग. (१८.१२.२०२१)

पू. (सौ.) लक्ष्मी नाईक (माई)

पू. (सौ.) लक्ष्मी (माई) नाईक यांनी व्यक्त केलेली कृतज्ञता !

‘प.पू. दास महाराज यांचा ‘सहस्रचंद्रदर्शन शांती विधी सोहळा’ हे माझ्या आयुष्यातील पहिलेच कार्य आहे. मी प्रथमच एवढे मोठे कार्य बघत आहे. ‘प.पू. दास महाराज यांचा ‘सहस्रचंद्रदर्शन शांती विधी सोहळा’ साजरा होईल’, असे मला वाटले नव्हते. गुरुवर्य आणि साधक यांनी हा सोहळा घडवून आणला आहे. माझ्या आनंदाला उधाण आले आहे. मला काहीच सुचेनासे झाले आहे.

श्रीरामराया, मारुतिराया, प.पू. भगवानदास महाराज, पू. रुक्मिणीमाता, श्री गजानन महाराज, भगवान श्रीधरस्वामी महाराज आणि प.पू. गुरुदेव यांच्या चरणीही मी पुष्कळ कृतज्ञ आहे. त्यांच्याच आशीर्वादाने हा सोहळा चांगला होत आहे. आमचा गौतमारण्य आश्रम रामरायाच्या नामजपाने दुमदुमल्यासारखा आहे. रामराया तिथे वावरत आहे. रामरायाच सर्व करत आहेत. मला वाटले नव्हते, ‘ह्यांचा वाढदिवस मोठा सण साजरा केल्याप्रमाणे होईल.’ हे माझ्या ध्यानी-मनीही नव्हते. गुरुदेवांनी एवढे सर्व घडवून आणले. गुरुदेवच सर्व करत आहेत. आम्ही काहीच करत नाही. तेच आमचे शरीर चालवत आहेत. त्यांच्याच कृपेने हे सगळे चालले आहे. त्यांच्या चरणी मी कोटीशः कृतज्ञ आहे.’

– पू. (सौ.) लक्ष्मी (माई) नाईक (प.पू. दास महाराज यांच्या पत्नी, वय ७३ वर्षे), पानवळ-बांदा, जिल्हा सिंधुदुर्ग. (१८.१२.२०२१)

 

प.पू. दास महाराज यांच्या ‘सहस्रचंद्रदर्शन’ विधीतून आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी मारुतितत्त्व प्रक्षेपित होणे

सद्गुरु सत्यवान कदम

सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु सत्यवान कदम आणि कु. माधवी पोतदार अन् कु. सोनाली खटावकर (प.पू. दास महाराज यांच्या समवेत सेवा करणार्‍या साधिका) यांच्यात प.पू. दास महाराज यांच्या ‘सहस्रचंद्रदर्शन विधी’विषयी झालेला संवाद पुढे दिला आहे.

कु. माधवी पोतदार

१. प.पू. दास महाराज यांच्याकडून ‘शिष्यभाव’ शिकता येत असल्याने त्यांचा आधार वाटणे

सद्गुरु सत्यवान कदम : प.पू. दास महाराज नेहमी शिष्यावस्थेत असतात. त्यांची परात्पर गुरुदेवांवर (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर) पुष्कळ श्रद्धा आहे. ‘परात्पर गुरुदेव हे प.प. श्रीधरस्वामी यांचेच रूप आहेत’, असे प.पू. दास महाराज मानतात. ‘शिष्यभाव कसा असावा ?’, हे त्यांच्याकडून शिकायला मिळते’, हे आमचे भाग्य आहे. प.पू. दास महाराज यांच्यात पुष्कळ प्रेमभाव आहे. परात्पर गुरुदेव रामनाथीला आहेत; पण प.पू. दास महाराज इकडे असल्याने आम्ही त्यांच्याशी बोलतो. आम्हाला त्यांचा आध्यात्मिक स्तरावर आधार वाटतो.

कु. माधवी पोतदार : प.पू. दास महाराज हे ‘परात्पर गुरु’ या टप्प्याला आहेत. त्यांना ‘सहस्रचंद्रदर्शन विधी’ची  काहीच आवश्यकता नाही. आता आपत्काळाचे जे संकट ओढवत आहे, त्यात वातावरण आणि सर्व साधक यांची शुद्धी व्हावी अन् सर्वांना चैतन्य मिळावे, यासाठी भगवंत हा सोहळा घडवून आणत आहे.

कु. सोनाली खटावकर

२. सहस्रचंद्रदर्शन सोहळ्याच्या माध्यमातून आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी ऊर्जा मिळणार असणे

सद्गुरु सत्यवान कदम : ‘प.पू. दास महाराज यांचा ‘सहस्रचंद्रदर्शन विधी’ पानवळ, बांदा येथील गौतमारण्य आश्रमात व्हावा’, अशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांची इच्छा आहे, म्हणजे त्यांचा संकल्प झालेलाच आहे. हा सोहळा इकडे असल्यामुळे आम्हाला हा सर्व सोहळा प्रत्यक्ष अनुभवता येत आहे. त्यामुळे आम्हाला फार आनंद झाला आहे. या सोहळला साधक आणि प.पू. दास महाराज यांचे जे आप्तस्वकीय येतील, त्या सर्वांना साधनेसाठी ऊर्जा मिळेल. हा सोहळा ही आपल्या सर्वांसाठी पर्वणीच आहे. ‘आपण सर्व जण या सोहळ्याचे साक्षीदार आहोत’, हे आपल्या सर्वांचे भाग्य आहे. हा सोहळा आपल्यासाठीच, म्हणजे आपला उद्धार होण्यासाठीच आहे. या सोहळ्याच्या माध्यमातून साधकांना आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी ऊर्जा मिळेल.

कु. माधवी पोतदार : आता तीव्र आपत्काळ आहे आणि या तीव्र आपत्काळात खरेतर हनुमंताची आवश्यकता आहे. ते तत्त्व आवश्यक आहे. त्यामुळे भगवंत या माध्यमातून त्या तत्त्वाची ऊर्जा प्रक्षेपित करत आहे.

(‘मारुति हे प.पू. दास महाराज यांचे आराध्य दैवत आहे. प.पू. दास महाराज यांनी अनेक पंचमुखी हनुमत्कवच यज्ञ केले आहेत.’ – संकलक)

सद्गुरु सत्यवान कदम : हो. आता ते तत्त्व आवश्यक आहे.’

– कु. माधवी पोतदार आणि कु. सोनाली खटावकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

 

श्री. गजानन डेगवेकर (पू. (सौ.) माईंचे भाऊ) यांना ‘गौतमारण्य’ आश्रमात आलेल्या अनुभूती आणि झालेले स्वप्नदृष्टांत

श्री. गजानन डेगवेकर

१. ‘गौतमारण्य’ आश्रमात होणार्‍या श्रीरामनवमी उत्सवामुळे परिसरात दैवी वातावरण निर्माण झाल्याचे जाणवणे : ‘गौतमारण्य’ आश्रमात होणार्‍या श्रीरामनवमी उत्सवामुळे येथे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिसरात एक प्रकारचे दैवी वातावरण निर्माण झाले आहे. त्या उत्सवाला पंचक्रोशीतील लोक येतात. उत्सवाला येणारे लोक सेवा म्हणून सगळी कामे करतात.

२. स्वप्नात भगवान श्रीधरस्वामींचे दर्शन होणे : एकदा मला स्वप्नात भगवान श्रीधरस्वामींचे दर्शन झाले. मला स्वप्नात दिसले, ‘भगवान श्रीधरस्वामींनी हातात कमंडलू घेतला आहे. त्यांच्या काखेत कुबडी आहे. ते श्रीराम मंदिराकडून खाली ‘गौतमारण्य’ आश्रमात येत आहेत.’

‘प.पू. दास महाराज यांच्या ‘सहस्रचंद्रदर्शन शांती विधी सोहळ्या’मुळे त्यांचे आयुष्य वाढावे आणि त्यांचे असेच उत्सव सनातनच्या साधकांकडून या ठिकाणी घडावेत’, अशी मी इच्छा बाळगतो.’

– श्री. गजानन महादेव डेगवेकर (पू. (सौ.) लक्ष्मी नाईक (माई) यांचे भाऊ, वय ८० वर्षे, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), पानवळ-बांदा, जिल्हा सिंधुदुर्ग. (१८.१२.२०२१)