(म्हणे) ‘छत्रपती शिवाजी महाराज यांचा संबंध हिंदुत्वाशी जोडणे म्हणजे त्यांच्या महान कर्तृत्वाचा अपमान !’ – अतुल लोंढे, प्रवक्ते, काँग्रेस

छत्रपती शिवाजी महाराज यांचा संबंध हिंदुत्वाशी नाही, तर काय इस्लामशी जोडायचा का ? मुसलमानांच्या लांगूलचालनात आकंठ बुडालेल्या काँग्रेसचा ‘हिंदुपदपातशाह’ छत्रपती शिवाजी महाराज यांनाही पुरोगामी ठरवण्याचा अश्लाघ्य प्रकार ! – संपादक 

श्री. अतुल लोंढे, प्रवक्ते, काँग्रेस

मुंबई – छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, सर्वधर्मसमभावाची नाही, असे विधान करून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या पुरोगामी महाराष्ट्राला धर्मांध करण्याचा प्रयत्न चालवला आहे. चंद्रकांत पाटील हे पुरोगामी महाराष्ट्राला लागलेला ‘धर्मांध वायरस’ आहेत. भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे नेते सातत्याने छत्रपती शिवाजी महाराज यांना केवळ हिंदूंचे राजे म्हणून हिंदुत्वाशी संबंध जोडून त्यांच्या महान कर्तृत्वाचा अपमान करत आहेत, अशी मुक्ताफळे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस आणि मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी उधळली आहेत. (देशात आतंकवादी कारवाया करणार्‍या इस्लामच्या धर्मांधतेविषयी तोंडातून एकही शब्द न काढता हिंदुत्वाला धर्मांध म्हणणार्‍या अतुल लोंढे यांनी हिंदूंच्या धर्मांधतेचे एकतरी उदाहरण दाखवावे. स्वत:चे अर्धवट ज्ञान पाजळणारे प्रवक्ते काँग्रेसचे हसे करून घेत आहेत ! – संपादक)

या वेळी अतुल लोंढे म्हणाले, ‘‘छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते. त्यांनी अठरापगड जातीच्या लोकांना समवेत घेऊन राज्य केले. ते कर्मकांड मानणारे नव्हते. (छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची शपथही रोहिडेश्वराच्या मंदिरात घेतली. प्रत्येक शुभकार्यासाठी ते भवानीमातेची पूजाअर्चा करून तिचा आशीर्वाद घेत होते. शिवरायांच्या चरित्रात त्यांच्या कर्मकांडाविषयी कितीतरी उदाहरणे आहेत. लोंढे यांनी किमान अभ्यास करून ‘प्रवक्ते’ शब्दाचा मान राखावा ! – संपादक) छत्रपती शिवाजी महाराज सर्व धर्मांचा सन्मान करायचे. त्यांच्या नौसेनेची धुरा सिद्दी संबल सांभाळत होता. आगरा येथून नजरकैदेतून सुटका करून घेतांना मदारी मेहतर या मुसलमान व्यक्तीने महाराजांना साहाय्य केले. महाराजांच्या अंगरक्षकांमध्येही अनेकजण मुसलमान होते. त्यांच्या गुप्तहेर विभागात मौलाना हैदर अली होते, तर शस्त्रागाराची कमान इब्राहिम खानच्या हातात होती. (असे असेल, तर औरंगजेबाच्या सैन्यातही मराठे सैनिक चाकरी करत होते; म्हणून औरंगजेबाला काय ‘हिंदु धर्मप्रेमी’ म्हणायचे का ? – संपादक) शिवाजी महाराज कुळवाडीभूषण, शेतकर्‍यांचे कैवारी आणि बहुजनवादी होते. त्यांचा हिंदू, हिंदुत्व आणि हिंदूंच्या ‘व्होट बँके’शी संबंध जोडून चंद्रकांत पाटील यांनी अकलेचे तारे तोडले आहेत. त्यांनी इतिहासाचा अभ्यास करून बोलावे. चुकीची, अर्धवट आणि इतिहासाची मोडतोड करून लोकांची दिशाभूल करू नये. (हिंदुत्वाचे नाते तोडणार्‍या काँग्रेसी नेत्यांची वैचारिक सुंता झाली असली, तरी हिंदुत्वनिष्ठांना स्वत:च्या धर्माचा आणि हिंदुत्वाचा अभिमान आहे. – संपादक)

ज्या व्यवस्थेने महाराजांचे क्षत्रियपण नाकारत शूद्र ठरवले आणि त्यांचा राज्याभिषेक करण्यास नकार दिला. ज्या विचारसरणीच्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ, संभाजीराजे यांची अपकीर्ती केली, त्याच विचारसरणीचे वारसदार चंद्रकांत पाटील आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी समाजासाठी, देशासाठी महान कार्य केले आहे. त्यांना विशिष्ट चौकटीत बसवून त्यांच्या कार्याचा अवमान करण्याचे पातक चंद्रकांत पाटील आणि भाजप करत आहे, ते त्यांनी थांबवावे. (‘ब्राह्मणांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला विरोध केला’, अशी दर्पाेक्ती करणारे लोंढे यांना छत्रपती यांचा राज्याभिषेक ब्राह्मणानेच केला, महाराजांच्या सैन्यातही ब्राह्मण होते, एवढे तरी ज्ञान आहे ना ? असे असेल, तर काही मराठा सरदारांनीही हिंदवी स्वराज्याला विरोध केला म्हणून सरसकट मराठा समाजाला दोष द्यायचा का ? जातीवाचक गरळओक करून हिंदूंमध्ये फूट पाडण्याची ही काँग्रेसची जुनी खोड आहे. ब्राह्मणांवर टीका करून हिंदु धर्मात फूट पाडायची; मात्र स्वराज्यावर आक्रमण करणार्‍या धर्मांध इस्लामी आक्रमकांविषयी एक अवाक्षरही काढायचे नाही, यालाच ‘काँग्रेसी’ वृत्ती म्हणतात ! – संपादक)