१. मनुष्याला छळणार्या राहूदोषासाठी शिवोपासना आवश्यक असणे !
‘पितृदोष हे राहूच्या दोषाच्या नावाने दर्शवले जातात. राहूचे दोष इतके वाईट असतात की, जगणे कठीण करतात. काही दोष घराण्यात माणसांना सतत छळतात. काही ठिकाणी नेहमी आर्थिक संकटे येतात. काही घरात सर्व सुखसोयी असूनही अस्वस्थता असते. काही घरात काही कारण नसतांना सतत भांडणे होतात. काही घरात जेवण सिद्ध असून शांतरितीने खायला मिळत नाही. असे एक ना दोन, अनेक रितींनी राहुदोष छळतात. त्या सर्वांवर उपाय म्हणजे शिवोपासना करणे. भगवान शंकराची उपासना करणे. उपासकाची जसजशी उपासना वाढेल तसतशी त्याची या दोषांतून सुटका होते. शिवोपासनेने राहूचे दोष जातात आणि मनुष्य या त्रासांतून मुक्त होतो. शिवोपासना म्हणजे रुद्राभिषेक करणे किंवा सोमवारी उपवास करणे आणि तो सायंकाळी प्रदोषकाळी सोडणे. सोमवार हा शिवाचा वार आहे. त्या दिवशी जमल्यास कोरडा उपवास करावा. (फराळ नको) जमल्यास निर्जल उपवास करावा आणि सायंकाळीच पाणी प्यावे ‘ॐ नमः शिवाय’ नामाचे सतत स्मरण करावे.
२. दत्तात्रेयांची उपासना केल्यास शिवोपासनेची सर्व फळे मिळणे श्री दत्तात्रेय भगवंताची मूर्ती ही शिवमूर्तीच आहे.
श्री दत्तात्रेयात ब्रह्मा, विष्णु आणि महेश या ३ मूर्तींचा अंतर्भाव आहे. श्री दत्तात्रेयांची उपासना केल्यास शिवोपासनेची सर्व फळे मिळतात. घरात शुद्ध तुपाचा दिवा लावावा, धूप करावा, रुद्राक्ष असलेली माळ धारण करावी, शक्यतो उपवासाच्या दिवशी आपण कुणाला स्पर्श करू नये किंवा कुणाकडून स्पर्श करवून घेऊ नये. कित्येक घराण्यांचे म्हणजेच कुटुंबांचे गणपति हे दैवत असते. त्यांनी तर गणपतीची उपासना करावीच; परंतु ज्यांचे हे दैवत नसेल, त्यांनीसुद्धा श्री गणेशाची उपासना करून त्याला प्रसन्न करून घ्यावे. गणपति ही राहूची देवता असल्याने ज्यांना राहूची पीडा आहे त्यांनी गणपतीची उपासना अवश्य करावी. राहूचा दोष पिढ्यान्पिढ्या चालू रहातो. तो त्वरित संपत नाही. तो घराण्याचा दोष असतो; म्हणून त्या सर्वांनी गणपतीची उपासना अवश्य करावी.
३. घरात सर्वत्र लाल मुंग्या येणे, हा घराण्यात असलेल्या दोषाचा परिणाम होय !
काही घरांत सर्वत्र लाल मुंग्या निर्माण होत असतात. कितीही औषधे केली, तरी ती गुणकारी ठरत नाहीत. घरात जर घराण्याचा दोष असेल, तर लाल मुंग्या सतत निर्माण होत असतात. त्यासाठी घरात सर्व ठिकाणी कानाकोपर्यात कापूर कुटून त्याची पावडर टाकावी. कापूर अतिशय पवित्र असल्याने घरातील असे दोष निघून जात असतात.
४. राहूच्या दोषांवर वैद्यकीय उपचार लागू पडत नाहीत !
अपत्य न होणे, गर्भधारणा होऊनही गर्भ न रहाणे, आईच्या पोटात ५ – ६ महिने गर्भ वाढून नंतर आपोआप गर्भपात होणे, मूल जन्मल्यानंतर एक-दोन मासांत किंवा वर्षांत जाणे, जन्मलेल्या मुलात व्यंग असणे, काही वेळा अर्धवट बुद्धीचे, अविकसित मूल जन्माला येणे, हे सर्व घराण्याचे आणि आनुवंशिक दोष असतात. हे राहूचे दोष असतात. या राहूच्या दोषांवर वैद्यकीय इलाज चालत नाहीत.
५. अदृश्य अडथळे योग्य मार्गदर्शनाने केलेल्या मंत्रोच्चारानेच दूर होणे
संतान न होण्याची पुष्कळ कारणे असतात. तुमच्या घरात आलेला पैसा कुठल्या प्रकारचा आहे, लोकांचा किती तळतळाट घेतला आहे, कुणाला किती लुबाडले आहे, गरीब, अनाथ, विधवा स्त्रियांचा पैसा त्यात आहे का ? याविना गेलेल्या पूर्वजांना गती मिळाली आहे कि नाही ? काही दृश्य, तर काही अदृश्य अडथळे असतात, ते दूर करावे लागतात. दृश्य अडथळे दूर करू शकाल; परंतु अदृश्य अडथळे योग्य मार्गदर्शनाने व्यवस्थित शास्त्रोक्त पद्धतीने केलेल्या मंत्रोच्चारानेच दूर होतील.
६. तीर्थक्षेत्री त्रिपिंडी श्राद्ध करावे लागणे
त्र्यंबकेश्वर किंवा नृसिंहवाडी तेथे जाऊन त्रिपिंडी श्राद्ध करावे लागेल. तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी ३ दिवस मुक्काम करावा लागतो. क्षौर करून सर्व नियम पाळून तीनही दिवस सुतक पाळावे लागते, घरातील सर्वांनाच सुतक पाळावे लागते.
७. अतृप्त राहिलेल्या इच्छेमुळे दोष उत्पन्न होणे
दुसरे म्हणजे, घराण्यात ३ पिढ्यांत एखाद्या कुणालाही गती किंवा मुक्ती मिळायची राहिली असेल, तरीही हा त्रास होतो. ३ पिढ्या म्हणजे फार मोठा काळ आहे. या दरम्यान पुष्कळ लोक गेलेले असतात. कुणाच्या ना कुणाच्या तरी इच्छा अतृप्त राहिलेल्या असतात. त्यामुळे दोष निर्माण होतो. त्या इच्छा पूर्ण कराव्या लागतात.
प्रत्येक घराण्यात काही ना काही दोष असतातच. काहींना ते समजतात, तर काहींना ते समजत नाहीत. नोकरी, धंदा, व्यवसायात यश न येणे, नित्याने काही ना काही अडथळे येणे. हे सर्व अतृप्त आत्म्याचे दोष असतात.’
(साभार : घराण्यातील दोष, ‘(कै.) प.पू. रामकृष्ण क्षीरसागर महाराज यांची गुरुवाणी’, पुष्प १०)