शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) अपव्यवहार प्रकरण !
पुणे – शिक्षक पात्रता परीक्षेतील (टीईटी) अपव्यवहार प्रकरणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांच्यासह तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकर यांच्या विरोधात सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. चौकशीत म्हाडा पेपरफुटीतील सूत्रधार असलेले ‘जी.ए. सॉफ्टवेअर टेक्नोलॉजीस’ या आस्थापनाचे संचालक डॉ. प्रीतीश देशमुख याच्यासह अटकेत असलेले त्याचे साथीदार संतोष हरकळ, अंकुश हरकळ यांनी एजंटांच्या वतीने सुपे, सावरीकर यांच्यासमवेत संगनमत करून अपव्यवहार केल्याचे उजेडात आले. त्यानंतर १७ डिसेंबर या दिवशी सुपे, सावरीकर यांना चौकशीसाठी कह्यात घेऊन त्यांना अटक करण्यात आल्याचे पोलीस आयुक्त गुप्ता यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप यांनी या संदर्भात तक्रार दिली आहे. दोघांना २३ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
तुकाराम सुपे यांच्या घराची झडती घेतली असता झडतीमध्ये ८८ लाखांची रोकड, दागिने, मुदत ठेवीच्या पावत्या सापडल्या. शिक्षक पात्रता परीक्षेत तुकाराम सुपे यांना १ कोटी ७० लाख रुपये, डॉ. प्रीतीश देशमुख, तसेच अभिषेक सावरीकर यांना प्रत्येकी सव्वाकोटी रुपये मिळाल्याचे अन्वेषणात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात आणखी काही जण सामील असल्याची शक्यता आहे. अन्वेषण चालू असून आणखी काही जणांना अटक होऊ शकते, असे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले.