प्रतिमासातील पौर्णिमा महोत्सवही स्थगित
सातारा, १७ डिसेंबर (वार्ता.) – श्रीक्षेत्र गोंदवले येथील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचा १०७ वा पुण्यतिथी महोत्सव मार्गशीर्ष वद्य प्रतिपदा ते वद्य दशमी अर्थात् ३१ डिसेंबर २०२१ ते ८ जानेवारी २०२२ या कालावधीत होत आहे; मात्र कोरोनाच्या संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेऊन श्री महाराजांची पुण्यतिथी भाविकांनी घरीच साजरी करावी, असे आवाहन मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे. प्रतिमास आयोजित करण्यात येणार्या ‘पौर्णिमा महोत्सवा’लाही स्थगिती देण्यात आली आहे.
महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून प्रतिवर्षी श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे भक्त पुण्यतिथीच्या कार्यक्रमानिमित्त श्रीक्षेत्र गोंदवले येथे येतात. याप्रसंगी मंदिर परिसरात मान्यवरांची प्रवचने, कीर्तने, भजन, गायन आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. महोत्सव काळात श्रींच्या प्रतिमेची आणि पादुकांची प्रतिदिन पालखीतून मिरवणूक काढण्यात येते; मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धार्मिक विधी वगळता यंदाचा पुण्यतिथी महोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे.
प्रथेप्रमाणे मोजक्या भाविकांच्या उपस्थितीमध्ये ३१ डिसेंबर या दिवशी कोठी पूजन करून महोत्सवाला प्रारंभ होईल, तर ८ जानेवारी या दिवशी पहाटे ५ वाजून ५५ मिनिटांनी गुलाल-फुलांची उधळण करून महोत्सवाची सांगता होईल. महोत्सव काळात शासनाने घालून दिलेले कोरोनाचे नियम पाळत प्रतिदिन सकाळी ९ ते ११ आणि सायंकाळी ५ ते ६.३० या वेळेत भाविकांना दर्शनाची सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे; मात्र भाविकांना दर्शन झाल्यानंतर मंदिर परिसरामध्ये कुठेही फिरण्यास अनुमती नाही.