पणजी, १६ डिसेंबर (वार्ता.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी १९ डिसेंबर या दिवशी गोवा भेटीवर येत असून या दिवशी ते ताळगाव येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी मैदानात गोवा मुक्तीदिनाच्या निमित्ताने आयोजित मुख्य कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘ऑनलाईन’ पद्धतीने सुशोभित केलेला आग्वाद किल्ला, बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचा ‘सुपरस्पेशालिटी’ विभाग, मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालय, मोपा विमानतळ येथील ‘एव्हिएशन स्कील डेव्हलपमेंट स्कील’ केंद्र आणि दवर्ली, नावेली येथील ‘गॅस इन्सुलेटेड वीज उपकेंद्र यांचे उद्घाटन करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘बार कौन्सिल ऑफ इंडिया ट्रस्ट’च्या कायदेविषयक शिक्षण आणि संशोधन भारतीय आंतरराष्ट्रीय विद्यापीठ याची पायाभरणी करणार आहेत. ‘ऑपरेशन विजय’मधील स्वातंत्र्यसैनिकांचाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रारंभी पणजी येथील आझाद मैदानात हुतात्मा स्मारकावर पुष्पांजली वहातील आणि नंतर जहाजांचे संचलन पहाणार आहेत. ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘स्वयंपूर्ण गोवा’ या योजना यशस्वीरित्या राबवणारे ‘स्वयंपूर्ण मित्र’ आणि ‘स्वयंपूर्ण गोवा’ योजनेचे लाभार्थी यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे.