सिंधुदुर्ग जिल्ह्यात अमली पदार्थांची वाहतूक आणि विक्री यांवर आळा घालण्यासाठी प्रभावी उपाययोजना करा !- दिलीप वळसे पाटील

सिंधुदुर्ग जिल्ह्यात अमली पदार्थांची वाहतूक आणि विक्री यांवर आळा घालण्यासाठी प्रभावी उपाययोजना करा !- महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे सिंधुदुर्ग पोलिसांना निर्देश

गृहमंत्र्यांना अशी सूचना का करावी लागते ? पोलिसांच्याच हे का लक्षात येत नाही ?

‘कारागृह पर्यटना’मागील संकल्पना – भारताच्या स्वातंत्र्यलढाच्या वेळी अनेक नेते, देशभक्त, क्रांतीकारक यांना ब्रिटिशांनी बंदीवान बनवून विविध ठिकाणच्या कारागृहात ठेवले होते. त्यामुळे या कारागृहांना ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर ‘कारागृह पर्यटना’च्या माध्यमातून भावी पिढीला स्वातंत्र्यलढा, देशासाठी हौतात्म्य पत्करलेले आणि कारावास भोगलेले क्रांतीकारक आदींचा इतिहास समजावा, या हेतूने ही अनोखी संकल्पना आहे. या योजनेचा प्रारंभ पुणे येथील ‘येरवडा कारागृहा’त २६ जानेवारी २०२१ या दिवशी करण्यात आला. टप्प्याटप्प्याने विविध ठिकाणच्या कारागृहांतून ही संकल्पना राबवण्यात येत आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा पोलीसदलाचे सक्षमीकरण आणि आधुनिकीकरण होणार

सिंधुदुर्ग (जि.मा.का.) – सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा असल्याने, तसेच जिल्ह्याच्या जवळ गोवा राज्य असल्याने जिल्ह्याला मोठ्या प्रमाणावर पर्यटक भेट देत असतात. जिल्ह्यातील वाढती अमली पदार्थांची वाहतूक आणि विक्री यांना आळा घालण्यासाठी प्रभावी उपाययोजना करा, तसेच दोषींवर कठोर कारवाई करा, असे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सिंधुदुर्ग पोलिसांना दिले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध विकासकामे आणि पोलीस विभागाच्या अडचणी यांविषयीची आढावा बैठक १४ डिसेंबरला मुंबई येथे मंत्रालयात घेण्यात आली. या बैठकीला शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर, सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा असल्याने जिल्ह्यात ‘टुरिझम (पर्यटन) पोलीस ठाणे’ निर्माण करावे, अशी मागणी आमदार केसरकर यांनी या वेळी केली. यावर ‘पर्यटकांची सुरक्षा आणि सुविधा लक्षात घेऊन सिंधुदुर्ग, औरंगाबाद (संभाजीनगर) आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये ‘टुरिझम पोलीस ठाणे’, ही संकल्पना राबवण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश गृहमंत्री वळसे पाटील यांनी गृह विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना दिले. या वेळी कुडाळ आणि बांदा येथे पोलीस ठाण्याची नवीन इमारत, आंबोली आणि शिरोडा येथे उप पोलीस ठाण्याची निर्मिती करण्याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली.

सावंतवाडी येथील जिल्हा कारागृहात ‘कारागृह पर्यटन’ चालू होणार

पुणे येथील ‘येरवडा जेल टुरिझम’प्रमाणे सावंतवाडी येथील जिल्हा कारागृहात ‘कारागृह पर्यटन’(जेल टुरिझम) चालू करण्याविषयी योग्य ती कार्यवाही करण्याची सूचना गृहमंत्री वळसे पाटील यांनी या वेळी केली. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा भाग दर्‍याखोर्‍याचा असल्याने त्या सर्वांवर नियंत्रण करण्याच्या दृष्टीने आंबोली पोलीस ठाण्याचा दर्जा, तसेच शिरोडा पोलीस ठाण्यातील पोलीस ‘आऊट पोस्ट’चा दर्जा वाढवण्याविषयी सविस्तर चर्चा झाली. या अनुषंगाने योग्य ती कार्यवाही करण्याचे, तसेच सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाचे सक्षमीकरण आणि आधुनिकीकरण करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्याचे निर्देश गृहमंत्री वळसे पाटील यांनी या वेळी संबंधितांना दिले.