मतांसाठी घेतलेल्या या निर्णयामुळे भविष्यात दूरगामी परिणाम भोगावे लागू शकतात. थकबाकीदारांमध्ये निवडणुका आल्या की, ‘करसवलत मिळते’, अशी चुकीची धारणा व्हायला नको ! – संपादक
पुणे – वर्षानुवर्षे मिळकत कराची थकबाकी असलेल्या थकबाकीदारांसाठी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा ‘मिळकतकर अभय योजना’ राबवण्याचा निर्णय महापालिकेच्या स्थायी समितीने घेतला आहे. त्यानुसार १ कोटी रुपयांपर्यंतची थकबाकी असलेल्या सर्व थकबाकीदारांना दंडाच्या रकमेत ७५ टक्क्यांची सवलत देण्यात येणार आहे. २० डिसेंबरपासून या योजनेची कार्यवाही होईल. ज्या मिळकत धारकांचा मूळ मिळकत कर आणि २ टक्के दंडाची रक्कम अशी एकूण थकबाकी १ डिसेंबर २०२१ या दिवशी १ कोटी रुपयांपेक्षा अल्प आहे अशा थकबाकीदारांना या योजनेचा लाभ होणार आहे.
भ्रमणभाष टॉवर मिळकतकर थकबाकीदारांना या योजनेतून वगळले असून या योजनेची मुदत २६ जानेवारी २०२२ पर्यंत आहे. थकबाकी असलेल्या मिळकत धारकांची संख्या मोठी असल्याने नव्याने अभय योजना राबवण्याचा प्रस्ताव करआकारणी आणि करसंकलन विभागाकडून स्थायी समितीच्या बैठकीत देण्यात आला होता. या प्रस्तावाला स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता दिली आहे. अभय योजनेमुळे महापालिकेच्या उत्पन्नात भर पडेल, असे स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी सांगितले. प्रामाणिक करदाते नियमित कर भरत असतांना आगामी महापालिका निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून थकबाकीदारांसाठी अभय योजनेचा घाट घातला जात असल्याने महापालिकेवर टीकाही होत आहे.