अवैध व्यावसायिकांकडून खंडणी गोळा करण्यास सचिन वाझे भाग पाडत होते ! – पोलीस कर्मचारी

सचिन वाझे

मुंबई – बडतर्फ साहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे हे बार मालक, ‘बुकी’ आणि अवैध व्यावसायिक यांच्याकडून खंडणी गोळा करण्यास पोलीस कर्मचार्‍यांना भाग पाडत होते, असे मुंबई गुन्हे शाखेने प्रविष्ट केलेल्या आरोपपत्रात नमूद केले आहे. त्यांच्या कनिष्ठ कर्मचार्‍यांना ‘खंडणी गोळा न केल्यास त्यांची नोकरी घालवण्याच्या आणि स्थानांतर करण्याच्या’ धमक्या दिल्या होत्या.

या आरोपपत्रात म्हटले आहे की, पोलीस अधिकारी आणि हवालदार यांच्या जबाबानुसार वाझे यांना मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचे संरक्षण होते. वाझे यांनी मुंबई गुन्हे शाखेच्या सर्व संसाधनांचा वापर करून ते हाताळत असलेल्या बहुतांश मोठ्या (हायप्रोफाईल) प्रकरणांमधून पैसे उकळले आहेत.