१८ कोटी ४ लाख ३१ सहस्र रुपयांहून अधिक रक्कम मिळाली !
सांगली – राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या आदेशानुसार ११ डिसेंबर या दिवशी सांगली जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सांगली जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये राष्ट्रीय लोकअदालत पार पडली. या राष्ट्रीय लोकअदालतींमध्ये ८ सहस्र ९६७ प्रकरणे निकाली काढण्यात आली. यामधून १८ कोटी ४ लाख ३१ सहस्र २८६ रुपये इतकी रक्कम वसूल करण्यात आली, अशी माहिती प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा विधी व सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष आर्.एस्. राजंदेकर यांनी दिली.
या लोकअदालतींमध्ये आवश्यकतेनुसार ‘व्हिडिओ कॉन्फरन्स’द्वारे पक्षकारांशी संवाद साधण्याची व्यवस्था करण्यात आली होती. लोकअदालतींमध्ये जिल्ह्यातून ५३ ‘पॅनल’ची निर्मिती करण्यात आली होती. कोरोनामुळे जे पक्षकार तडजोडीसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहू शकत नव्हते, अशांसाठी ‘व्हॉट्सॲप कॉल’चा वापर करण्यात आला. लोकअदालतीच्या अगोदर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ३ दिवस ‘स्पेशल ड्राइव्ह’मध्येही प्रकरणे निकाली काढण्यात आली. पुढील राष्ट्रीय लोकअदालत १२ मार्च २०२२ या दिवशी असल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्रवीण कि. नरडेले यांनी दिली.