कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी भारतीय नौसेना सिद्ध ! – मुरलीधर पवार, निवृत्त व्हाईस ॲडमिरल

निवृत्त व्हाईस ॲडमिरल मुरलीधर पवार

सातारा, १३ डिसेंबर (वार्ता.) – वर्ष १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धाची जगाच्या इतिहासामध्ये नोंद झाली. १३ दिवसांच्या युद्धात पाकच्या ९३ सहस्र सैनिकांना कह्यात घेण्यात आले. तेव्हा भारताच्या तिनही दलांनी विजेसारखी चपळाई दाखवत कामगिरी केली. आता अत्याधुनिक सुविधेसह कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी भारतीय नौसेना सिद्ध आहे, असे प्रतिपादन नौसेनेचे निवृत्त व्हाईस ॲडमिरल मुरलीधर पवार यांनी केले.

सातारा येथील महासैनिक भवन येथे ‘नौदलदिन’ साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात भारतीय नौसेनेचे निवृत्त व्हाईस ॲडमिरल मुरलीधर पवार यांच्या हस्ते नौसेनेतील निवृत्त सैनिकांचा यथोचित सत्कार करण्यात आला. तेव्हा ते बोलत होते. या वेळी नौसेनेच्या ‘बॅण्ड’ पथकाने वाद्यकला सादर केली.

निवृत्त व्हाईस ॲडमिरल पवार पुढे म्हणाले की, काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत प्रत्येक ठिकाणी मराठी लोक, भाषा, रहाणीमान पहायला मिळते. तिनही सैन्यदलात मराठी लोकांची संख्या अधिक आहे. वर्ष १९७१ मध्ये सैन्यात शौर्य गाजवणार्‍या सैनिकांना मला भेटायला मिळाले, हे मी माझे भाग्य समजतो.