वृत्तमाध्यमांत मनोरंजन नकोच !

नुकतेच नाशिक येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये शेवटच्या दिवशी ‘वृत्तमाध्यमांचे मनोरंजनीकरण’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादात वक्त्यांनी ‘वृत्तमाध्यमांचे मनोरंजनीकरण वाढले असून बातम्यांचे सनसनाटीकरणही वाढले आहे’, असे मत व्यक्त केले; मात्र परिसंवादाचे सूत्रसंचालन करणारे प्रसन्न जोशी यांनी ‘मनोरंजन अच्छा है !’, असे मत व्यक्त करत वृत्तमाध्यमांतील मनोरंजनाचे समर्थन केले. मुळात वृत्तमाध्यमे ही समाजातील घटनांमधील वास्तविकता समाजासमोर आणण्यासाठी असतात, मनोरंजनासाठी नाही. मनोरंजनासाठी अन्य स्वतंत्र वाहिन्या किंवा माध्यमे आहेतच. ‘अनेक लोक गंभीर विषय ऐकायला सिद्ध नाहीत’, असे माध्यमे म्हणतात; मात्र ती त्यांची अकार्यक्षमता आहे. लोकांना काय पहायला आणि ऐकायला आवडते ? यापेक्षा लोकांना काळानुसार काय दाखवणे आणि ठाऊक असणे आवश्यक आहे, ते ओळखून त्यांच्यापर्यंत पोचवणे, हे वृत्तमाध्यमांचे दायित्व आहे.

अनेक वेळा बातमी नाही; म्हणून मनोरंजनाकडे वृत्तमाध्यमांचा कल जात आहे का ? याचाही विचार माध्यमांनी करायला हवा. कोणतातरी एखादा विषय घेऊन त्यावर चुरचुरीत चर्चा उरकणे, सनसनाटी बातम्या छापणे, हेच माध्यमांना सोपे वाटते. त्यात हिंदूंच्या विरोधातील प्रकरणांमध्ये माध्यमे अधिकच रस दाखवतात. गंभीर विषय वाचणारे वाचक अद्यापही आहेत; मात्र त्यांच्यापर्यंत हवा तसा विषय पोचवण्यासाठी माध्यमांना हवा तसा लेखक मिळणे कठीण झाले आहे. प्रसारमाध्यमे जेवढा आक्रस्ताळेपणा न करता विषय हाताळतील, तेवढा दर्शकवर्ग तो विषय मनापासून ऐकेल. प्रसारमाध्यमे हे समाजाला दिशा देण्याचे मोठे कार्य करत असतात. त्यांच्यात समाजाला पालटण्याची शक्ती आहे. त्यामुळे अपूर्ण माहितीवरून अपसमज निर्माण करणारी सनसनाटी बातमी न देता, पत्रकारांची भूमिका समाजाला दिशादर्शक आणि योग्य दृष्टीकोन देणारी असावी.

सध्या देशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली असतांना जनतेला मनोरंजनाकडे नेणे, म्हणजे ‘रोम जळत असतांना निरो फिडल वाजवत होता’, असे करण्यासारखे आहे. समाजाच्या उन्नतीसाठी प्रसारमाध्यमांची भूमिका महत्त्वाची असून लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि जनता यांच्यात ते समन्वय साधत असतात. त्यामुळे वृत्तमाध्यमांनी मनोरंजनाऐवजी वस्तूस्थितीजन्य बातमी देण्याकडे भर द्यावा.

– वर्षा कुलकर्णी, सोलापूर