निरोगी जीवनासाठी व्यायाम – ३१
आधुनिक जीवनशैलीमुळे निर्माण होणार्या शारीरिक समस्यांवर ‘व्यायाम’ हा प्रभावी उपाय आहे. प्राचीन ग्रंथांमधील व्यायामाचे तत्त्वज्ञान आजही तितकेच उपयुक्त असून आपण त्यातून प्रेरणा घेऊ शकतो. या लेखमालेतून आम्ही व्यायामाचे महत्त्व, व्यायामाविषयीच्या शंकांचे निरसन, ‘अर्गाेनॉमिक्स’ (ergonomics) चे तत्त्व, आणि आजारानुसार योग्य व्यायाम यांची माहिती सादर करणार आहोत.
व्यायामाच्या माध्यमातून निरोगी जीवनशैली अंगीकारण्याचा हा प्रवास प्रेरणादायी ठरेल. ‘व्यायाम करण्याचा कंटाळा येतो’, हे वाक्य आम्ही पुष्कळ जणांचे तोंडून ऐकले आहे. यावरून ‘व्यायामाचे निरनिराळे प्रकार करणे खरोखरच कंटाळवाणे आहे का ?’, असा प्रश्न उभा रहातो. जरा नीट विचार केला, तर ‘या विधानात सत्यतेचा अंश नाही’, असे दिसून येईल.
या लेखाच्या आधीचा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/858104.html
१. मनाच्या चंचलतेमुळे व्यायाम करण्याचा प्राथमिक अवस्थेत कंटाळा आला, तरी त्याची सवय झाल्यास व्यायामामुळे उत्साह वाढणे
मनुष्याचे मन इतके चंचल आहे की, त्यास कोणतीच गोष्ट सतत काही वेळ करणे आवडत नाही. कित्येकांस ज्याप्रमाणे व्यायाम करण्याचा कंटाळा येतो, त्याप्रमाणेच अभ्यास करण्याचा कंटाळा येतो, भजन करण्याचा कंटाळा येतो, नोकरीचे अथवा धंद्याचे काम करण्याचा कंटाळा येतो. याचा अर्थ असा होत नाही की, या सर्व गोष्टी कंटाळवाण्या आहेत. मनुष्यप्राण्यास परमेश्वराने बुद्धीची देणगी दिली आहे. तिचा उपयोग करून त्याने ‘आपणास हितकर आणि पथ्यकर कोणत्या गोष्टी आहेत ?’, ते ठरवावे अन् त्या गोष्टी प्रतिदिन सतत करण्याचा प्रयत्न करावा. ज्या गोष्टी करणे आरंभी कंटाळवाणे वाटते, त्याच गोष्टी नित्य केल्याने त्यात आनंद वाटू लागतो. ते करण्याची शरिरास एक प्रकारची सवय होते आणि सवयीने त्या गोष्टी करण्यात उल्हास वाटतो. मनाच्या प्राथमिक विरोधास जर मनुष्य महत्त्व देऊ लागला, तर दैनंदिन व्यवहारांत करण्याची शेकडो कामे तशीच पडून रहातील.
२. व्यायामाची क्रिया कंटाळवाणी नसून व्यायामाने शरिरात नवचैतन्य स्फुरण पावणे
व्यायामाची स्थिति अगदी निराळी आहे. व्यायामाची क्रिया कंटाळवाणी तर नाहीच; पण ती करतांना आणि नंतर सहस्रो माणसांस एक प्रकारचा अवर्णनीय आनंद वाटतो. याबद्दल कुणास शंका वाटत असेल, तर त्याने २ – ३ महिने नियमित वाटेल, तो व्यायामाचा प्रकार करून पहावा. व्यायाम ही शरिराची साहजिक क्रिया आहे. सर्व प्राणी निरनिराळ्या प्रकारच्या हालचाली मोठ्या आनंदाने करतात. हालचाल हेच िजवंतपणाचे मुख्य लक्षण आहे. शारीरिक हालचाल करण्याची इच्छा नसणे, हे आजारपणाचे लक्षण आहे. व्यायामाने शरिरातील रक्ताचे चलन होऊन शरिरात साचलेली अनेक प्रकारची विषारी घाण शरिराच्या बाहेर टाकण्यास साहाय्य होते. शरिरातील सर्व अवयवांस चलन होऊन एक प्रकारचे नवचैतन्य सर्व शरिरात स्फुरण पावते. शरिराची शुद्धी झाल्याने मेंदूची क्रिया उत्तम रितीने चालू होते आणि त्यामुळे मनास एक प्रकारची प्रसन्नता येते. माणसास सर्व जग आनंदमय दिसू लागते.
वरील सर्व गोष्टी अनुभवसिद्ध आहेत. वाचकांनी त्यांचा अनुभव घेऊन पहावा आणि स्वानुभवाने खात्री पटली, म्हणजे आपल्या सर्व इष्टमित्रांस त्याबद्दलची माहिती देऊन व्यायाम करण्यास प्रवृत्त करावे. हातच्या कंकणास आरशाची आवश्यकता नाही; म्हणून ‘नित्यनियमाने व्यायाम करून त्याचा आनंद अवश्य भोगावा’, अशी सर्व वाचकांस आमची आग्रहाची सूचना आहे.’
(साभार : मासिक ‘व्यायाम’, शं. धों. विद्वांस, संपादक, (१५.२.१९५७)
निरोगी जीवनासाठी ‘व्यायाम’ या सदरात प्रसिद्ध होणारे सर्व लेख वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा –
https://sanatanprabhat.org/marathi/tag/exercise