पेपरफुटीमुळे म्हाडाची परीक्षा रहित !

मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर मध्यरात्री घोषणा करण्याची नामुष्की !

म्हाडा

मुंबई – परीक्षेतील दलाल आणि पेपरफुटी यांमुळे १२ डिसेंबर या दिवशी म्हाडाच्या विविध पदांसाठी घेण्यात येणारी परीक्षा अचानक रहित करण्यात आली आहे. परीक्षेच्या दिवसापूर्वीच्या मध्यरात्रीला ही घोषणा करण्याची नामुष्की गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर आली. ११ डिसेंबरच्या रात्री १.५४ वाजता काही अपरिहार्य आणि तांत्रिक कारणांमुळे परीक्षा रहित करण्यात येत असल्याचे ‘ट्वीट’ आव्हाड यांनी केले आहे.

ही परीक्षा जानेवारी २०२२ मध्ये घेण्यात येणार असल्याचे आव्हाड यांनी ‘ट्वीट’मध्ये सांगितले आहे. आव्हाड यांच्या या ‘ट्वीट’वर विद्यार्थ्यांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या आहेत. सरकारच्या भोंगळ कारभाराविषयी अनेक विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे. एका विद्यार्थ्याने ‘परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी शेकडो रुपयांचा व्यय केला आहे. सरकारने प्रत्येक विद्यार्थ्याच्या खात्यात २ सहस्र रुपये इतकी हानीभरपाई जमा करावी’, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

म्हाडाच्या परीक्षेतील घोळाविषयी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची सरकारवर टीका !

भ्रष्टाचार, अनास्था आणि निर्लज्जता यांची परिसीमा !

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

मुंबई, १२ डिसेंबर (वार्ता.) – आरोग्य भरती परीक्षेचा घोळ – पेपरफुटीचे धागेदारे आरोग्य संचालनालयापर्यंत. आता म्हाडाच्या परीक्षेतही तोच घोळ – मध्यरात्री परीक्षा रहित करण्याची वेळ. सरकारी भरतीचा हा बट्टयाबोळ आणि राज्य सरकार काहीच बोलायला सिद्ध नाही. भ्रष्टाचार, अनास्था आणि निर्लज्जता यांची परिसीमा, असे ‘ट्वीट’ करून विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हाडातील पेपरफुटीविषयी सरकारवर टीका केली आहे.