गुरूंवर श्रद्धा ठेवून धर्मसेवा म्हणून पत्रकारिता करणारे साधक-वार्ताहर श्री. अरविंद पानसरे (वय ४४ वर्षे) !

पू. शिवाजी वटकर

‘श्री. अरविंद पानसरे यांचा आणि माझा जवळजवळ १४ वर्षांपासून परिचय आहे. माझ्याकडे मुंबई, ठाणे आणि रायगड या जिल्ह्यांच्या हिंदु जनजागृती समितीच्या समन्वयाचे उत्तरदायित्व होते. त्या वेळी श्री. अरविंद दैनिक ‘सनातन प्रभात’चे वार्ताहर होते. नंतर त्यांनी हिंदु जनजागृती समितीचे ‘महाराष्ट्र राज्य प्रवक्ते’ही सेवाही केली. आंदोलने, मोहिमा, सेवा आणि समाजात संपर्क करणे इत्यादी सेवा करतांना आम्ही बर्‍याच वेळा एकत्र असायचो. या कालावधीत मला कार्य आणि साधना या दृष्टीने श्री. अरविंद पानसरे यांची शिकायला मिळालेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

श्री. अरविंद पानसरे

श्री. अरविंद पानसरे यांना ४४ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !

१. तळमळीने आणि चिकाटीने दैनिक ‘सनातन प्रभात’चे वार्ताहर म्हणून सेवा करणे आणि सहसाधक वार्ताहरांना घडवणे

श्री. अरविंददादांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या कार्यालयात वार्ताहराची सेवा केली. त्यानंतर त्यांनी पुढाकार घेऊन, तळमळीने आणि चिकाटीने मुंबई अन् मंत्रालय येथे दैनिक ‘सनातन प्रभात’चे वार्ताहर म्हणून सेवा केली, तसेच अभ्यासवर्ग, शिबिरे आणि सत्संग यांच्या माध्यमातून सनातनच्या इतर वार्ताहर साधकांना घडवले. त्यांनी हिंदु जनजागृती समितीच्या कार्याला प्रसिद्धी मिळण्यासाठी प्रयत्न केले.

२. तत्त्वनिष्ठ राहून ‘धर्मसेवा’ म्हणून पत्रकारिता करणे

पत्रकारांचा लोकप्रतिनिधी आणि सरकार यांच्याशी संपर्क येतो. सर्वसाधारणपणे पत्रकार लोकप्रतिनिधींच्या प्रलोभनाला बळी पडून त्यांच्या प्रभावाखाली येतो; मात्र दादांनी आतापर्यंत गुरुकार्याशी एकनिष्ठ राहून धर्मसेवा केली आहे. मंत्री, पुढारी, सरकारी अधिकारी इत्यादी प्रतिष्ठित व्यक्तींशी निकटचा संबंध येऊनही त्यांनी एक ‘साधक-वार्ताहर’ म्हणून सेवा केली आहे.

३. वार्ताहर म्हणून हिंदु जनजागृती समितीच्या कार्यात सहभागी होणे अन् कार्य राज्य स्तरावर चालू होणे

मला महाराष्ट्र राज्य सरकार, लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्याशी संपर्क करून धर्मकार्य करण्याचा अनुभव नव्हता. दादांना मंत्रालय, विधीमंडळ, सरकारी विभाग, पोलीस मुख्यालय इत्यादींच्या कार्यपद्धती ठाऊक होत्या. कार्यपद्धती आणि लोकांच्या मानसिकता यांचा दादांना अनुभव असल्याने आम्ही योग्य व्यक्ती अन् संबंधित विभाग यांच्याकडे निवेदन देणे, माहितीच्या अधिकाराखाली माहिती काढणे, धर्मकार्यासाठी साहाय्य मिळवणे इत्यादी सेवा यशस्वीपणे करू शकलो. आम्ही या क्षेत्रात नवीन असूनही दादांच्या प्रयत्नामुळे हिंदु जनजागृती समितीचे कार्य मुंबई अन् मंत्रालय यांच्या माध्यमांतून महाराष्ट्रात चांगल्या प्रकारे चालू झाले.

४. हिंदु जनजागृती समितीच्या कार्याच्या प्रसिद्धीसाठी प्रयत्न करणे अन् अनेकांना जोडून ठेवणे

पत्रकार परिषद घेण्यासाठी सभागृह मिळवणे, पत्रकारांना परिषदेचे निमंत्रण देऊन तिथे येण्यासाठी त्यांचा पाठपुरावा करणे, दूरचित्रवाहिन्यांच्या पत्रकारांशी समन्वय करणे इत्यादी सेवा दादांनी अविरतपणे केल्या आहेत. पत्रकार परिषद झाल्यावर दादा आणि मी प्रसिद्धीपत्रक अन् लेख प्रसिद्ध होण्यासाठी दैनिकांच्या संपादकांना प्रत्यक्ष जाऊन भेटत होतो, तसेच दिवाळीच्या वेळी संपादकांना भेटणे इत्यादी सेवा दादा आनंदाने करत असत. दादांनी पुष्कळ पत्रकार आणि संपादक यांना धर्मकार्याशी जोडून ठेवले आहे. मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यांतील संप्रदायांचे प्रमुख, संघटना प्रमुख, लोकप्रतिनिधी, मंत्री, हिंदुत्वनिष्ठ, हितचिंतक, अधिवक्ते इत्यादींनाही त्यांनी समितीच्या कार्याशी जोडले असल्याने अनेक लोकप्रतिनिधींना संपर्क करता आले.

५. मंदिर सरकारीकरणाच्या प्रस्तावाला विरोध करण्यासाठीच्या मोहिमेत सहभागी होणे 

वर्ष २००७ मध्ये तत्कालीन महाराष्ट्र सरकार राज्यातील साडेचार लाख मंदिरांचे सरकारीकरण करणार होते, तसेच वर्ष २०१० मध्ये अडीच लाख मंदिरांचे सरकारीकरण करण्याचा महाराष्ट्र सरकारचा प्रस्ताव होता. दोन्ही वेळी मंदिरांच्या विश्वस्तांच्या बैठका घेणे, पत्रकार परिषदा घेणे, विरोधी पक्षनेत्यांपर्यंत हा विषय पोचवणे, त्यांच्याशी चर्चा करणे इत्यादी प्रयत्न समितीच्या वतीने करण्यात आले. यातील काही सेवांमध्ये दादांनी सहभाग घेतला.

६. गुरूंवर श्रद्धा ठेवून ‘अंधश्रद्धा निर्मूलन कायद्या’ला वैध मार्गाने सतत १० वर्षे विरोध करणे

आरंभी दादांनी प्रस्तावित ‘अंधश्रद्धा निर्मूलन कायद्या’च्या संदर्भात सरकारच्या गृह विभागाकडून माहितीच्या अधिकाराखाली माहिती काढली. त्याच्या आधारे भूतबाधा, अघोरी प्रथा आणि अंधश्रद्धा या संबंधीच्या गुन्ह्यांवर कारवाई करण्यासाठी सध्याचे कायदे सक्षम असल्याचे सिद्ध करता आले, तसेच प्रस्तावित कायद्याचा अधिवक्त्यांच्या साहाय्याने अभ्यास करून लेख लिहिले, निवेदने आणि प्रसिद्धीपत्रके सिद्ध केली. या आधारावर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने या कायद्याला वैध मार्गाने विरोध करता आला. या कायद्याच्या विरोधात जागृती करून महाराष्ट्रात एक मोठे आणि १० वर्षे प्रदीर्घ आंदोलन करता आले.

७. तत्कालीन सरकार अंनिसधार्जिणे असूनही संयमाने आणि चिकाटीने कायद्याला विरोध केल्याने सरकारला संपूर्ण कायदा पारित करता न येणे

महाराष्ट्र राज्याच्या प्रत्येक अधिवेशनापूर्वी, अधिवेशन काळात आणि नंतर आमदार, मंत्री, प्रशासकीय अधिकारी, हिंदुत्वनिष्ठ संघटना, वारकरी संप्रदाय, संत, हिंदु धर्माभिमानी, मंदिरांचे विश्वस्त इत्यादींपर्यंत या धर्मद्रोही कायद्याचा विषय पोचवण्यासाठी मी संपर्काला जात असे. तत्कालीन सरकार हे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या बाजूने असल्याने त्यांना काहीही करून हा धर्मद्रोही कायदा पारित करावयाचा होता; मात्र श्रीगुरूंच्या कृपेने आणि हिंदु धर्माच्या शक्तीमुळे हा कायदा तत्कालीन अंनिसधार्जिणे सरकार पारित करू शकले नाही. सरकारला २७ कलमांऐवजी केवळ १३ कलमांचा कायदा वटहुकूम काढून आणावा लागला. या कालावधीत दादांचे लढाऊ वृत्ती, तळमळ, चिकाटी, सातत्य, संयम, गुरुकार्याशी एकनिष्ठता, धर्मद्रोह्यांविरुद्धची सात्त्विक चीड इत्यादी गुण प्रसंगानुरूप शिकायला मिळाले.

८. राष्ट्र आणि धर्म यांविषयीचे प्रश्न विधीमंडळाच्या अधिवेशनात मांडण्यासाठी श्री. अरविंद पानसरे यांनी सातत्याने आणि चिकाटीने प्रयत्न करणे

राष्ट्र आणि धर्म यांविषयीचे प्रश्न विधीमंडळाच्या अधिवेशनात मांडले जाण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आम्ही निवेदने दिली. अरविंददादांच्या प्रयत्नांमुळे आमदारांनी राष्ट्र आणि धर्म यांविषयीचे अनेक प्रश्न विधीमंडळाच्या अधिवेशनात मांडले.

९. धर्मसेवेसाठी अवमानही सहजतेने सहन करणे 

विरोधी पक्षाचे एक धर्माभिमानी आमदार आम्हाला अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याला विरोध करण्यास साहाय्य करत असत. दादांशी चांगले संबंध असलेले हे आमदार पुढे मंत्री झाले. पूर्वीच्या सरकारने प्रदूषणकारी अशा लगद्याच्या गणपतीच्या मूर्ती बनवण्याला प्रोत्साहन देण्याचे पत्रक काढले होते. त्याला विरोध करण्यासाठी नवीन मंत्र्यांना आम्हाला माहिती आणि निवेदन द्यायचे होते. त्यांच्या सचिवांच्या सांगण्यावरून दादा त्यांना नेहमीप्रमाणे घरी भेटावयास गेले; मात्र त्यांनी दादांना अवमानित केले आणि ‘यापुढे मला कधीच भेटायचे नाही’, असे सांगितले. धर्मसेवा म्हणून दादांनी ते सर्व सहजतेने सहन केले. काही दिवसांनी त्या मंत्र्यांनी पुन्हा दादांना भेटायला बोलावले. काही आमदार, मंत्री, खासदार, प्रशासकीय अधिकारी यांच्याकडून असे मानहानीचे आणि अवमानाचे प्रकार घडत असल्याचे मी पाहिले आहे.

१०. पत्रकारितेचा उपयोग धर्मकार्यासाठी करणे 

लोकशाहीमध्ये पत्रकारांना लोकप्रतिनिधी आणि सरकार यांना सहजतेने संपर्क करता येतो. बहुतेक जण वैयक्तिक कामे करवून घेणे, राजकीय लाभासाठी मध्यस्थी करणे आणि अर्थार्जन करणे इत्यादीसाठी पत्रकारितेचा उपयोग करतांना दिसतात; मात्र दादांनी पत्रकारितेचा उपयोग साधना म्हणून धर्मकार्यासाठी केला.

११. सात्त्विक त्वेषाने आणि लढाऊ वृत्तीने सेवा करणे 

श्री. अरविंददादांना कोणतीही सेवा केव्हाही सांगितली, तरी ते पटकन स्वीकारतात. एखादी सेवा येत नसेल, तर ते ती शिकून घेऊन तळमळीने पूर्ण करतात. मुळात त्यांची वृत्ती नम्र, प्रेमळ, मनमिळावू आणि प्रसंगी नमते घेणे अशी आहे. असे असूनही समितीच्या राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणाच्या कार्यात त्यांनी सात्त्विक त्वेषाने अन् लढाऊ वृत्तीने सेवा केली.

१२. नामजपादी उपायांचे गांभीर्य

श्री. अरविंददादांना आध्यात्मिक त्रास आहे, तरीही ते राष्ट्र आणि धर्म यांची सेवा झोकून देऊन करतात. अनेक प्रशासकीय कार्यालयांमध्ये बाह्यतः आधुनिक सजावट आणि डामडौल दिसत असला, तरी तेथील रज-तम वातावरणामुळे तेथे नेहमी दाब जाणवायचा. तिथे अनिष्ट शक्तींची आक्रमणे होत असत. त्या वेळी दादा अधून-मधून प्रार्थना करणे, जयघोष करणे आणि अत्तर अन् कापूर यांचे उपाय करणे यांची मला आठवण करून देत असत. ते त्यांना सांगितलेले नामजपादी उपाय पूर्ण करण्याचा प्रयत्न करत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी धर्मसेवा करण्यासाठी श्री. अरविंद पानसरे या गुणी साधकाचा मला सत्संग दिला, त्यासाठी मी कृतज्ञता व्यक्त करतो आणि अरविंददादांची आध्यात्मिक प्रगती होवो, अशी परात्पर गुरुदेवांच्या चरणी प्रार्थना करतो.’

– (पू.) शिवाजी वटकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (११.१.२०२१)