‘लोक अदालती’तून महसूल जमा झाला, ही गोष्ट चांगली असली, तरी एवढ्या मोठ्या प्रमाणात थकबाकी का आहे ? हेही शोधले पाहिजे आणि त्यावर उपाययोजना काढायला हवी. – संपादक
पुणे – जिल्ह्यातील ७० कोटी ८६ लाख २६ सहस्र ७६६ रुपयांची कराची थकबाकी वसूल करण्यासाठी ५३ सहस्र ४२५ नागरिकांना नोटीस पाठवण्यात आल्या होत्या. या सर्वांना ११ डिसेंबर या दिवशी आयोजित केलेल्या ‘लोक अदालती’मध्ये उपस्थित रहाण्यास सांगितले होते. त्यापैकी केवळ १५ सहस्र नागरिकांनी यात सहभाग घेतला. त्यातून ग्रामपंचायतींचा १५ कोटी ९५ लाख १८ सहस्र ६६० रुपयांचा कर वसूल झाला आहे, अशी माहिती पुणे जिल्हा परिषदेचे ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सचिन घाडगे यांनी दिली. यामध्ये शिरूर तालुक्यात ७ कोटी ७२ लाख २८ सहस्र ७५१ रुपयांची सर्वाधिक रक्कम जमा झाली आहे, तर खेड तालुक्यातील सर्वाधिक ३ सहस्र २४१ दावे निकाली निघाले.
कोरोना संसर्गामुळे ग्रामपंचायतींच्या थकबाकींमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे ही थकबाकी तडजोडीच्या माध्यमातून वसूल व्हावी आणि ग्रामस्थांचीही थकबाकीतून सुटका व्हावी, या उद्देशाने जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाच्या वतीने जिल्ह्यात ठिकठिकाणी ‘लोक अदालतीं’चे आयोजन करण्यात आले होते.