अशा प्रकारांमुळेच जनतेचा पोलिसांवरील विश्वास उडत आहे ! – संपादक
मुंबई – राज्य सुरक्षादलाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक देवेन भारती यांसह निवृत्त पोलीस अधिकारी दीपक फटांगडे यांच्यावर १० डिसेंबर या दिवशी मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. वर्ष २०१७ मध्ये रेश्मा खान नावाच्या एका बांगलादेशी महिलेच्या पारपत्राच्या प्रकरणात गुन्हा नोंद न करण्यासाठी देवेन भारती यांनी दबाव आणल्याच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे. निवृत्त पोलीस अधिकारी दीपक कुरूळकर यांनी ही तक्रार केली आहे.
या प्रकरणी राज्याच्या पोलीस महासंचालकांनीही लक्ष घातले असून तक्रारदार दीपक कुरुळकर यांचे म्हणणे नोंदवून घेण्यात आले आहे. या प्रकरणातील कागदपत्रांची मागणी राज्य गुप्तवार्ता विभागाकडून करण्यात आली असता ही सर्व कागदपत्रे नष्ट करण्यात आल्याची माहिती मालवणी पोलीस ठाण्याकडून देण्यात आली आहे. याविषयी मुंबई पोलिसांचा गुप्तवार्ता विभाग चौकशी करत आहे.
दीपक कुरूळकर यांनी तक्रारीमध्ये म्हटले आहे की, रेश्मा खान यांनी पारपत्रासाठी केलेला अर्ज बनावट असल्याचे संबंधित कार्यालयांतील चौकशीतून उघड झाले होते. याविषयी मी मालवणी पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक दीपक फटांगडे यांना याविषयी कळवले; मात्र फटांगडे यांनी त्यावर कोणतीही कारवाई केली नाही. त्यानंतर याविषयी मी तत्कालीन कायदा-सुव्यवस्था विभागाचे आयुक्त देवेन भारती यांना सांगितले; मात्र त्यांनी या प्रकरणात लक्ष न घालण्यास सांगितले.