५४ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दहिसर (मुंबई) येथील चि. दियांशी मंजुनाथ पुजारी (वय २ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! चि. दियांशी पुजारी ही या पिढीतील एक आहे !

मार्गशीर्ष शुक्ल पक्ष दशमी (१३.१२.२०२१) या दिवशी दहिसर (मुंबई) येथील चि. दियांशी मंजुनाथ पुजारी हिचा दुसरा वाढदिवस आहे. त्या निमित्त तिच्या आईला तिच्या जन्मापूर्वी जाणवलेली सूत्रे आणि तिच्या जन्मानंतर जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले


पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

चि. दियांशी मंजुनाथ पुजारी

चि. दियांशी मंजुनाथ पुजारी हिला दुसर्‍या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

१. जन्मापूर्वी

१ अ. गर्भधारणा झाल्यावर सकारात्मकता वाढून साधनेचे प्रयत्न नियमितपणे होणे : ‘मला गर्भधारणा झाल्यानंतर माझे मन पुष्कळ सकारात्मक झाले होते. मी नियमितपणे पहाटे लवकर उठून नामजप करायचे, मारुतिस्तोत्र म्हणायचे आणि भावजागृतीसाठी कृष्णाची भजने ऐकायचे.

१ आ. ‘गर्भातील बाळ वीरवृत्तीचे आहे’, असे वाटणे

सौ. सुजाता पुजारी

१ आ १. धर्मप्रेमींसाठीच्या शिबिराच्या वेळी जयघोष केल्यावर पोटातील गर्भाने हालचाल करून प्रतिसाद देणे : मला ६ वा मास चालू असतांना एकदा माझी प्रकृती ठीक नव्हती. त्यामुळे मला २ दिवस गर्भाची हालचाल जाणवत नव्हती. त्यानंतर धर्मप्रेमींसाठी असलेल्या एका शिबिराची सेवा करतांना मला बरे वाटू लागले. त्या शिबिराची सांगता जयघोषाने झाली. तेव्हा गर्भानेही हालचाल करून प्रतिसाद दिला. तेव्हा ‘गर्भातील बाळ वीरवृत्तीचे आहे’, असे मला वाटले.

१ आ २. काही वेळा मी यजमानांच्या (श्री. मंजुनाथ पुजारी यांच्या) समवेत स्वरक्षण प्रशिक्षणवर्गाला जायचे. तेव्हाही माझ्या पोटातील गर्भाच्या हालचाली अधिक असायच्या.

१ आ ३. या काळात मला वीरवृत्ती जागृत करणारे कार्यक्रम आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावरील चित्रपट पहायला आवडायचे.

१ इ. अडचणींच्या वेळी गर्भाशी बोलल्यावर सकारात्मक रहाता येणे आणि संतांचे मार्गदर्शन मिळाल्यावर स्थिर रहाता येणे : मला सातवा मास लागल्यानंतर प्रसुतीपर्यंतचा पुढील सर्व काळ संघर्षाचा होता. या कालावधीत माझ्या यजमानांची प्रकृती खालावली होती आणि अन्य घरगुती अडचणीही वाढल्या होत्या. ‘हे सगळे स्वीकारता येणार नाही’, असे मला वाटायचे; पण पोटातील बाळाशी २ मिनिटे बोलल्यावर ते मला सकारात्मक रहाण्याची जाणीव करून देत होते आणि ‘श्री गुरूंवरील श्रद्धा वाढव’, असे सांगत होते. त्या वेळी मला वेळोवेळी संतांकडून मार्गदर्शन मिळत गेले आणि या कठीण प्रसंगात स्थिर रहाता आले.

१ ई. कठीण कालावधीत संतांच्या आध्यात्मिक प्रवासाच्या ध्वनी-चित्रचकत्या पाहिल्यावर शांत वाटणे ः या कठीण कालावधीत मी पू. (श्रीमती) आनंदीबाई पाटीलआजी (सनातनच्या ५७ व्या संत, वय ९९ वर्षे), सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर आणि सनातनचे पहिले बालसंत पू. भार्गवराम प्रभु (वय ४ वर्षे) यांच्या आध्यात्मिक प्रवासाच्या ध्वनी-चित्रचकत्या पाहिल्या. मी सद्गुरु अनुताई यांची ध्वनी-चित्रचकती अनेक वेळा पाहिली. संतांच्या ध्वनी-चित्रचकत्या पहातांना मला शांत वाटून आनंद मिळायचा.

१ उ. दैनिक ‘सनातन प्रभात’चा ‘रामराज्य’ विशेषांक पोटावर ठेवताच गर्भाने पुष्कळ हालचाल करणे : नोव्हेंबर २०१९ मध्ये दैनिक ‘सनातन प्रभात’चा ‘रामराज्य विशेषांक’ प्रकाशित झाला होता. मी तो अंक पोटावर ठेवताच गर्भाची हालचाल अधिक झाली. तेव्हा गर्भही ‘जय श्रीराम ।’ म्हणून ‘रामराज्यासाठी सेवा करण्यास उत्सुक आहे’, असे मला वाटले.

१ ऊ. या संपूर्ण कालावधीत मला गुरुकृपेने अखंड सेवारत रहाता आले.

२. जन्मानंतर

२ अ. जन्म ते ३ मास

२ अ १. समंजस : बाळंतपणानंतर २५ दिवसांनी माझी प्रकृती बिघडली आणि मला रुग्णालयात भरती करावे लागले. मी ४ दिवस रुग्णालयात होते. त्या कालावधीत दियांशीने मला सतत सहकार्य केले. ती रडत नसे. ती माझ्याकडे सतत आनंदाने पहायची.

२ अ २. ती रडत असतांना ‘ॐ नमः शिवाय ।’ हा नामजप केल्यास लगेच शांत होते.

२ आ. वय ४ ते ६ मास

२ आ १. सात्त्विकतेची ओढ : दियांशी ३ मासांची झाल्यावर आम्ही सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगीता विष्णुपंत जाधव (सनातनच्या ७४ व्या संत) यांना भेटण्यासाठी दादर (मुंबई) येथील सेवाकेंद्रात गेलो होतो. दियांशी तेथील सर्व साधकांकडे सहजतेने गेली. सद्गुरु अनुताई खोलीत आल्या. तेव्हा तिला फार आनंद झाला आणि तिने लगेच ध्यानमुद्रा केली. (‘तर्जनी आणि अंगठा यांची टोके जोडल्यावर ‘ध्यानमुद्रा’ होते.’ – संकलक)

२ आ २. रात्री झोपतांना तिला श्रीकृष्णाचा पाळणा आणि ‘धन्य धन्य हम हो गये गुरुदेव ।’, हे गीत लावलेले आवडते.

२ इ. वय ७ ते ९ मास

२ इ १. आजीचा रक्तदाब वाढल्यावर तिच्याजवळ बसून ध्यानमुद्रा करणे ः दियांशीला आजीविषयी (आईची आई, सौ. शकुंतला राव यांच्याविषयी) पुष्कळ प्रेम आणि जवळीक आहे. एकदा तिचा रक्तदाब पुष्कळ वाढला होता. त्यामुळे तिची स्थिती गंभीर होती. तेव्हा दियांशी तिच्याजवळ बसून ध्यानमुद्रा करायची.

२ इ २. चि. दियांशीच्या संदर्भात आलेली अनुभूती

साधिकेची प्राणशक्ती न्यून झाली असतांना दियांशीने साधिकेच्या अनाहतचक्रावर हात ठेवल्यावर तिला बरे वाटणे : एकदा माझी प्रकृती बरी नव्हती. माझी प्राणशक्ती न्यून झाली होती. तेव्हा दियांशी माझ्याजवळ आली आणि तिने माझ्या अनाहतचक्रावर तिचे दोन्ही हात ठेवले. असे तिने ३ – ४ वेळा केले. त्यानंतर काही वेळाने मला बरे वाटले आणि माझ्या अनाहतचक्रावर थंडावा जाणवला.

२ ई. वय १० ते १२ मास

२ ई १. सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता : आमच्या दोघांपैकी कुणावर त्रासदायक आवरण आले, तर ते दियांशीच्या लक्षात येते आणि ती आम्हाला आवरण काढण्यासाठी दैनिक ‘सनातन प्रभात’चा अंक आणून देते.

२ ई २. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयीची ओढ : दियांशीला दैनिक ‘सनातन प्रभात’मधील परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र शोधण्याचा खेळ आवडतो. ती त्यांना नमस्कार करते. ती ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ या ग्रंथावरील त्यांच्या छायाचित्राला नमस्कार करते. तिला या ग्रंथातील परात्पर गुरु डॉक्टरांचे चरण शोधायला आवडते.

२ ई ३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रतीचा भाव ः ती दिवसातून ४ – ५ वेळा हात कानापाशी धरून भ्रमणभाषवर बोलल्याप्रमाणे परात्पर गुरु डॉक्टरांशी बोलते. ती गुरुदेवांना ‘पूज्यम्म’ किंवा ‘बाबा’ म्हणते. घरात काही अयोग्य घडल्यास ती लगेच वरीलप्रमाणे परात्पर गुरु डॉक्टरांना भ्रमणभाष केल्याप्रमाणे कृती करते. तिचा गुरुदेवांविषयीचा भाव बघून माझी भावजागृती होते.

२ उ. वय १ ते २ वर्षे

२ उ १. दियांशी प्रतिदिन सकाळी तुळशीला नमस्कार करते.

२ उ २. चूक झाल्यावर क्षमायाचना करणे : दियांशीकडून चूक झाल्यास आम्ही तिला तिची चूक सांगतो आणि तिला स्वतःचे कान धरून क्षमायाचना करण्यासही शिकवतो. एकदा खेळतांना तिच्याकडून कापूर सांडला. तेव्हा तिने लगेच स्वतःचे कान धरून क्षमायाचना केली.

२ उ ३. ठाणे सेवाकेंद्रात गेल्यावर दियांशीविषयी जाणवलेली सूत्रे

अ. आम्ही तिघेही काही दिवसांसाठी ठाणे येथील सेवाकेंद्रात रहायला गेलो होतो. तेथे गेल्यावर दियांशी पुष्कळ आनंदी दिसत होती.

आ. सेवाकेंद्रात गेल्यावर तिने प्रथम स्वागतकक्षातील गुरुदेवांच्या प्रतिमेला नमस्कार करून ‘पूज्यम्म’ म्हणत डोके भूमीवर टेकवले.

इ. स्वागतकक्षात एक पलंग ठेवला होता. त्याला ती डोके टेकवून सारखी नमस्कार करत होती. साधकांना त्या पलंगाविषयी विचारल्यावर ‘त्या पलंगावर संत बसतात’, असे कळले.

इ. नंतर ध्यानमंदिरात जाऊन तिने सर्व देवतांना नमस्कार केला.

३ उ ४. आध्यात्मिक त्रास होत असलेल्या साधिकेला उपायांसाठी गोमूत्र आणि कापूर देणे : एकदा सेवाकेंद्रातील एका साधिकेला तीव्र आध्यात्मिक त्रास होत होता. त्यामुळे ती झोपली होती. दियांशीने तिला पाहिले आणि तिच्या तोंडावरून हळूच हात फिरवला. नंतर दियांशीने तिला उपायांसाठी गोमूत्र आणि कापूर आणून दिला.

४. स्वभावदोष : राग येणे

‘भगवंता, ‘आमची काहीही पात्रता नसतांना तूच आम्हाला या दैवी जिवाची सेवा करण्याची आणि तिच्याकडून शिकण्याची संधी दिलीस’, त्याबद्दल तुझ्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– सौ. सुजाता पुजारी (आई), दहिसर, मुंबई. (२३.४.२०२१)

बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.