मुंबई – महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे संपावर गेलेले जे कर्मचारी १३ डिसेंबरपर्यंत कामावर येतील, त्यांना कामावर घेऊन वेतनवाढ दिली जाईल, असे परिवहनमंत्री अनिल परब यांनी घोषित केले आहे.
अनिल परब म्हणाले की, आतापर्यंत १० सहस्र कर्मचार्यांचे निलंबन केले आहे. सर्व कर्मचार्यांना शेवटची संधी म्हणून १३ डिसेंबरपर्यंत कामावर येण्याची मुदत दिली आहे. १३ डिसेंबरनंतर जे कामावर येणार नाहीत, त्यांना निलंबित करण्यात येईल. वर्ष २०१८ च्या नियमानुसार, परिवहन महामंडळ हे अत्यावश्यक सेवेत येते. त्यामुळे मेस्माची कारवाई करता येते; पण १३ डिसेंबरपर्यंत मेस्मा लावणार नाही. आतापर्यंत महामंडळाची ५५० कोटी रुपयांची हानी झाली आहे. एक मास जे कामगार कामावर नव्हते, त्यांना वेतन मिळणार नाही. त्याला नेते उत्तरदायी आहेत; मात्र त्याची हानीभरपाई हे नेते देणार नाहीत, अशी टीका परब यांनी विरोधकांवर केली आहे.