प्रशासन : कर्तव्य आणि दायित्व !

संपादकीय

कर्मचार्‍यांना दिलेल्या सुट्टीचा विनियोग होतो का ? हे महापालिकेने पहावे !

‘विपश्यना केंद्र’

सध्या प्रत्येकाचेच आयुष्य धकाधकीचे आणि धावपळीचे झाले आहे. पैशांसाठी जो तो प्रतिदिन धावतच असतो. त्यामुळे त्यातून मानसिक ओढाताण किंवा ताणतणाव निर्माण होणे हे ओघाने आलेच ! प्रत्येकालाच अल्प-अधिक प्रमाणात अनिश्चितता, अस्थिरता आणि असुरक्षितता यांचा अनुभव येतो. ताण सहन करण्याची शक्ती संपली की, मनुष्य जीवन संपवण्याइतके टोकाचे पाऊल उचलतो. आयुष्याचे सार्थक करण्यासाठी अंधारातून प्रकाशाकडे नेणारा मार्गच अवलंबायला हवा. यातीलच एक मार्ग म्हणजे विपश्यना होय ! अर्थात् या सर्वांतून बाहेर पडण्याचे आणि मनाला स्थिरता प्रदान करण्याचे विविध पर्याय किंवा मार्गही सध्या उपलब्ध आहेत. मग कुणी ध्यानधारणा करतात, कुणी योगाचा अवलंब करतात, कुणी कर्मकांड किंवा उपासना करतात, तर काही जण ‘मेडिटेशन’ करतात. अशा प्रकारे अनेक माध्यमांतून प्रत्येक जण आपापल्या आयुष्याचे बिघडलेले गणित स्थिर आणि सुरळीत करू पहात असतो. सद्य:स्थिती पाहिल्यास कोरोनाचे संकट पूर्णपणे संपलेले नाही. त्यामुळे अनेकांच्या मनात मागील वर्षी लागू केलेली दळणवळण बंदी, कोरोनामुळे अनेकांना जीव गमवावा लागणे यांविषयी प्रचंड धास्ती आहे. काही जण त्यातून थोड्याफार प्रमाणात बाहेर पडलेले असले, तरी कोरोनाच्या दुष्परिणामांचे आघात सोसतच प्रत्येक जण आलेला दिवस ढकलत आहे. अर्थात् याचा परिणाम शेवटी कामाची गती, तसेच त्यातील फलनिष्पत्ती यांवर होतोच. अशा स्थितीत शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुदृढ राखणे अन् त्याद्वारे प्रशासकीय कामांमध्ये गतीमानता आणणे, यासाठी मुंबई महानगरपालिकेने कर्मचार्‍यांना ‘विपश्यना’ या मार्गाचा लाभ देण्याचे ठरवले आहे. महापालिकेने यासाठी सर्व कर्मचार्‍यांना १४ दिवसांच्या विशेष रजेची सवलत दिली आहे. महापालिकेच्या शिक्षकांसह सर्व कर्मचार्‍यांना विशेष रजा घेऊन विपश्यनेतून ध्यानधारणा करता येणार आहे. सध्याच्या काळात शरीर आणि मन यांच्यासाठी मार्गदर्शक ठरणार्‍या ‘विपश्यना’ या मार्गाचा अवलंब करणारी मुंबई महानगरपालिका ही प्रशासकीय स्तरावरील एकमेव असू शकते. केवळ कार्यात्मक बाजूचा नव्हे, तर कर्मचार्‍यांचा विचार करून त्यांना अशा स्वरूपाचा ज्ञानानुभव देणार्‍या मुंबई महानगरपालिकेचे निश्चितच कौतुक आहे. अन्य महापालिका, तसेच प्रशासकीय कार्यालये यांनीही अशा मार्गांचा अवलंब करून आपापल्या कर्मचार्‍यांना आयुष्यातील खरा आनंद मिळवून द्यायला हवा.

निर्णयाची दुसरी बाजू !

विपश्यना म्हणजे काय ? तर जे जसे खरोखर आहे, तसेच त्याला पहाणे, हे म्हणजे विपश्यना होय. विपश्यना ही भारतातील अतिप्राचीन ध्यानपद्धतींपैकी एक आहे. साधारणतः २ सहस्र ५०० वर्षांपूर्वीपासून अस्तित्वात असणार्‍या या पद्धतीमध्ये मनाची अशुद्धता काढून टाकून संपूर्ण मुक्तीचा सर्वोच्च आनंद मिळवणे, हे साध्य केले जाते. या अंतर्गत ‘आनापानसती’ ही क्रिया आहे. या क्रियेद्वारे स्मरणशक्ती आणि आत्मविश्वास वाढतो. तसेच कार्यात्मक गुणवत्ता वृद्धींगत होते. यात श्वासावर लक्ष केंद्रित करून मन स्थिर केले जाते. त्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुदृढ रहाते. हे सर्व परिणाम पहाता मुंबई महानगरपालिकेने घेतलेला निर्णय आणि त्यासाठी कर्मचार्‍यांना देण्यात आलेली रजेची सवलत योग्य आहे. आतातरी का होईना; पण प्रशासन अशा मार्गांकडे वळू लागले, हे दिलासादायक आहे. अर्थात् ही झाली या निर्णयाची एकांगी बाजू ! महापालिकेने या निर्णयाच्या दुसर्‍या बाजूचाही सखोल विचार करायला हवा. विपश्यनेसाठी जरी १४ दिवसांच्या रजेची सवलत देण्यात आली असली, तरी संबंधित कर्मचारी खरोखरच विपश्यना केंद्रात गेले आहेत का ? याचाही पाठपुरावा घ्यायला हवा; कारण १४ दिवसांची रजा म्हणजे एखाद्या कर्मचार्‍याला ही सुटीवर जाण्याची चांगली पर्वणीच वाटू शकते. त्यामुळे या सुविधेचा त्यांच्याकडून अपवापर न होता तिचा प्रामाणिकपणे लाभ घेतला जात आहे ना, हे पहाणेही महापालिकेचे कर्तव्य आहे. केवळ सुटी दिली, म्हणजे झाले, असे न करता कर्मचार्‍यांचे पूर्ण दायित्वच पालिकेने घ्यायला हवे. ‘विपश्यने’तून मनाची विचाररहित अवस्था साधता येते. जीवन आनंदी होते. जीवनाची अर्थपूर्णता त्या क्षणी अनुभवता येत असते; पण ही स्थिती कायमस्वरूपी आणि अखंड टिकायला हवी, ही विपश्यनेची खरी फलनिष्पत्ती आहे. अर्थात् प्रतिदिनच्या कामाच्या व्यापात हे किती प्रमाणात साध्य करता येईल ?, ही मोठी कसोटीच ठरते. एकवेळ ते साध्यही होऊ शकते; पण त्या प्रयत्नांमध्ये सातत्य राखायला हवे. केवळ सातत्य ठेवून चालणार नाही, तर त्याच्या जोडीला स्वतःतील दोषांचे निर्मूलन करून गुणांची जोपासना अन् ते वृद्धींगत करणेही महत्त्वाचे आहे. स्वतःतील ‘मी’ला नष्ट करायला हवे; कारण जोपर्यंत ‘मी’ आहे, तोपर्यंत मनात षड्रिपूंचा वावर निश्चितच असतो. ‘मी’ गळून पडल्यास खर्‍या अर्थाने विपश्यनेची परिणामकारकता साधता येईल. यासाठी चारित्र्य आणि नैतिकता असायला हवी; कारण एखादा कर्मचारी भलेही सुटी घेऊन एखाद्या ध्यानधारणा केंद्रात जाऊन आला आणि नंतर तो भ्रष्टाचार करू लागला, त्याने लाच घेतली, असभ्य वर्तन केले किंवा कर्तव्यचुकारपणा केला, तर जी काही सुटीच्या कालावधीत साधना शिकवली गेली आणि ती शिकण्यासाठी जी सुटी घेतली गेली ती वाया गेल्यासारखेच होईल. त्यामुळे सुट्टी घेऊन अनुभवलेली स्थिती कायमस्वरूपी टिकून रहावी, यासाठी नैतिकतेचा अंगीकार, तसेच भगवंताची आराधना म्हणजेच साधना करायला हवी. केवळ १४ नव्हे, तर ३६५ दिवस नव्हे, तर आयुष्यभर आपण शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही स्तरांवर सक्षम, समर्थ, तसेच आनंदी रहायला हवे, हे प्रत्येक मनुष्याचे केवळ कर्तव्य नाही, तर तितकेच दायित्वही आहे. मुंबई महानगरपालिकेने जो निर्णय घेतला आहे, तो चांगला आहे; मात्र त्याची अधिकाधिक फलनिष्पत्ती मिळण्यासाठी या योजनेचा सर्वांगाने विचार करून ही प्रक्रिया अधिक जोरकसपणे राबवणे आवश्यक आहे. असे केले, तर कर्मचार्‍यांची फलनिष्पत्ती नक्कीच वाढेल !