(म्हणे) ‘हेलिकॉप्टरच्या अपघातामागे भारतीय सैन्याचा बेशिस्तपणा उत्तरदायी !’

चीनचे सरकारी मुखपत्र ‘ग्लोबल टाइम्स’ची गरळओक !

असे खोटे आरोप करून भारतीय सैन्य आणि भारतीय नागरिक यांचे मानसिक खच्चीकरण करण्याचा चीनचा हा प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाही, हे त्याने लक्षात ठेवावे !

बीजिंग (चीन) – चीनचे सरकारी मुखपत्र ‘ग्लोबल टाइम्स’ने पुन्हा एकदा भारताच्या तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख जनरल बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाल्याच्या प्रकरणी टीका केली आहे. ‘हेलिकॉप्टर अपघातात भारताच्या ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’चा (तिन्ही सैन्यदलांच्या प्रमुखाचा) झालेला मृत्यू, हा केवळ भारतीय सैन्याचा बेशिस्तपणा आणि युद्धाच्या सिद्धतेची स्थितीच उघड करत नाही, तर भारतीय सैन्याच्या आधुनिकीकरणाचा खरा तोंडावळाही दाखवतो’, अशी गरळओक या दैनिकाने केली आहे. त्याच वेळी या दैनिकाच्या लेखात बिपिन रावत यांचा उल्लेख ‘चीनविरोधी’ असा करण्यात आला आहे. ‘चीन नव्हे, तर ‘मागासलेपणा’ हा भारताचा सर्वांत मोठा शत्रू आहे’, असेही यात नमूद करण्यात आले आहे.

१. या लेखात पुढे म्हटले आहे की, नुकतीच झालेली ही दुर्घटना टाळता आली असती. उदाहरणार्थ, जोपर्यंत हवामानात सुधारणा होत नाही, तोपर्यंत उड्डाण थांबवले असते, वैमानिकाने अधिक काळजीपूर्वक किंवा कुशलतेने उड्डाण केले असते किंवा हेलिकॉप्टरची कर्मचार्‍यांनी योग्य काळजी घेतली असती, तर अपघात टाळता आला असता.

२. सदर लेखात एका तज्ञाने म्हटले आहे की, ही समस्या संपूर्ण भारतीय सैन्यात आहे. चीन सीमेवर तैनात भारतीय सैन्यही नेहमी चिथावणी देण्याचे काम करत असते. जर खरोखर युद्ध झाले, तर चिनी सैन्यासमोर भारताला काही संधी मिळणार नाही.

३. एका चिनी तज्ञाचा संदर्भ देत लेखात म्हटले आहे की, भारतीय सैन्यात बेशिस्तपणा असून अनेकदा भारतीय सैन्य प्रक्रिया आणि नियम यांचे पालन करत नाही. वर्ष २०१९ मध्ये भारतीय विमानाला लागलेली आग आणि वर्ष २०१३ मध्ये भारतीय पाणबुडीत झालेला स्फोट, या सर्व मानवी चुका होत्या.

४. या लेखात दावा करण्यात आला आहे की, बिपीन रावत यांच्या निधनाने भारतीय सैन्याच्या आधुनिकीकरण करण्याच्या योजनेला मोठा फटका बसला आहे. रावत यांच्या निधनामुळे बेशिस्त सैन्यावरील सरकारचे नियंत्रण सुटू शकते आणि सीमेवरील स्थिती हाताबाहेर जाऊ शकते.