नवी मुंबई – मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा-बटाटा बाजारामध्ये कांदा आणि बटाटा या मालांचे वजन ५० किलोच ठेवण्याचे आदेश महाराष्ट्र राज्याचे पणन आणि सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी एका बैठकीत दिले आहे. या बैठकीस पणन संचालक सुनील पवार, बाजार समितीचे सचिव संदीप देशमुख, ग्रोसरी मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ, महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे सरचिटणीस नरेंद्र अण्णासाहेब पाटील आणि व्यापारी प्रतिनिधी उपस्थित होते.
१. कांदा-बटाटा बाजार आवारात मालाची चढ-उतार करण्याचे काम माथाडी कामगार करतात. त्यांच्या आरोग्याचा विचार करून ‘मालाच्या गोणीचे (पिशवी) वजन आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेने ५० किलोपर्यंत असावे’, असा निर्णय दिला होता; मात्र गेली अनेक वर्षे या निर्णयाची कार्यवाही होत नाही. यासाठी माथाडी कामगार संघटनेच्या कामगारांनी नुकतेच ५० किलोपेक्षा अधिक वजन असलेल्या गोणी चढ-उतार करणे बंद केले. त्यामुळे व्यापारावर परिणाम झाला होता. व्यापार्यांनी विनंती केल्यावर कामगारांनी हे आंदोलन तात्पुरते स्थगित केले. त्यानंतर पणनमंत्री यांनी बैठक घेऊन वरील निर्णय दिला.
२. सर्वोच्च न्यायालय आणि केंद्र सरकार यांनी कृषी विषयीच्या कायद्यांना स्थगिती दिली आहे. त्यामुळे राज्य सरकारने कांदा-बटाटा, भाजीपाला, फळे आणि अन्य मालावरील नियमन काढण्यासंदर्भात काढलेला ५ जुलै २०१६ चा आदेश रहित करावा, अनुज्ञप्तीधारक माथाडी कामगारांना बाजार समितीच्या कार्यालयीन सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी नरेंद्र पाटील यांनी बाळासाहेब पाटील यांच्याकडे केली आहे.