नगरच्या नाना महाराज मठात १३ डिसेंबरपासून २२९ वा हरिनाम सप्ताह !

नगर – शहरातील दिल्लीगेटजवळील श्री सद्गुरु जयराम नाना महाराज मठामध्ये परंपरेप्रमाणे श्री दत्तजयंतीनिमित्त नामसप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. १३ ते १९  डिसेंबर २०२१ पासून चालू होणार्‍या या सप्ताहाचे हे २२९ वे वर्ष आहे. भाविकांनी या नामसप्ताहातील सर्व कार्यक्रमांचा लाभ कोरोना प्रतिबंधक नियमांचे तंतोतंत पालन करून घ्यावा, असे आवाहन सर्वश्री भगवान देशमुख, संजय देशमुख आणि अनिल देशमुख यांनी केले आहे. सप्ताहामध्ये होणारे कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहेत.

१३ डिसेंबर २०२१ या दिवशी सकाळी ९ वाजता श्री. भगवान देशमुख यांच्या शुभहस्ते या नामसप्ताहाचा शुभारंभ विधीवत् करण्यात येईल. हा सप्ताह १९ डिसेंबरपर्यंत चालेल. या कालावधीत प्रतिदिन सकाळी ८ ते ११ या वेळेत श्रीगुरुचरित्र पारायण, दुपारी ३.३० ते सायं. ६ या वेळेत महिला भजनी मंडळांची भजने, सायंकाळी ६ ते ७ या वेळेत मान्यवरांची प्रवचने आणि हरिपाठ, तसेच रात्री १० ते १२ या वेळी पुरुष भजनी मंडळांची भजने असतील. १४ डिसेंबर या दिवशी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत सामूहिक गीता वाचन काळेश्वर भजनी मंडळ करेल. १७ डिसेंबरच्या रात्री १० ते १२ या वेळेत श्री. राधेश्याम कुलकर्णी यांचे भगवान श्रीदत्तात्रेय जन्मावर कीर्तन होईल.

२० डिसेंबर या दिवशी दुपारी १२ ते ४ या वेळेत महाप्रसाद असेल.