उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! कु. कस्तुरी ढमढेरे ही या पिढीतील एक आहे !
मार्गशीर्ष शुक्ल पक्ष सप्तमी (१०.१२.२०२१) या दिवशी पुणे येथील कु. कस्तुरी अभिजित ढमढेरे हिचा ८ वा वाढदिवस आहे. त्या निमित्त तिच्या कुटुंबियांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
कु. कस्तुरी अभिजित ढमढेरे हिला ८ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !
‘सनातन मध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे’ मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – परात्पर गुरु डॉ. आठवले |
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
‘वर्ष २०१७ मध्ये ‘कु. कस्तुरी ढमढरे हिची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असल्याचे घोषित करण्यात आले होते. आता डिसेंबर २०२१ मध्ये तिची पातळी ६३ टक्के झाली आहे. तिच्यातील भाव, साधनेची तळमळ आणि पालकांनी केलेले योग्य संस्कार यांमुळे तिची साधनेत प्रगती होत आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
श्री. अभिजित ढमढेरे (वडील)
१. प्रेमभाव : ‘मला किंवा सायलीला (कस्तुरीच्या आईला) बरे वाटत नसेल, तर ती लगेच आमची आपुलकीने विचारपूस करते आणि ‘काही साहाय्य करू का ?’, असे विचारते.
२. कस्तुरीला तिच्याकडून झालेल्या चुकांविषयी खंत वाटते अन् ती चूक सुधारण्यासाठी प्रयत्न करते.’
सौ. सायली ढमढेरे (आई)
१. उत्तम स्मरणशक्ती : ‘कस्तुरीला एकदा सांगितलेले सूत्र चांगले स्मरणात रहाते. एकदा पाहिलेली वस्तू, रस्ते आणि प्रसंग तिच्या चांगल्या प्रकारे लक्षात रहातात.
२. घरातील मोठ्या व्यक्ती काही कारणाने तिला रागावल्या किंवा ओरडल्या, तरी ती त्यांना उलट उत्तरे देत नाही.
३. कस्तुरीला योगासने करण्याची आवड आहे. ती न कंटाळता आणि नियमितपणे योगासने करते.
४. देवाविषयीची ओढ : मी सत्संग ऐकतांना कस्तुरी त्यातील सूत्रे वहीत लिहून घेते. त्या वेळी ती प्रार्थना लिहिते अथवा गणपति किंवा श्रीकृष्ण यांची चित्रे काढते. ती भक्तीसत्संगात सांगितल्या जाणार्या देवता किंवा संत यांच्या गोष्टीही मनापासून ऐकते.
५. नामजपाची आवड : कस्तुरी वेगवेगळ्या प्रकारे भाव ठेवून नामजप करण्याचा प्रयत्न करते. ‘जपमाळ घेऊन नामजप कसा करायचा ?’, हे सांगितल्यावर ती आता त्याप्रमाणे नामजप करते.’
श्री. शरद सहस्रबुद्धे (आजोबा (आईचे वडील)) पुणे
स्तोत्रे आणि श्लोक मुखोद्गत असणे : ‘तिचे पाठांतर चांगले आहे. ४ वर्षांची असतांना तिने रामरक्षा, मारुतिस्तोत्र, तसेच भगवद्गीता आणि मनाचे श्लोक मुखोद्गत केले आहेत. ती नित्यनेमाने रामरक्षा आणि मारुतिस्तोत्र म्हणते.’
सौ. स्नेहल सहस्रबुद्धे (आजी (आईची आई), आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), पुणे
समंजस : ‘दळणवळण बंदीच्या दीड वर्षाच्या कालावधीत कस्तुरीने बाहेर जाण्यासाठी किंवा खेळण्यासाठी एकदाही हट्ट केला नाही.’
सौ. गौरी नीलेश कुलकर्णी (मावशी), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
इतरांचा विचार करणे : ‘एकदा मी आणि कस्तुरी बाहेरून आल्यावर आम्हाला पाय धुवायचे होते. तेव्हा कस्तुरी माझ्या आधी प्रसाधनगृहात गेली. मी तिच्या मागे थांबले होते. तिचे हात-पाय धुऊन झाल्यावर तिने माझ्यासाठीही ‘मग’मध्ये पाणी भरून ठेवले.’
स्वभावदोष : ‘भावनाशीलता’ – सौ. सायली ढमढेरे
(नोव्हेंबर २०२१)
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता. |