संपादकीय
लढाऊ विमानांना होणारे अपघात रोखण्यासाठी पावले न उचलणारी व्यवस्था काय कामाची ?
भारताचे सी.डी.एस्. (चीफ ऑफ डिफेंस स्टाफ) जनरल बिपिन रावत हे प्रवास करत असलेल्या भारतीय वायूसेनेच्या ‘एम् आय १७ व्ही-५’ नामक लढाऊ हेलिकॉप्टरला ८ डिसेंबरच्या दुपारी अपघात झाला. तमिळनाडूतील निलगिरीज जिल्ह्यात असलेल्या कुन्नूर येथे ही घटना घडली असून जनरल रावत यांच्या पत्नी, तसेच सैन्याचे काही उच्चाधिकारी यांच्यासमवेत एकूण १४ जण हेलिकॉप्टरमध्ये होते. या अपघातात जनरल रावत यांच्यासह १३ जण मृत्यूमुखी पडले आहेत. या अपघातावर उच्चस्तरीय चौकशी समिती नेमणार असल्याचे समजते. या प्रकरणामागील सत्य समोर येईल; परंतु ही आकस्मिक घटना भारताच्या विद्यमान व्यवस्थेतील अत्यंत गंभीर समस्यांवर अन् त्यांवर प्रभावी उपाययोजना न राबवण्यासारख्या अक्षम्य हलगर्जीपणावर बोट ठेवते.
अद्वितीय कामगिरी !
सैन्यदल, नौदल आणि वायूदल यांचे संयुक्त प्रमुखपद भूषवणारे जनरल बिपिन लक्ष्मण सिंह रावत हे भारताचे पहिले सी.डी.एस्. होते. मुळात सी.डी.एस्. हे पद जानेवारी २०२० मध्ये सिद्ध करण्यात आले असून सर्व संरक्षणदलांचे प्रमुख या पदावर असलेल्या अधिकार्याला आढावा देतात. आधुनिक काळातील विविधांगी स्तरांच्या युद्धप्रकारांवर दृष्टी ठेवून सरकार, संरक्षण मंत्रालय आणि संरक्षण दले यांच्यामध्ये उत्तम समन्वय घडवून आणण्यासाठी हे पद अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. सी.डी.एस्. हे सर्वाेच्च पद मिळण्याआधी वर्ष २०१७ ते वर्ष २०१९ या ३ वर्षांच्या कालावधीत सैन्यदलप्रमुख पदावर असतांना जनरल रावत यांनी धडाडीने सैन्यातील अनेक कार्यपद्धतींमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण पालट घडवून आणले. पाकिस्तानमध्ये जाऊन केलेला आणि जगात सुप्रसिद्ध पावलेला सर्जिकल स्ट्राईकही त्यांच्या कार्यकाळातीलच ! त्यामुळेच रावत यांच्या केवळ नावानेच पाकिस्तानी सैन्याच्या मनात धडकी भरे. पाकिस्तानचे सैन्य आणि प्रसारमाध्यमे यांच्या चर्चांमध्ये ‘जनरल रावत यांचे धोरण’ अशा प्रकारे चर्चा होत. यातून जनरल बिपिन रावत आणि ते बजावत असलेल्या कामगिरीची आवश्यकता अन् महत्त्व आपल्या लक्षात आले असेल.
अनुत्तरित प्रश्न !
या अपघातातून देशाच्या संरक्षणव्यवस्थेतील घोडचुका पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनल्या आहेत. ज्या हेलिकॉप्टरमधून जनरल रावत यांनी प्रवास केला, ते ‘एम् आय १७ व्ही-५’ हे जगातील सर्वाेत्कृष्ट वाहतूक तंत्रज्ञानाने युक्त हेलिकॉप्टर्सपैकी एक आहे. रावत आणि त्यांच्यासारखे उच्च सैन्याधिकारी या हेलिकॉप्टरमधून प्रवास करणार असतील, तर त्याआधी संरक्षणदृष्ट्या आवश्यक सर्व कार्यपद्धतींचे बारकाव्यांसहित तंतोतंत पालन करण्यात येते. यामध्ये कोणतीही तांत्रिक समस्या आणि मानवी चूक याला थारा नसतो.‘जनरल रावत या हेलिकॉप्टरमधून प्रवास करण्याआधी त्याची सर्व तांत्रिक पडताळणी करण्यात आली होती का ?’, ‘हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ते कोसळले का ?’, ‘हेलिकॉप्टर उडण्यासाठी योग्य होते, तर कोसळले कसे ?’, ‘हा घातपातीचा प्रकार आहे का ?’, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. या प्रश्नांची उत्तरे जनतेला मिळणे आवश्यक आहे.
या अपघाताच्या निमित्ताने अनेक गोष्टींना उजाळा मिळाला. वर्ष २०१२ मध्ये काँग्रेसप्रणीत आघाडी सरकारमधील तत्कालीन संरक्षणमंत्री ए.के. अँथनी यांनी ४ दशकांमध्ये वायूदलाच्या विविध अपघातांच्या संदर्भातील माहिती संसदेमध्ये घोषित केली होती. एप्रिल २०१२ मध्ये सिद्ध करण्यात आलेल्या या अहवालानुसार तोपर्यंत तब्बल ४८२ मिग हेलिकॉप्टर्सचे अपघात झाले होते. त्यांमध्ये १७१ वैमांनिकांच्या समवेत ३९ नागरिकांचे बळी गेले होते. यांपैकी अनेक जणांना नाहक प्राण गमवावे लागले. तेव्हापासूनच लढाऊ विमानांना ‘उडत्या शवपेट्या’ किंवा ‘विधवा बनवणारी विमाने’ असा ‘लौकिक’ प्राप्त झाला. बरं, गेल्या १० वर्षांत ही स्थिती काय फारशी सुधारली आहे, असे नाही. वर्ष २०१९ च्या एका अहवालानुसार केवळ त्या वर्षाच्या पहिल्या ९ मासांमध्ये झालेल्या अपघातांमध्ये १२ लढाऊ विमाने नष्ट झाली. यांत किमान २० वैमानिक मारले गेले. भारताच्या गेल्या ५ दशकांच्या इतिहासातून न शिकल्याची परिणतीच सी.डी.एस्. रावत यांच्या दुर्दैवी अपघातातून समोर येते. या सर्व घटनांवर दृष्टीक्षेप टाकल्यास संरक्षण व्यवस्थेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यास आश्चर्य वाटायला नको.
या अपघातामुळे एरव्ही भारतात काही खुट्ट झाले, तरी त्याच्यावर आगपाखड करणारी पाश्चात्त्य प्रसिद्धीमाध्यमे आणि हिंदुद्वेष्टे यांना आयते कोलीत मिळाले आहे. भारताची जागतिक स्तरावर नाचक्की करण्यासाठी हे महाभाग यथोचित प्रयत्न करतील. हे उदाहरण येणार्या काळामध्ये अनेक वेळा घेऊन भारताच्या सकारात्मक प्रगतीला झाकोळून टाकण्यासाठी येनकेन प्रकारेण प्रयत्न होतील.
खुपणारी अनुपस्थिती !
सी.डी.एस्. जनरल रावत यांचा झालेला अपघात आणि त्यांचे अकाली जाणे यामुळे अंतर्गत आणि बाह्य शत्रू यांचे फावणार आहे. लद्दाख सीमेवर चीनचे सैन्य भारतावर आक्रमण करण्यासाठी सुसज्ज आहे. अशा नाजूक प्रसंगी चीनने परिस्थितीचा अपलाभ उठवत भारतावर आक्रमण केलेच, तर जनरल रावत यांची भूमिका कोण बजावू शकेल काय ? ‘पहिले सी.डी.एस्. म्हणून २ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव लाभलेले जनरल रावत यांना आताच्या घडीला कोण पर्यायी अधिकारी असू शकतो का ?’, हा यक्ष प्रश्न आज भारतासमोर आहे. थोडक्यात, जनरल रावत यांच्या हेलिकॉप्टरला झालेला अपघात आणि त्यांचा मृत्यू हा संरक्षण व्यवस्थेवर झालेला आघात आहे. हा आघात पचवून संरक्षण व्यवस्था पुन्हा जोमाने आणि पूर्ण शक्तीनिशी उभी रहाणे, भारताच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचे आहे.