आमदार रवि नाईक यांचा भाजपमध्ये प्रवेश

आमदारकीचे त्यागपत्र 

काँग्रेसकडे राहिले केवळ ३ आमदार

आमदार रवी नाईक यांचा सत्कार करतांना देवेंद्र फडवणीस

पणजी, ७ डिसेंबर (वार्ता.) – माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे फोंडा येथील आमदार रवि नाईक यांनी ७ डिसेंबर या दिवशी सकाळी आमदारकीचे त्यागपत्र देऊन सायंकाळी फोंडा येथे झालेल्या एका सार्वजनिक कार्यक्रमात भाजपमध्ये प्रवेश केला. प्रारंभी सकाळी रवि नाईक यांनी गोवा विधानसभेचे सभापती राजेश पाटणेकर यांच्याकडे आमदारकीचे त्यागपत्र दिले. या वेळी रवि नाईक यांच्यासमवेत त्यांचे पुत्र रॉय आणि रितेश यांचीही उपस्थिती होती. रॉय आणि रितेश हे दोघेही सध्या भाजपात आहेत. विधानसभेत काँग्रेसच्या आमदारांची संख्या ३ वर पोचली आहे. काँग्रेसचे माजी आमदार लुईझिन फालेरो यांनी मागील मासात आमदारकीचे त्यागपत्र देऊन तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. रवि नाईक यांनी सायंकाळी फोंडा येथे झालेल्या एका कार्यक्रमात भाजपचे गोवा प्रभारी देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.