चि. देवीप्रसाद सालीयन यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !
१. मनमोकळा स्वभाव
‘श्री. देवीप्रसाद हे शांत स्वभावाचे आहेत. ते सर्व परिस्थिती शांतपणे हाताळतात. त्यांच्या मनाचा संघर्ष होत असला, तरी ते तो इतरांना कळू देत नाहीत. ते मनमोकळेपणाने सर्व प्रसंग सांगतात.
२. इतरांना साहाय्य करणे
दादा नेहमी सर्वांना साहाय्य करतात. ते संकलन किंवा संगणक व्यवस्थापन या सेवांमध्ये इतरांना साहाय्य करण्याचा आटोकाट प्रयत्न करतात, तसेच ते सेवेच्या कार्यपद्धतीची घडी बसवण्याचा सतत प्रयत्न करतात.
३. इतरांना समजून घेणे
दादांना सेवेसंदर्भात अडचण सांगितल्यावर प्रथम ते ‘अडचण नेमकी काय आहे आणि त्यासंदर्भात साधकांनी काय उपाय काढून पाहिला’, हे सर्व समजून घेऊन साहाय्य करतात. त्यानंतर ते ‘साधकांचे कुठे चुकले’, हे समजावून सांगतात. त्यामुळे ‘सेवेत अडचण आल्यास दादा आहेत आणि ते साहाय्य करतील’, असे वाटून त्यांचा आधार वाटतो.
४. कठीण प्रसंगांत स्थिर रहाणे
देवीप्रसाददादा लहान वयात अनेक कठीण प्रसंगांना स्थिर राहून सामोरे गेले आहेत. सेवा करतांना समोर येणारी परिस्थिती कितीही बिकट असली, तरीही ते स्थिरपणाने आहे त्या परिस्थितीला सामोरे जातात.
५. तत्त्वनिष्ठता
ते भावनेपोटी कुठलाही निर्णय न घेता तत्त्वनिष्ठ राहून सर्व विषय मांडण्याचा प्रयत्न करतात.
६. गुरूंवर श्रद्धा ठेवून पूर्णवेळ साधना करणे
दादांना घरातील काही अडचणींमुळे चाकरी करावी लागायची. ते रामनाथी आश्रमात एका संतांना भेटायचे, तेव्हा ते त्याला पूर्णवेळ साधना करण्याविषयी सांगायचे; पण त्यांना निर्णय घेण्यास अवघड जात होते. त्यांची संतांवर श्रद्धा वाढल्यामुळे त्यांनी शेवटी प्रतिकूल स्थितीतही पूर्णवेळ होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ‘गुरु काळजी घेणारच आहेत’, अशी त्यांची श्रद्धा वाढली.
७. चुका स्वीकारणे
देवीप्रसाददादांना कोणीही त्यांची चूक लक्षात आणून दिल्यास ते ती स्वीकारतात. काही प्रसंगांत चूक स्वीकारतांना त्यांचा संघर्ष झाल्यास त्याविषयी ते साधकांशी मोकळेपणाने बोलतात.
८. सेवा परिपूर्ण करणे
देवीप्रसाददादा सेवा करतांना सुंदर आणि नीटनेटकी होण्यासाठी प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांनी केलेली सेवा पहातांना चांगले वाटते. त्यांनी केलेल्या सेवेत त्रुटीही अल्प असतात.
९. स्वतःला पालटण्याची तळमळ असणे
दादा सतत भावस्थितीत राहून सेवा करतात. त्यांचे व्यष्टी साधनेचे प्रयत्न पाहून ‘त्यांच्यामध्ये स्वतःला पालटण्याची तळमळ आणि शिकण्याची वृत्ती आहे’, हे लक्षात येते.’
– सेवेशी संबंधित साधक, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२५.११.२०२१)
१०. लहान वयात उत्तरदायित्व घेऊन ग्रंथ सेवा करणे
देवीप्रसाद याने साधना चालू केल्यावर आमची ओळख झाली. तेव्हा तो १९ वर्षांचा असूनही ग्रंथांच्या नोंदी वेळच्या वेळी करणे, ग्रंथांची स्वच्छता करणे, आवश्यकतेनुसार ग्रंथ पोचवणे आदी सेवा तो दायित्व घेऊन करत असे. साधकांना त्याचे दायित्व घेऊन सेवा करण्याचे कौतुक वाटत असे. एकदा मुंबईत पुष्कळ पाऊस पडल्यामुळे त्याच्या घरात पाणी आले होते. त्या वेळी त्याने त्याच्या घरात असलेले ग्रंथ स्वतःच्या जिवापलीकडे सांभाळले.
११. कार्यालयातील रज-तम वातावरणातही साधना चालू ठेवणे
मध्यंतरी देवीप्रसादला चाकरी करावी लागली. गुरुकृपेने त्याला चांगल्या नामांकित आस्थापनात चाकरी मिळाली. तिथे कामाच्या ‘शिफ्टस्’ असायच्या. कामावरचे वातावरण साधनेच्या दृष्टीने चांगले नसूनही त्याने त्याची साधना चालू ठेवली. त्याचे काही सहकारी व्यसनाधीन होते, तरीही त्याने साधकत्व सोडले नाही.
१२. साधनेत साहाय्य करणे
श्री. देवीप्रसाद आमचा एक चांगला आध्यात्मिक मित्र आहे. त्याने आम्हाला आमच्या साधनेतील अडचणी सोडवण्यासाठी साहाय्य केले. त्यामुळे आम्हाला त्याचा आधार वाटतो. तो आमचे बोलणे शांतपणे ऐकून आम्हाला साहाय्य करतो.’
– श्री. जितेंद्र आंब्रे आणि श्री. अभिजित सावंत
चि.सौ.कां. सायली ठमके यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !
१. हसतमुख
‘वर्ष २०१८ पासून कु. सायली पूर्णवेळ साधना करण्यासाठी आश्रमात आली. प्रथमदर्शनी तिच्यातील लक्षात आलेला गुण, म्हणजे तिच्या तोंडवळ्यावर असलेली प्रसन्नता ! सायली नेहमी हसतमुख आणि आनंदी असते.
२. कला
तिच्यामध्ये ‘मेंदी काढणे, रांगोळी काढणे किंवा काही समारंभ किंवा सणासुदीच्या वेळी साधिकांना नऊवारी साडी नेसवणे’ अशी अनेक कौशल्ये आहेत. त्यासाठी कुणी तिच्याकडे साहाय्य मागितल्यास ती त्यांना मनापासून साहाय्य करते.
३. विचारण्याची वृत्ती
सायली सेवा करतांना नेहमी विचारूनच करते. तिला सेवेविषयी काही सांगितल्यास ती त्याची नोंद करून ठेवते.
४. प्रेमभाव
अ. सायलीच्या बोलण्यात नम्रता आणि प्रेमभाव जाणवतो.
आ. आश्रमात कुणी रुग्णाईत असेल, तर सायली त्यांना ‘काय हवे-नको ?’ ते पहाते आणि त्यांची प्रेमाने विचारपूस करते. ती रुग्णाईत साधकांना आनंदाने साहाय्य करते.
५. अहं अल्प असणे
सायली लहानांच्या समवेत लहान होऊन त्यांच्या बरोबरीने खेळते. ती स्वतःच्या चुका प्रतिमा न जपता सांगते.
६. सकारात्मकता
पूर्णवेळ साधना करण्यासाठी आश्रमात आल्यावर सायली स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवत होती. सायली ती प्रक्रिया योग्य प्रकारे राबवण्याचा प्रयत्न करत असे. साधकांना साधनेत साहाय्य व्हावे आणि स्वभावदोषांमुळे त्यांच्या साधनेची हानी होऊ नये; म्हणून व्यष्टी साधनेचे आढावे अन् सत्संग यांमध्ये साधकांना त्यांच्या चुका सांगितल्या जातात. सायलीला अशा सत्संगांमधून तिच्या स्वभावदोषांची जाणीव करून देण्यात आली, तेव्हा तिने ते सकारात्मक राहून स्वीकारले. चुकांचा ताण घेऊन ती खचून जात नाही किंवा कधी त्या चुकांमध्ये अडकूनही रहात नाही.
७. परिस्थिती स्वीकारणे
कोरोनाच्या कालावधीत त्यांचा कौटुंबिक व्यवसायही काही मास बंद होता. त्याही परिस्थितीत सायली स्थिर होती. कोरोनाचा संसर्ग वाढण्यापूर्वी ती घरी गेली होती. त्यानंतर कोरोनाचे प्रमाण वाढल्याने दळणवळण बंदी लागू करण्यात आली. त्यामुळे तिला अनेक मास घरी रहावे लागले. तेव्हा तिने कौटुंबिक व्यवसाय सांभाळणे, हे स्थिर राहून केले.’
– अधिवक्त्या (सौ.) अदिती अमित हडकोणकर आणि अधिवक्त्या (कु.) दीपा तिवाडी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
८. भाव
सायलीमध्ये गुरुदेवांविषयी पुष्कळ भाव आहे. आतापर्यंत तिच्या वैयक्तिक जीवनात तिला काही अडचणी आल्या. तिने त्याचा ताण न घेता ‘देव माझे सर्व चांगलेच करणार आहे’, या भावाने सर्व देवावर सोडले आणि प्रत्येक वेळी तिला देवाने साहाय्य केल्याच्या अनुभूतीही आल्या.
– अधिवक्त्या (सौ.) अदिती अमित हडकोणकर आणि अधिवक्त्या (कु.) दीपा तिवाडी, रामनाथी, गोवा.
९. सेवा वेळेवर पूर्ण करणे
‘सायलीताई सेवेच्या वेळांचे पालन करण्याच्या संदर्भात सतर्क असतात. त्या सेवा वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. काही कारणामुळे त्यांना सेवा वेळेत पूर्ण करणे शक्य नसल्यास त्या अगोदर कळवतात.’ – अधिवक्ता नागेश जोशी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
१०. साधनेची ओढ आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती असलेला भाव यांमुळे शारीरिक त्रास होत असतांनाही पूर्णवेळ साधना करण्याचा निर्णय घेणे
कु. सायलीला आश्रमात आल्यानंतर काही दिवसांनी असह्य शारीरिक वेदनांना सामोरे जावे लागले. त्यामुळे तिला विश्रांती घ्यावी लागत असे. व्यवहारात एखाद्याला ‘अमुक एका ठिकाणी गेल्यावर त्रास बळावला’, असे जाणवले, तर त्याने कधीच पुन्हा तिथे न जाता घरी रहाण्याला प्राधान्य दिले असते; मात्र ‘सायलीची साधनेची ओढ आणि तिचा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती असलेला भाव यांमुळेच तिने आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करण्याचा निर्णय घेतला’, असे आम्हाला वाटते.’ – अधिवक्ता नीलेश सांगोलकर, हिंदु विधिज्ञ परिषद, पंढरपूर.
११. ‘सायलीताईची परात्पर गुरु डॉ. आठवले आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्यावर पुष्कळ श्रद्धा आहे.’
– कु. वैष्णवी माने, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.१२.२०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |